कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत तद्वत काविळीच्या शापानेही कोणी आजारी पडत नाही.. पण हे कोण कोणास सांगणार? या.. या विकाऊ पत्रकारूनारूंस तर त्यावर केवळ टीका करणे तेवढेच जमते. आता आम्हांस सांगा, आमच्या उत्तम प्रदेशचे सन्माननीय मंत्रिमहोदय ओमप्रकाश राजभरजी यांनी मतदारांस शाप दिला, की जो कोणी मानव माझ्या विरोधकांच्या सभेस जाईल त्यास कावीळ होईल, हा का टीका करण्याचा विषय आहे? बरे, राजभरजी यांनी केवळ शापच दिला असता तर गोष्ट वेगळी होती. परंतु त्यांनी त्यावर उ:शापही दिला, की पुन्हा माझ्या सभेस याल तर कावीळ बरी होईल. आपल्या प्रजेविषयी मनामध्ये अपार सहानुभूती असल्याशिवाय का कोणी असा उ:शाप देईल? परंतु हे पत्रकारूनारू म्हणजे धादांत नकारात्मकच. तुम्हांस सांगतो वाचकहो, यांचा फोटो जरी काढला ना स्टुडय़ोत जाऊन, तरी तो निगेटिव्हच येईल. खात्री आहे आम्हांस. याचे कारण म्हणजे हे जे काही पत्रकारूनारू आहेत ना, ते तंतोतंत देशद्रोहीच आहेत. भाजपला विरोध म्हणजे भारतालाच विरोध हे आता आपण मान्यच केलेले नाही काय? त्या न्यायाने यांस राजद्रोहाचे कलम लागू पडतेच पडते. आता सगळेच नाही आहेत असे म्हणा. परंतु उर्वरित पत्रकारूनारू ही जी नकारात्मकता पसरवीत आहेत या वातावरणी, त्यास काय बरे करावे? आम्हांस तर असे वाटते, की या टीकाकारांच्या दोन्ही मेंदूंनाच कावीळ झालेली आहे. त्या कारणे त्यांस सर्वत्र हिरवे हिरवे.. माफ करा, पिवळे पिवळे दिसत आहे. साधे विनोदही त्यांस समजू नयेत? राजभरभाऊंनी केला तो छानसा, सुंदरसा, ललितसा विनोदच तर होता. त्यांना का मतदारांना धमकवायचे होते? धमकावयाचे असते तर त्यांच्याकडे अन्य साधनांची का कमतरता होती? परंतु नाही. त्यांनी प्रजेचे मन प्रफुल्ल व्हावे याकरिता एक छानसा ज्योकजुमला मारला. बरे असा ज्योकजुमला मारणारे का ते एकलेच आहेत? आमच्या उपराष्ट्रपतींपासून, पंतप्रधानांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच तर असे ज्योकजुमले मारीत असतात. ‘करी मनोरंजन जो जनांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे’ हेच तर आपले राष्ट्रवादी ब्रीदवाक्य आहे. वस्तुत: आजच्या गंभीर अशा परिस्थितीत अशा ज्योकजुमल्यांची आत्यंतिक आवश्यकता आहे. औषध आहे ते मन प्रसन्न करण्याचे. अधूनमधून जनताजनार्दनास त्याची मात्रा चाटविली, की बरे असते. जे जे नकारात्मक आहे ते ते सारे विसरून लोक जुमल्यांच्या डोही आनंद तरंग अशा भावावस्थेत जातात. टीकाकार त्यावरून रान उठवतात परंतु ते तर देशद्रोही. त्यांचे कोण ऐकतो? खरेच ऐकूच नये त्यांचे. ते असे लोक आहेत, की  ज्यांचा पुत्र परीक्षेत नापास झाला, तर ते केवळ त्याचे गुणपत्रक पाहून त्याचेवर टीका करीत बसतील. त्या पुत्राने वर्षभर अभ्यासाकरिता केलेले कष्ट पाहणार नाहीत. बरे, तुम्हांस टीका करावयाची तर खुशाल करा. परंतु त्यात निष्पक्षपातीपणा नको का? आम्हांस सांगा, राजभरजींना तुम्ही नावे ठेवता, मग त्या तिकडे पश्चिम बंगालमध्ये ते.. ते झाले, केरळमध्ये हे.. हे झाले, झालेच तर तिकडे झुमरीतलैयात ते तसे झाले तेव्हा नाही तुम्ही काही बोलला? मग आताच का बरे बोलता रे दुष्ट पक्षपात्यांनो? ते काही नाही, या कावीळग्रस्तांवर उपचार हे  केलेच पाहिजेत. त्यांना गोरखपूरच्या सरकारी इस्पितळात व्हेंटिलेटरवरच ठेवले पाहिजे.  आणि लक्षात ठेवा, हा अजिबात ज्योकजुमला नाही.