X

संस्कृतिरक्षणाचा ‘साहसी खेळ’..

मुंबईच्या घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनी तर या सणास एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. ‘

प्रत्येक नव्या वर्षांगणिक नवी झळाळी आणि- नवा वादही- सोबत घेऊन येणारा दहीकाल्याचा सोहळा यंदाही ‘संस्कृतीचे नावीन्यपूर्ण दर्शन’ घडविणारा ठरल्यामुळे, संस्कृती आणि परंपरांचे यथोचित पालन झाल्याच्या भावनेने संस्कृतिरक्षकांनी स्वत:स धन्य मानले असेल, यात शंका नाही. मुळात, आमचे सण-उत्सव आम्ही आमच्या संस्कृतीप्रमाणेच साजरे करणार, त्यात खोडा घालणाऱ्या कोणाचीही- न्यायालयांचीसुद्धा- आम्हाला पर्वा नाही आणि त्यांनी तसा प्रयत्न केला तरी तो उधळून लावणार, हा खास मराठी बाणा या सणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जगाला दाखविता आला हे तर चांगले झालेच, पण ‘संस्कृतिरक्षणा’च्या या आगळ्या सोहळ्यास सरकारने, काही ठिकाणी खुद्द मुख्यमंत्र्यांनीही हजेरी लावून आशीर्वाद दिले हे त्याहून बरे झाले. या सोहळ्याच्या निमित्ताने मराठी तरुण आपल्या समस्या एक दिवसापुरत्या का होईना विसरून जातो आणि ‘आपली संस्कृती नव्या बदलांचा किती सहजपणाने स्वीकार करते’ याचे मनोज्ञ दर्शन घडविण्याच्या कर्तव्यात कोणतीही कसूर न ठेवता आपल्या परीने होईल तो आपला वाटा इमानेइतबारे उचलतो हेदेखील दहीकाल्याच्या सोमवारच्या सणाने गाठलेल्या उच्च सांस्कृतिक उंचीवरून सिद्ध झाले आहे. साहस, ऊर्जा आणि उत्साह यांचा त्रिवेणी संगम साधण्याच्या या मुहूर्तास बाधा आणण्याचा प्रयत्न काही विरोधकांनी करून पाहिला, पण या साऱ्या उत्साहावर विरजण पडू नये यासाठी सरकारने न्यायालयापासून माध्यमांपर्यंत सर्वत्र आश्वासनांची आतषबाजी करून त्यांना अंधारात ठेवण्याचे जे काही कसब दाखविले, त्याबद्दल तमाम मराठी तरुणाईने सरकारचे कृतज्ञ राहिले पाहिजे. थरांची उंची, चौदा वर्षांखालील बालकांना काल्याच्या थरात सहभागी होण्याची मनाई, मॅट-हेल्मेटादी सुरक्षा उपायांची अंमलबजावणी आदी जाचक नियम घालून आपल्या सण साजरे करण्याच्या अधिकार आणि परंपरेवर घाला घालण्याच्या प्रयत्नांना सरकारचा सक्रिय पाठिंबा नाही, हे गुपित या निमित्ताने उघड झाल्याने, हे संस्कृतिरक्षकांचे सरकार ठरले आहे, यातही शंका राहिलेली नाही. वेगवेगळ्या पथकांच्या मंडपांमध्ये आधुनिक गीतांच्या तालावर थिरकणारे गोविंदा आणि गलेलठ्ठ मानधन घेऊन मंचावर नाचणाऱ्या नटनटय़ांमुळे यंदाचा हा सोहळा अधिकच रंगतदार झाला असून, प्रसारमाध्यमांनी तो जसाच्या तसा जगभर दाखविल्याने, आपल्या संस्कृती आणि परंपरेची जगाला नेमकी ओळखही झाली आहे. यापुढेही अशाच दिमाखात असे सोहळे पार पडावेत, त्यावर सरकारने अशीच मेहेरबानी दाखवावी, मुख्यमंत्र्यांनीही एकाच नव्हे तर अनेक व्यासपीठांवर दिसावे. या संस्कृतिरक्षणाच्या ‘साहसी खेळा’साठी मुंबई, ठाण्यासारख्या महानगरांतील व्यासपीठे आहेतच, पण महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या डोंबिवलीनेही यंदा पुढाकार घेतल्याने, संस्कृती संवर्धनाच्या सोनेरी इतिहासात नवे पान लिहिले गेले आहे. मुंबईच्या घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनी तर या सणास एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. ‘एखादी पोरगी पसंत असेल तर तिला पळवून आणून तुमच्या हवाली करेन’, अशी जाहीर ग्वाही त्यांनी याच उत्सवाच्या मंचावरून दिली. मदतीसाठी अशी तत्परता दाखविणाऱ्या एका संस्कृतिरक्षक लोकप्रतिनिधीची नवी ओळख याच सोहळ्यातून समाजाला झाली आहे.. सांस्कृतिक सोहळ्यांचा याहून उत्कट आविष्कार कोणता असू शकतो?

First Published on: September 5, 2018 1:02 am