12 December 2017

News Flash

बुलडोझरसूत्र

‘रस्त्यांचे कंत्राटदार पैसे घेतात सरकारकडून मोजून पण रस्ते मात्र नीट बांधत नाहीत,

लोकसत्ता टीम | Updated: July 31, 2017 1:46 AM

Nitin gadkari : हल्लीच्या काळात विचारांशी कटिबद्धता नसलेले अनेकजण दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. विचारांशी प्रामाणिक न राहता सत्ता असलेल्या पक्षामध्ये जाणे लोकशाहीसाठी योग्य नाही. मात्र, दिलीप वळसे-पाटील यांनी आयुष्यभर आपल्या विचारांशी तडजोड केली नाही.

साक्षात शरदचंद्र गोविंदराव पवार ज्यांचा उल्लेख ‘महाराष्ट्राचे सुपुत्र’ असा करतात त्या नितीन गडकरी यांना ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती..’ ही ओळ ठाऊक नसेल असे वाटत नाही. कारण संस्कार. महाराष्ट्रातील मंत्रिपद म्हणू नका, महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेपद म्हणू नका, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद म्हणू नका, केंद्रातील मंत्रिपद म्हणू नका.. अनेक पदे गडकरी यांनी भूषविली आणि सांभाळली. इतक्या मोठय़ा पदांवर जाऊनही गडकरी यांचे पाय कायम जमिनीवर असतात. याचेही कारण संस्कार. ते कुठेही असू देत, कुठल्याही पदावर असू देत, ते आपल्याच स्वभावानुसार बिनधास्त वागतात, बोलतात. याचे कारण मात्र संस्कार नाहीत. ही तर गडकरी यांच्या वागण्याबोलण्याची स्वयंभू रीत. त्याच रीतीला अनुसरून परवा ते औरंगाबादेत बोलते झाले. विषय होता त्यांच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून बांधण्यात येणाऱ्या शेगाव-पंढरपूर रस्त्याचा. ‘रस्त्यांचे कंत्राटदार पैसे घेतात सरकारकडून मोजून पण रस्ते मात्र नीट बांधत नाहीत,’ अशा तक्रारी असतात सामान्यांच्या. मात्र चांगले काम करण्यावर गडकरी यांचा मोठा कटाक्ष. त्याचसाठी त्यांनी औरंगाबादेत चांगलाच दम भरला कंत्राटदारांना. ‘शेगाव-पंढरपूर रस्ता जर का यथातथा बांधलेला आढळला तर संबंधित कंत्राटदाराला बुलडोझरखाली घालेन,’ म्हणाले. ‘मी लक्ष्मीदर्शन घेत नाही.. गेल्या तीन वर्षांत ६ लाख कोटी रुपयांची कामे केली आमच्या खात्याने, पण एकाही कंत्राटदाराला भेटलेलो नाही,’ म्हणाले ते. म्हणजे सकाळी जाग आल्यानंतर दोन्ही करांकडे कटाक्ष टाकून गडकरी ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती..‘ म्हणत असतीलही, पण हे असले भलते कंत्राटी ‘लक्ष्मीदर्शन’ ते करीत नाहीत. वाखाणण्याजोगीच बाब आहे ही आणि अनुकरणीयदेखील. अनुकरणीय कशी आणि कुठे? तर, गावांतील, शहरांतील रस्त्यांबाबत. हे रस्तेही बांधतात कंत्राटदार मंडळीच. ती बांधणी अशी कौशल्याची की पावसाची एक सर येऊन गेली की त्यांचे बाह्य़ रूप नाहीसे होऊन अंतराय उघड व्हावे. ते झाले की घरात डेंग्यूच्या अळ्या पाळणारे लोकही त्यावर टीकाकवने करण्यास सोकावतात आणि उगाच बिनभरवशाची गाणी गातात. अशा स्थितीत हे बुलडोझरसूत्र खूपच प्रभावी ठरू शकते. रस्त्याच्या कामाचे कंत्राट देतानाच त्यात बुलडोझरसूत्राचा उल्लेख करता येईल. रस्ताकंत्राटदाराच्या कार्यालयाबाहेर एक एक बुलडोझर ठेवला की तो अंगावर येण्याच्या भीतीनेच कंत्राटदार रस्ते चांगले बांधतील. शिवाय गडकरी यांनी अगदी आत्ताआत्ताच चालकरहित गाडय़ांना आपला विरोध असल्याचे सांगितले होते. तेच धोरण येथेही लागू केले तर प्रत्येक बुलडोझरवर एक चालक अशा नियुक्त्या करून बेरोजगारीसही आळा घालता येईल. फावल्या वेळेत बुलडोझरमधून शेअर तत्त्वावर प्रवासी वाहतूकही करता येईल. आता गडकरी कधी कधी फारच कठोर बोलतात, असा आक्षेप घेतील कुणी. पण, ‘होण्या कार्य सुभग, बोलावे बोल कठोर,’ असा खाक्या आवश्यक असतो कधी कधी. तोच खाक्या ते अवलंबितात. संस्कार. आणखी काही नाही..

First Published on July 31, 2017 1:46 am

Web Title: nitin gadkari warning to road contractors