मंत्रालयात गृहखात्याच्या प्रत्येक दालनात त्या दिवशी आनंदाचे वातावरण होते. सर्वाचे कान क्षणाक्षणाला बाहेरून येणाऱ्या बातमीकडे लागलेले होते. ती बातमी ऐकण्यासाठी सर्वाचे प्राण जणू कानात गोळा झाले होते.. अखेर ती बातमी आली आणि दालने आनंदाने फुलून गेली. कोणालाच आपला आनंद लपविता येत नव्हता. महाराज गडावर सुखरूप पोहोचल्याची बातमी समजल्यावर मावळ्यांना जसा आनंद व्हायचा, तसाच आनंद गृहखात्यात ओसंडत होता. त्या बातमीचे महत्त्वच तेवढे होते. ज्या दिवशी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जबाबदारीचा इशारा दिला, तेव्हापासून गृहखात्याच्या त्या दालनावर मानसिक तणावाचे सावट पसरले होते. असे काही झाले की सारे मंत्रालय उदास होऊन जायचे. या इशाऱ्यानंतरही तेच झाले. ‘छगन भुजबळांच्या प्रकृतीची काळजी घ्या, त्यांच्या प्रकृतीस काही झाले तर त्याची जबाबदारी सरकारवर राहील,’ असा सज्जड इशारा पवारसाहेबांनी दिल्यापासून गृहखात्याचा सारा नूरच पालटून गेला होता. या संकटातून कसे बाहेर पडावे तेच कुणाला समजत नव्हते. एकाएकी राज्यात सर्वत्र भुजबळांच्या सुटकेसाठी ‘अन्याय पे चर्चा’ सुरू झाली, ‘भुजबळ छोडो’ आंदोलनाची तयारी जागोजागी सुरू झाली. ‘भुजबळांची लवकरच सुटका होईल’ असा दावा राजकीय नेते करू लागले आणि खरोखरीच एका क्षणी तो योग आला. भुजबळांना जामीन मिळाल्याची बातमी गृहखात्यात पोहोचली. कुणी तरी घाईघाईने जाऊन ती मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचविली. बातमी समजताच त्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आणि सभादालनातील शिवरायांच्या पुतळ्यास लवून नमस्कार केला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागताच, गृहखात्यानेही आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. हा आनंद भुजबळ सुटल्याचा नव्हे, तर पवारसाहेबांच्या इशाऱ्यामुळे आलेल्या तणावातून मुक्त झाल्याचा होता, हे प्रत्येक जण एकमेकास बजावून सांगत होता. भुजबळांच्या प्रकृतीची काळजी घ्या, असे शरद पवार यांनी बजावले होते. आता ती जबाबदारी आपोआपच त्यांच्या कुटुंबीयांवर जाऊन पडणार होती. सरकार त्या जबाबदारीतून मुक्त झाले होते. असे सारे आनंदाचे वातावरण सर्वत्र पसरले असतानाच एके सकाळी भुजबळपुत्र समीर यांनी वर्षांवर जाऊन पेढे वाटले. ‘त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या’.. पेढा तोंडात टाकतच मुख्यमंत्र्यांनी आस्थेने भुजबळपुत्रास सांगितले. मान हलवून समीरने त्यास दुजोरा दिला आणि ते तडक मातोश्रीवर पोहोचले. तोवर वाहिन्यांच्या प्रतिनिधींपर्यंत ही बातमी पोहोचली होती. सारे मातोश्रीच्या दिशेने धावले. समीरभाऊ आले, तडक मातोश्रीच्या खलबतखान्यात गेले. लगेचच उद्धवजीही दाखल झाले. समीरभाऊंनी अदबीने लवून त्यांना सलाम केला आणि उद्धवजींना जुने दिवस आठवले. पंचवीस वर्षांच्या ऋणानुबंधांच्या गाठी पुन्हा एकदा घट्ट होताहेत असे त्यांना वाटले आणि समीरभाऊंनी दिलेला पेढा तोंडात टाकत तेही म्हणाले, ‘त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या’.. जामीन मिळाल्याची बातमी टीव्हीवर येताच शरद पवारांनी फोन करून समाधान व्यक्त करतानाही तेच सांगितले होते. ‘प्रकृतीची काळजी घ्या’!.. ‘पडत्या दिवसां’नी दिलेल्या जिव्हाळ्याच्या अनुभवाने ते कुटुंब हळवे झाले होते..