कोण म्हणतं राजकारण रुक्ष, शुष्क, रटाळ, रखरखीत असतं? .. खरं म्हणजे, राजकारणाइतकं सदाबहार, टवटवीत क्षेत्र शोधूनही सापडणार नाही. तसा तर, ग्रीष्माच्या  झळा चटके देऊ लागल्या की हिरवागार निसर्गदेखील रूक्ष, शुष्क होतोच की! पण पुढे वसंत येतो, पावसाळा येतो, आणि शिशिराच्या गुलाबी हवेची झुळूक वाहू लागली की निसर्गालाही नवी हिरवाई फुटते. राजकारणाचेही तसेच असते. आता राजकारणात वसंताचे आगमन होऊ लागले आहे. काव्याचे ताटवे आताशी उमलू लागले आहेत. पुढे, आणखी काही दिवसांनी या ताटव्यांवर प्रतिभेचे टवटवीत फुलोरे फुलतील, आणि राजकारणातील सदाबहार हिरवेपणा आणखीनच खुलून दिसू लागेल.. राजकारणाचे हे अनोखे रंग पाहून हुरळून जाण्याचा एक वेगळा अनुभव येईल. या सदाबहार हंगमाची चाहूल सुरू झाली आहे. शिशिराचे वारे राजकारणाच्या कोमेजत्या बगीच्यावर फुंकर घालून ताजेपणा पेरू लागले आहेत. आता प्रतिभेला धुमारे फुटतील, खरा बहर येईल.. तसा तो केंद्रात कधीपासूनच आलेला आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेत आणि प्रत्येक घोषणेत काव्य पाझरताना आपण कधीपासूनच पाहात आहोत. त्यामध्ये यमक आहे, आणि अलंकारही आहेत. त्या काव्यात्मतेच्या कारंज्यात न्हाऊन निघताना अनेकदा, आपण आपल्या वेदना विसरून जातो, आणि त्या काव्यप्रतिभालंकृत राजकारणातील हिरवेपणाने सुखावूनही जातो. हेच प्रतिभेचे झरे वाहत येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाला ताजेपणा देणारे शिंपण घालू लागले आहेत. प्रतिभासंपन्नतेची जणू स्पर्धा सुरू व्हावी, अशा ईष्य्रेने सारे जण सरसावले आहेत. राजकारणाच्या बगीच्यात आता काव्य असेल, संगीत असेल, करमणूक असेल, मनोरंजन असेल, आणि सिनेमातच शोभणारे स्वप्नरंजनही असेल. या बगीच्याला सांस्कृतिकतेच्या नावाने नवा बहरही येईल.. असे काही झाले, की आपण सारे अचंबित होऊन जाऊ. हे काय चालले आहे ते क्षणभर समजणारही नाही. ते खरोखरीच गंभीर आहेत का, असाही प्रश्न आपल्यासारख्या सामान्यांना पडेल. आणि, मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे, आपल्यालाही गंभीर व्हावेसे वाटू लागेल. मग, ‘चला, थोडे गंभीर होऊ या’ असे स्वत:स बजावत आपणही या राजकारणाच्या फुललेल्या बगीच्यात आपल्या प्रतिभेचे शिंपण करण्यासाठी सरसावून पुढे होऊ, आणि मूळच्या प्रतिभाशक्तीला अधिकच बळ येईल. आता कुठे याची सुरुवात झाली आहे. तसे, याआधी केवळ सत्ताधाऱ्यांमध्येच एकमेकांवर आपापल्या प्रतिभाशक्तीचे  गुलाबपाणी शिंपडण्याची स्पर्धा सुरू होती. त्यांनी यांना रावण म्हणावे, राहू-केतू म्हणावे, आणि यांनी त्यांना स्नेहभावाने  कुरवाळावे हा खेळ तर आपण पाहिलाच होता. आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खेळ सुरू झाला आहे. विरोधकांनी आपल्या धारदार प्रतिभेचा पहिला वार करीत सत्ताधाऱ्यांना ‘महाराष्ट्राचे ठक’ – ठग ऑफ महाराष्ट्र – म्हणून घोषित केले आहे, तर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना त्यांच्याच भाषेत ‘वासेपूरची टोळी’ – गँग ऑफ वासेपूर- म्हणून टोलविले आहे.. राजकारणाच्या बगीच्यात मनोरंजनाच्या कोपऱ्यातील झाडांना प्रतिभेचे धुमारे फुटल्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. फुलू पाहणाऱ्या या वसंताकडे ‘गोलमाल’ म्हणून न पाहता त्याच्या सौंदर्याचा खराखुरा आस्वाद घ्यायचा असेल, तर.. चला, थोडे गंभीर होऊ या!