24 January 2019

News Flash

जाळीदार कारभार

भावनेच्या भरात मंत्रालयात अन्यत्र जाळी टाकण्याचा प्रयत्न केला तर आपणच आपल्या जाळ्यात फसल्यासारखे व्हायचे.

राज्यातील तमाम महिला-पुरुष, तरुण आणि वृद्ध, शेतकरी आणि कामगार, एवढेच काय, अगदी मनरेगातील मजुरांपासून अंगणवाडीतील कुपोषित बालके येथपर्यंतच्या सर्वाचे श्रद्धास्थान असलेल्या मंत्रालयनामक लोकशाही मंदिरामध्ये आत्महत्या करण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी, सर्वाचे तारणहार असे जे राज्याचे सरकार त्यांनी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे त्याचे स्वागत करण्याशिवाय महाराष्ट्रातील जनतेला गत्यंतरच नाही. तेव्हा या निर्णयाच्या स्वागताचे फ्लेक्स गावोगावी, खेडोपाडी, खळ्यांवर, बांधांवर लावणे हे आपले कर्तव्यच आहे. मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जाळी बसवून शेतकरी, कामकरी आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने जे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे त्याची नोंद देशाच्या पातळीवर घेतली गेली पाहिजे.  साधा नाही हा निर्णय. आजवर शेतकरी, कामकरी यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी का कमी प्रयत्न करण्यात आले? परंतु त्या रोखण्यासाठी एवढा बहुगुणी उपाय आजवर कोणालाच सुचला नव्हता. तो ज्यांना सुचला त्यांची भर शिवाजी पार्कात खणा-नारळाने ओटीच भरली पाहिजे असे आमचे स्पष्ट मत आहे. आता काही नतद्रष्ट विरोधकांचे असे म्हणणे आहे, की आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने उपाय करावेत ते मंत्रालयात नव्हेत, तर गावोगावी करावेत. धोरणे, त्यांची अंमलबजावणी यांत बदल करावेत. रोग रेडय़ाला असेल, तर औषध पखालीला लावू नये. काहींची मजल तर अगदी यापुढे गेली आहे. म्हणे, आता का बांधावरच्या झाडांना जाळ्या लावणार का? कीडनाशकांच्या बाटल्या जाळीबंद करणार का? हे का प्रश्न झाले? म्हणजे सरकारने मंत्रालयात होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी काहीच का उपाय करू नयेत? असे उपाय केले नसते, तर तिकडून हेच म्हणाले असते की सरकार असंवेदनशील आहे. उलट आमचे तर मत असे आहे, की सरकारने अत्यंत संवेदनशीलपणे मंत्रालयाला चारही बाजूंनी जाळ्या लावाव्यात. मंत्रालयाबाहेरील रस्त्यावरही आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. तेव्हा तेथील रहदारीवर नियंत्रण ठेवावे. तेथे येणाऱ्या आत्महत्येच्छुकांकडून ‘मी खाली सही करणार अमुक तमुक पूर्ण होशोहवासमध्ये असे लिहून देतो की मंत्रालयाच्या आत वा बाहेर कोठेही आत्महत्या करणार नाही,’ असे प्रतिज्ञापत्र आधीच भरून घ्यावे. असो. परंतु येथे आम्ही एक सावधगिरीचा इशाराही देऊन ठेवू इच्छितो. तो म्हणजे सरकारने या एका जाळ्यावरच थांबावे. भावनेच्या भरात मंत्रालयात अन्यत्र जाळी टाकण्याचा प्रयत्न केला तर आपणच आपल्या जाळ्यात फसल्यासारखे व्हायचे. मंत्रालयात केवळ जनताच येते असे नाही. तेथे छोटे-बडे असे सर्व प्रकारचे मासे रोजच फिरत असतात. ते जाळ्यात अडकले तर राज्यात मत्स्य दुष्काळ पडेल. या दुष्काळाने तर शासनगाडय़ाचेच प्राण कंठाशी येतील. तेव्हा राज्य चांगल्या पद्धतीने चालवायचे असेल, लोकांची चार कामे मार्गी लावायची असतील, तर जाळी लावण्याचे फक्त जाहीर करावे. म्हणजे जनतेसही वाटत राहते की राज्य अत्यंत पारदर्शक व जाळीदार पद्धतीने काम करीत आहे. अखेर असे वाटण्यातच तर लोकांचे सौख्य सामावलेले असते. तेवढे साधावे, म्हणजे झाले.

First Published on February 14, 2018 2:32 am

Web Title: nylon nets in mantralaya to prevent suicide maharashtra government