23 October 2018

News Flash

निव्र्यसनी ‘रम’राज्याचा अस्त..

कपिल मोहन यांच्या निधनाच्या बातमीने नवमाध्यमांवरील मित्रसमूह स्तब्ध झाले.

..‘या जगात दोन प्रकारचे लोक राहतात. पहिल्या प्रकारातील लोक ‘ओल्ड मंक’वर जिवापाड प्रेम करतात आणि दुसऱ्या प्रकारातील मूर्ख!’ अनेक वर्षांपासून प्रत्येक सप्ताहान्ताच्या संध्याकाळी, जेव्हा जेव्हा पिढय़ापिढय़ांच्या परिचयाची, घरातील ‘बार’मध्ये किंवा एखाद्या ‘छुप्या कोनाडय़ा’त निगुतीने सांभाळून ठेवलेली ती बाटली कमाल ममताळूपणाने उघडली जाते, प्याले भरले जातात आणि मैफिलीचं ‘चांगभलं’ करताना कुणाच्या तरी तोंडून हे वाक्य हमखास उच्चारलं जातं.. पुढे प्रत्येक घोटासोबत झुलणाऱ्या ‘ओल्ड मंक’च्या हिंदोळ्यावर झोके घेतच रात्र रंगत जाते.. मद्यप्रेमींच्या जगाला भारताने दिलेली एक अनमोल भेट म्हणजे हा ‘ओल्ड मंक’! जालियनवाला बाग हत्याकांड घडविणाऱ्या जनरल डायरच्या बापाने, एडवर्ड डायरने शौकिनांसाठी करून ठेवलेले एक पुण्यकर्म म्हणजे ‘ओल्ड मंक’.. पुढे ‘मोहन मिकीन’ ग्रुपने ‘रम’चा हा ‘ब्रँड’ एवढा लोकप्रिय केला, की ‘ओल्ड मंक’ हेच रमचे ‘पहिले नाव’ झाले. अगदी आठवडाभरापूर्वी नववर्षांच्या पूर्वसंध्येला रंगलेल्या सरत्या रात्री नववर्षांकडे सरकणाऱ्या प्रत्येक क्षणात याच ओल्ड मंकने उत्साहाचा अनोखा रंग भरला होता. पण गेल्या शनिवारच्या सकाळपासूनच काहीसा अस्वस्थ असलेला हा ओल्ड मंक नंतर मात्र नेहमीच्या तोऱ्यात ‘रम’लाच नाही.. ‘ओल्ड मंक’ नावाच्या या ‘मेड इन इंडिया’ मद्याला जगभरात प्रतिष्ठा आणि अफाट लोकप्रियता मिळवून देणाऱ्या ८८ वर्षांच्या पद्मश्री ब्रिगेडियर डॉ. कपिल मोहन यांनी त्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला आणि बाटलीच्या लेबलवरचा हा हसरा ‘ओल्ड मंक’देखील शोकाकुल झाला.. कोणतीही जाहिरातबाजी न करता, केवळ नशिल्या चवीच्या जोरावर मद्यशौकिनांच्या पसंतीस उतरलेल्या ओल्ड मंकच्या या निर्मात्याने स्वत: कधीच दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता! पण अतिसामान्यापासून उच्चभ्रूपर्यंत प्रत्येक वर्तुळातील मद्यप्रेमींना मनापासून मद्यप्राशन करण्यासाठी ओल्ड मंकला पर्याय नाही एवढी पुण्याई त्यांनी ओल्ड मंकच्या पाठीशी उभी केली. लाखो लोकांना या मद्याच्या नशेच्या तालावर नाचायला लावून आनंदाचे दुर्मीळ क्षण आणि अविस्मरणीय आठवणी बहाल केल्या. कपिल मोहन यांच्या निधनाच्या बातमीने नवमाध्यमांवरील मित्रसमूह स्तब्ध झाले. जुन्या आठवणी पुन्हा फेसाळून उठल्या आणि जगण्यातील प्रत्येक समस्येचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात कधी काळी याच ‘ओल्ड मंक’ने दिलेली साथ आठवून अनेकांचे डोळेही पाणावले.. जगाचे भान विसरून बेधुंदपणे नाचायला लावत आनंद साजरा करण्यास शिकविणाऱ्या, दु:खाच्या क्षणी उबदार दिलासा देणाऱ्या या ओल्ड मंकच्या निर्मात्यास आणि मद्यविश्वाच्या या अनभिषिक्त माहात्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आता या विश्वात पुन्हा एकदा ‘ओल्ड मंक’चाच आसरा घेतला जाणार यात शंका नाही. या ओल्ड मंकने अनेकांच्या हृदयातील ‘गम’ दूर केला, कवितांनाही जन्म दिला. आमच्या पाडगावकरांच्या कवितेलाही ओल्ड मंकचा मोह टाळता आला नाही. पहिल्या पावसाच्या सरीसोबत जेव्हा जेव्हा त्यांच्या मनात लिज्जतदार पापडाचा खमंग गंध दरवळला असेल, तेव्हा तेव्हा त्यांच्या कवितेवर प्रेम करणाऱ्या मद्यशौकिनांच्या मनात त्यांच्याच ओळी रुंजी घालत असतील, ‘कसे सांगा आहात तुम्ही नाना, काय केली सुरुवात मद्यपाना?.. जगी असले जरि राव आणि रंक, सौख्यदायी सकलांसि ओल्ड मंक!’.. ब्रिगेडियर कपिल मोहन, तुम्ही या जगाचा निरोप घेतला असलात, तरी तुम्ही मागे ठेवलेले हे ‘स्पिरिट’ मात्र सदैव सळसळतेच राहणार आहे..

First Published on January 10, 2018 1:37 am

Web Title: old monk manufacturer kapil mohan died