दिवस असाच कुठलासा. साल बहुधा २०२७.. किंवा २०३३ ही असेल. मानव खूप थकला होता. हातातील बॅग फेकून सोफ्यावर स्वतला आदळवणार एवढय़ात मित्र पुढे आला. ‘सुस्वागतम’ म्हणत त्याने बॅग काढून घेतली हातातली. आवाजात योग्य तितकी काळजी आणत विचारले, ‘दमलास? चेहराच सांगतोय तुझा तसं.’ मानव वैतागून म्हणाला, ‘कंटाळा आलाय या सगळ्याचा. वाटतं, संपवावं सारं.’ मित्राच्या मेंदूत एका सेकंदात लक्षावधी विचारांची उलथापालथ झाली. कोटय़वधी समीकरणे मांडून झाली. हा आत्महत्या करतो की काय? त्यासाठी उपयुक्त अशी काही साधने घरात नाहीत ना? बॅगमध्ये विषाची बाटली? त्याच्या कॅमेऱ्यासारख्या डोळ्यांनी सारे सारे स्कॅन केले. तसे काही दिसले नाही. पण मित्राने स्वतशीच एक नोंद करून ठेवली. पोलिसांच्या संगणकाला याची माहिती दिली पाहिजे. त्याने पुन्हा विचारले, ‘बरं वाटत नाहीये का?’ प्रश्न तसा फालतूच होता. मित्राला माहीत होते, की मानवला कोणतेही दुखणे नाही. त्याचे सगळे वैद्यकीय अहवाल मित्राकडेच तर होते. पण असे विचारण्याची पद्धत होती. मानवने बसल्याबसल्या सोफ्यावर मान टेकवली. हताश आवाजात म्हणाला, ‘काय बरं आहे सांग बरं? बाहेर बघ. केवढी गर्मी. प्रदूषण. वाहतूक कोंडी. घरी येता येता नको होऊन जातं. या सरकारचं लक्षच नाहीये.’ मित्राला काही ते पटले नाही. कारण त्याच्या विचारांत ते बसतच नव्हते. पण तो चिडला नाही. शांतपणे म्हणाला, ‘सरकारची काहीच चूक नाही. हे बघ, त्यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत.’ समोरच्या मोठ्ठय़ा टीव्हीवर प्रदूषण नियंत्रण योजनांची छोटीशी चित्रफीत सुरू झाली. मग वाहतूक कोंडी हटविण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना करीत आहेत ते सांगणारी चित्रफीत लागली. मानव त्यात गुंगून गेला. दरम्यानच्या वेळात मित्राने मानवमधील बदल टिपला होता. सरकारविषयी त्याच्या मनातील भावना नोंदविल्या होत्या. त्याचा डेटा केंद्रीय संगणकात जमा झाला होता. मित्राने विचारले, ‘तुझ्यासाठी छानसे संगीत लावू का? तोवर तुझे जेवण गरम होईल.’ मानवच्या अत्याधुनिक संगीत व्यवस्थेवर सतारीचे मन मोहविणारे सूर झंकारू लागले. तसा मानव पुन्हा चिडला. ‘अरे काय हे मित्रा. हे काय उदासवाणे? बाजूच्या फ्लॅटमध्ये बघ कशी फक्कड गाणी वाजत असतात.’ तसा मित्र म्हणाला, ‘पण मला माहीत आहे, तुझ्या स्वभावासाठी हेच संगीत योग्य आहे रे. आपली प्रकृती, संस्कृती सारेच वेगळे आहे. आपण वाजवू नयेत तशी गाणी.’ मानव गप्प बसला. त्याला माहीत होते, आपण मनात आणले तरी हे बदलू शकणार नाही. यावर आता एकच उपाय आहे, या मित्राची बॅटरी संपली की त्याला रिचार्जच करायचे नाही. त्यावरून पोलिसांनी पकडले तरी चालले.. पण तसे होणार नव्हते. मित्राने आधीच पोलिसांना मानवच्या विचारांची कल्पना दिली होती. आता काही मिनिटांतच मानवला रुग्णालयात दाखल केले जाणार होते. तो दिवस असाच कुठलासा होता. साल बहुधा याच शतकातले होते..