‘आगामी निवडणुकांचे युद्ध हे सायबरयुद्ध असेल. त्यामुळे, प्रतिस्पध्र्यावर टोकदार हल्ले चढवा.  समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करणारी फौज आपल्या पक्षाकडे हवी..’  पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात पक्षाच्या सायबरयोद्धय़ांच्या संमेलनात केलेल्या या भाषणानंतर बराच वेळ तेथे घुमणाऱ्या टाळ्यांचा नाद कानात साठवतच अमितभाई मुक्कामी पोहोचले. उद्या तमिळनाडूत पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर काय बोलायचे याची टिपणे काढण्याआधी नेहमीच्या सवयीनुसार अमितभाईंनी डायरी काढली. काही क्षण ते डायरीकडे पाहात राहिले. आपण न चुकता डायरी लिहितो असे विनयजींनी आवर्जून आपल्या सायबरयोद्धय़ांना सांगितलेले असल्याने, आज तरी डायरी लिहिलीच पाहिजे, असा विचार करून त्यांनी डायरी उघडली. खिशातला मोबाइल काढला, पक्षाच्या सायबर सेलने ट्विटरवर पोस्ट केलेल्या दोन-चार आवडत्या वाक्यांवर त्यांची नजर खिळली आणि तीच वाक्ये डायरीत लिहायचे ठरवून त्यांनी पेनही उघडले. पण अचानक अमितभाईंचा विचार बदलला. त्यांनी डायरी मिटली व दुसरी डायरी बाहेर काढली. लहानपणीच चाणक्य वाचलेला असल्याने, पक्क्या डायरीत खरे काही लिहायचे नाही, हे त्यांना पक्के माहीत होते.  शिवाय, आपल्या राज्यात व्यापारी जशी पक्की पावती आणि कच्ची पावती अशी दोन पुस्तके सोबत ठेवून गिऱ्हाईकाचे हित पाहतात, तसे आपणही कच्ची डायरी आणि पक्की डायरी ठेवायची, असे त्यांनी पूर्वीच ठरविले होते.

चाणक्याच्या कच्च्या नोंदी पाहायला मिळाल्या तरी आणखी काय काय ज्ञान मिळेल, असाही विचार त्या क्षणी त्यांच्या मनात आला. असे काही वेगळेच विचार मनी घोळू लागले की अमितभाईंना नेहमीच चाणक्याची आठवण व्हायची. म्हणजे, अडीच हजार वर्षांपूर्वीच्या चाणक्याची! आजच्या चाणक्याची तर अमितभाईंना पुरेपूर ओळख होती. त्यामुळे, आपल्या मनात येणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर चाणक्याने काय केले असते, असा विचार करूनच अमितभाई पुढचे पाऊल टाकत असत. आजही, सायबरयोद्धय़ांना आक्रमक होण्याचा संदेश आपण दिला, तेव्हा त्यांना अडीच हजार वर्षांपूर्वीचा चाणक्यच नजरेसमोर दिसत होता. आज तो असता, तर त्याने आपल्या फौजेला हाच संदेश दिला असता, याबद्दल अमितभाईंच्या मनात तिळमात्रही शंका नव्हती. चाणक्याचे विचार आणि नीती आज अडीच हजार वर्षांनंतरही  तितकीच कालसुसंगत आहे, असे आपण काल बोलून गेलो, ते त्यामुळेच, हेही त्यांना आठवले आणि आज कच्च्या डायरीतच नोंदी करायच्या असे ठरवून त्यांनी कच्ची डायरी उघडली. अमितभाईंनी नोंदी पूर्ण केल्या. डायरी मिटून ठेवली आणि ते तमिळनाडूतील भाषणासाठीच्या नोंदीची उजळणी करू लागले. तिकडे पक्षाच्या नेतृत्वावरून वाद उफाळला आहे, असे कुणी तरी त्यांना अगोदरच सांगितलेले असल्याने, पुन्हा त्यांना चाणक्य आठवला. अशा स्थितीला चाणक्याने कोणता तोडगा  काढला असता, असा विचार ते करू लागले आणि कानपिचक्या हा शब्द त्यांना आठवला.  पण त्याहूनही अधिक काहीतरी उद्या कार्यकर्त्यांना पाजायचे, असे त्यांनी ठरविले  आणि सोबतच्या कार्यकर्त्यांस खूण केली. आजचा दिवस संपला होता. अमितभाईंना शांत झोप लागली होती.

सकाळी ठरल्यानुसार अमितभाई तमिळनाडूकडे जाण्याकरिता तयार झाले. आज आपले सायबरयोद्धे जोरदार शस्त्रे परजत असतील, याविषयी त्यांच्या मनात शंकाच नव्हती. मनात असा विचार करतच त्यांनी ट्विटर खाते उघडले आणि त्यांना धक्का बसला. आपल्या संदेशाचे विरोधकांनीच जोरदार अनुकरण केले, असे  त्यांना जाणवले. ‘गो बॅक अमितभाई’ हा हॅशटॅग सर्वाधिक ट्रेंडिंग होता.. अमितभाईंना  राग  आला. ते अस्वस्थ झाले आणि विचार करू लागले..  अशा परिस्थितीत चाणक्याने काय केले असते?