डिंकाचे लाडू, मेथीचे वडे, ज्वारीचा हुरडा आणि सामिषच हवे असेल तर कोंबडी मटणाचा सावजी बेत ही गुलाबी थंडीत नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची आधीची ओळख. थंडीत गारठणाऱ्या शरीराला ऊब हवी म्हणून सारेच या भोजनसंस्कृतीच्या प्रेमात असायचे. तेव्हा अधिवेशनही बराच काळ चालायचे. त्यामुळे बेतही चवीने ठरवले जायचे. राजकारणात वेगाला महत्त्व आले आणि हळूहळू या ‘उबदार’ गोष्टी मागे पडत गेल्या. आता खाण्याऐवजी दिसण्याला महत्त्व आले. त्यामुळे पोटात काय यापेक्षा अंगावर काय, हा प्रश्न साऱ्यांना महत्त्वाचा वाटू लागला. ज्याची चर्चा होऊ शकते ते करायचे ही वृत्ती राजकारण्यांच्या अंगवळणी पडल्याने यंदाच्या अधिवेशनात दिसणे हाच चर्चेचा विषय झाला. आपल्याकडे विविध राजकीय पक्षांचे नेते व त्यांचे पेहराव याचेही समीकरण आजवर ठरून गेलेले. काँग्रेसचा पुढारी म्हटले की गांधीटोपी, शुभ्र कपडे, त्यात खादीचे असतील तर उत्तम, भाजप व शिवसेना म्हटले की पेहरावात भगव्या रंगाची छटा ठरलेली. राष्ट्रवादी हे काँग्रेस संस्कृतीचेच लघुरूप. त्यामुळे त्याही पक्षाच्या नेत्यांवर काँग्रेसी पेहरावाचाच पगडा आजवर आपण बघितलेला. यावेळचे अधिवेशन या समजुतीला तडा देणारे ठरले. या वेळचे अधिवेशन या समजुतीला तडा देणारे ठरले. कदाचित वैचारिक भूमिकांना तिलांजली देत स्थापन झालेल्या सरकारचा हा परिणाम असावा. या वेळी थंडीचा फायदा घेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पेहरावाने घेतलेले आधुनिक रूप काहींना सुखावणारे तर काहींना खुपणारे ठरले. एरवी राष्ट्रवादीची मंडळी कायम सफारी सूटमध्ये दिसायची. एकटे दादा त्याला अपवाद असायचे. या वेळी दादांनीच जोधपुरीला जवळ केले. आता नेताच बदलतो आहे म्हटल्यावर त्यांचे निकटवर्तीय तरी कसे मागे राहणार? म्हणून मग नवनव्या पेहरावाची लाटच सध्या राष्ट्रवादीच्या वर्तुळात आलेली दिसते. विरोधी बाकावर असताना पांढऱ्या झब्ब्यात वावरणारे धनंजयराव पोक्त दिसायचे. या वेळी त्यांनीही तरुणाईची आठवण करून देणारे हाफ जॅकेट घालून सत्ता सुखावणारी असते याचेच संकेत दिले. तुरुंगवारी घडायच्या आधी काळ्याभोर केसात वावरणारे छगनराव देखणे दिसायचे. रंगीबेरंगी कोट व मफलर हे तेव्हाही त्यांचे वैशिष्टय़ होते व आताही आहे. फक्त केसांना रंगवणे त्यांनी सोडून दिले आहे. मधल्या काळात जे भोगले त्याच्या खुणा सहजासहजी कशाला पुसायच्या म्हणून जे भोगले तेच भावनिक राजकारणाचा भाग ठरू शकते हे कदाचित त्यांच्या अंतर्मनाने जाणले असावे. ज्यांच्यामुळे राष्ट्रवादीला हे सत्तेचे सुख मिळाले ते थोरले पवार मात्र त्यांच्या नेहमीच्याच पेहरावात वावरताना दिसले. केवळ पाऊसच नाही तर थंडीचाही आपल्यावर काडीमात्र फरक पडत नाही हेच त्यांना कदाचित जाणवून द्यायचे असावे. मुख्यमंत्रिपदाचे ओझे काय असते हे क्षणाक्षणाला अनुभवत असल्याने उद्धवजींना पेहरावाकडे फार लक्ष देण्यासाठी कदाचित वेळ मिळाला नसावा. त्यामुळे त्यांचे दिसणे आधी होते तसेच आहे. भाजपलासुद्धा भगव्या रंगाची भारी हौस. त्यांनी सावरकरांचे निमित्त साधून ती भागवून घेतली. बाकी देशात मोदीराज आल्यापासून सदऱ्यावर चढलेल्या विविधारंगी जॅकेटने सर्वपक्षीयांनाच भुरळ पाडलेली दिसते. बहुसंख्य नेते आता जॅकेट घालून असतातच. याला काँग्रेसीसुद्धा अपवाद नाहीत. या बदलाच्या वेगात बळी गेलाय तो गांधीटोपीचा. ती जवळजवळ हद्दपार झालेली दिसते. नेते, आमदार तर ती अभावानेच वापरताना दिसतात. विधिमंडळ परिसरात वावरणारा एखादा गावातला कार्यकर्ता तेवढा ही टोपीवरची निष्ठा टिकवून ठेवताना दिसतो.

चोवीस तास बातम्यांचा रतीब पाडणारी माध्यमे जोडीला आल्यावर खाण्याऐवजी दिसण्याला प्राधान्य दिले तर बिघडले कुठे, असाच प्रश्न या पेहराववादी नेत्यांच्या मनात येत असेल तर त्यात चूक काय? गावरान वाणाची ज्वारी, डिंकाचे लाडू या चार भिंतींआडच्या वस्तू ठरल्या. त्याला महत्त्व मिळणार नाही एवढे चाणाक्षपण या वेगाने राजकारण्यांना शिकवले हेही नसे थोडके!