इथे आपण मंत्रिमंडळ बैठकीत अजून चर्चा करतोय कुठल्याच विषयावर कसलाच निर्णय नाही आणि तिकडे सरकारी कार्यालयांना सात दिवस सुटी असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याची बातमी कोण पसरवतंय? सगळ्या चॅनेलांवर बातमी सुरू आहे. नुसता गोंधळ आहे सगळीकडे.. उपमुख्यमंत्र्यांनी आपला ठेवणीतल्या शैलीत आवाज लावला तेव्हा क्षणभर शांतता पसरली. अजितदादा हे विचारताना आपल्याचकडे रोखून पाहत आहेत की काय शंकेने घारे डोळे भिरभिरले. अशा वेळी काहीच न बोललेले बरे. म्हणतात ना मौनम् सर्वार्थ साधनम्.. शिवाय उगाच दादांशी नजरानजर होऊन विषय वाढायला नको म्हणून मोबाइलशी चाळा सुरू झाला. डोक्यांत विचारांचा कल्लोळ सुरू झाला. सगळी नेपथ्यरचना वाया गेली. मस्त कल्पना आणली होती. सरकारी कार्यालयांना सात दिवस सुटी दिली की दिवसभर तीच बातमी चालणार. उद्या पेपरला हेडलाइनपण तीच. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील. पण आपण आधीच ट्वीट करून ठेवले. म्हणजे मीडियाला आधीच माहिती की ही आयडिया कुणाची. मग बाहेर मीडिया आपलाच बाइट घेणार. मस्त बाइट द्यायचा. ते आरोग्यमंत्री रोज टीव्हीवर दिसत असतात. त्यांना म्हणावे सौ सुनार की तो एक लुहार की.. त्यानंतर आपले नेतृत्वगुण, कल्पकता यांची थोरवी समाजमाध्यमांवर गाण्यासाठी लष्कर-ए-जीतेंद्र (लष्कर-ए-देवेंद्रची आयडिया यावरूनच त्यांना सुचली हे बऱ्याच जणांना ठाऊक नाही) आहेच आपली. साहेबही खूश होऊन पाठ थोपटतील. ताईंना त्या आरोग्यमंत्र्यांसाठी केला तसा कौतुकाचा ट्वीट आपल्यासाठीही करावा लागेल. पण अरेरे.. मनोरथांची ही दहीहंडी न फुटताच मनोरा कोसळला. सगळे सगळे वाया गेले या अधिकाऱ्यांमुळे. आता हा निर्णय होणार नाही व प्रसिद्धीही मिळणार नाहीच, शिवाय हे मीडियावाले आपल्या नावाने शिमगा करणार तो वेगळाच. छेऽ पण असा धीर सोडून चालणार नाही. डाव उलटवता आला पाहिजे. किमानपक्षी आपल्या अंगाला काही लागणार नाही हे तरी जमायला पाहिजे. नाही तर इतक्या वर्षांत काहीच शिकलो नाही असे होईल. पहिले ते ट्वीट गायब करू. मग काय ते ठरवू, असा विचार सुरू असतानाच वाचन-नाटक-सिनेमातील रुची उपयोगाला आली. पुन्हा नवी आयडिया सुचली. ते नाटक होते ना.. ‘तो मी नव्हेच..’ बस्स तेच करायचे आता. हे सारे आपण केलेच नाही. मी तर निपाणीचा तंबाखूचा व्यापारी- या थाटात सांगून टाकायचे, मी तर गोपनीयतेची शपथ घेतलेला मंत्री. मग मंत्रिमंडळाची बैठक संपण्यापूर्वीच त्यातील निर्णय जाहीर कसा करणार? ते ट्वीट करणारा तो मी नव्हेच.. ते करणारा माझा सहकारी. हॅलो, हॅलो.. ए शंभू मी बोलतोय. नवीन ट्वीट लिही, घे मजकूर.. आता टाक लवकर. काही सेकंद होत नाहीत तोच मोबाइलवर नोटिफिकेशन आले आणि तो नवा संदेश झळकला.. .. माझे ट्विटर हँडल संचालित करणाऱ्यांकडून हा प्रकार झाला असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल..