12 December 2018

News Flash

परी अंगी नाना कळा..

राजकारण हे येरागबाळ्याचे काम नव्हे.

राजकारण हे येरागबाळ्याचे काम नव्हे. या क्षेत्रात येण्यासाठी शिक्षणाची अट नाही; पण यशस्वी नेता व्हायचे असेल, तर नाना कळा अंगी असणे आवश्यक असते. त्या कळा जोपासण्यासाठी कष्टपूर्वक सराव करावा लागतो. ज्यांनी आपल्या अंगीच्या कळा आणि कला जोपासल्या, ते कमालीचे यशस्वी झाले. या यशाची आणखी एक मेख असते. ज्या क्षेत्रासाठी राजकारण करायचे, त्या क्षेत्राची नेमकी नस पकडावी लागते. महाराष्ट्राच्या राजकारणाची नस ग्रामीण भागाशी जोडलेली आहे. ‘सुटाबुटातले सरकार’ येथे पचत नाही.  शेकडो कोटींची संपत्ती असूनही अंगावर साधी खादी चढविणारा आणि डोक्यावर टोपी चढवून दाढीचे खुंट राखणारा ग्रामीण अवतारातील नेता मतदाराचे मन जिंकतो. अशा दिखाऊ साधेपणात, राजकारणातली छुपी श्रीमंती असते. अशा अनेक कलांनी संपन्न झाले, की बहुरूपी कलादर्शनाची स्पर्धा लागते. कुणी पोतराजाच्या वेशात सभागृहात दाखल होतात, तर कुणी गळ्यात कांद्याची माळ मिरवतात. कुणी वारकऱ्यांच्या वेशात विठूनामाचा गजर करतात, तर कुणी पालखी मिरवतात. मागे देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांनी सिंचनाच्या ७० हजार कोटींच्या घोटाळ्याची कागदपत्रे बैलगाडीतून मिरवत नेली होती. असे काही वेगळे केल्याने कला प्रदर्शनाची संधी मिळते, आपला नेता आपल्यासाठी काही करतो, याचे मतदारास समाधान मिळते आणि मतदाराची दाद मिळून नेत्यासही हुरूप येतो. शिवाय, त्याची बातमीही होते. अशा कलादर्शनाच्या अनेक बातम्यांची फाईल ही कोणत्याही पदव्यांच्या फायलीहून जड झाली, की नेतेपदाची झूल अंगावर आपोआप चढते, आणि कार्यकर्त्यांचा नेता होतो. सध्या देशात आणि राज्यातही तरुणांसाठी राजकारणात नव्या संधी दारे ठोठावत आहेत. म्हणून इथे प्रवेश करण्याची इच्छा असलेल्यांनी या अभ्यासक्रमाचा गृहपाठ करायला हवा. प्रात्यक्षिके अनुभवायला हवीत. मुंबईत मंत्रालयाच्या आसपास ही प्रात्यक्षिके अवचित पाहावयास मिळतात. मंत्री-आमदाराशी ओळख काढून विधिमंडळाच्या मुंबई वा नागपूर अधिवेशनाचा पास मिळविल्यास अभ्यासक्रमाची सारी पुस्तके हात जोडून समोर उभी राहतात. उद्याचा नेता होण्याची स्वप्ने पाहणारा कुणी काल-परवा नागपुरात असता, तर कलादर्शनाचा एक धडा अनुभवता आला असता. काठी नि घोंगडं घेऊन धनगराच्या वेशात सभागृहात अन्यायाचा पाढा वाचणाऱ्या विरोधी आमदारांनी आपल्या कलागुणास परंपरेची जोड दिली, आणि प्रयोग हाऊसफुल वठविला. जयंतराव पाटील यांनी सरकारच्या दरबारी धनगराच्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांचा प्रश्न अभ्यासपूर्वक मांडणाऱ्या क्रांतिबांनी पंचम जॉर्जच्या दरबारात शेतकऱ्याच्या वेषात हजेरी लावली होती. अन्यायाकडे लक्ष वेधण्याची ही शतकोत्तर वाटचाल सरकारच्या दरबारात केवळ कलागुणदर्शनापुरती राहू नये म्हणजे झाले!

First Published on December 22, 2017 2:53 am

Web Title: politics of india