23 February 2019

News Flash

प्रदूषित राजधानी..

राजधानी दिल्लीच्या हवेचा दर्जा यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिकच खालावला.

राजधानी दिल्लीच्या हवेचा दर्जा यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिकच खालावला.

राजधानी दिल्लीच्या हवेचा दर्जा यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिकच खालावला. अजिबातच अनपेक्षित नसलेली ही बातमी वरवर पाहता धक्कादायक वाटण्याचेही काहीच कारण नाही. तसेही, गेल्या तीन वर्षांपासून दिल्लीच्या हवेत विचित्र आणि अनपेक्षित चढउतार होतच होते.  तरीही, प्रदूषण ते प्रदूषणच. त्याचा विषारी विळखा पडला, की घुसमट ही होणारच.. मोकळा श्वासदेखील महाग व्हावा अशी परिस्थिती असलेल्या राजधानीच्या शहरातील हवेची ही दुरवस्था असेल, तर देशाच्या अन्य भागांतील हवा हवीहवीशी वाटण्याएवढी चांगली राखणे कुठल्याच यंत्रणेला शक्य नसणार, हे ओघानेच येते. राजधानीतील हवेचा दर्जा तसाही कायम यथातथाच असतो. कधी त्या हवेत प्रदूषणाचे प्रमाण वाढते, तर कधी प्रदूषित वातावरणामुळे साथीचे आजार बळावतात. कधी कडाक्याच्या उन्हाळ्यातही हवेत सर्वत्र धुक्यासारखे धुराचे पडदे निर्माण होऊन दूरचेच नव्हे, तर जवळचे, अगदी बाजूचेही दिसणे दुर्लभ होऊन जाते. माणसाला माणूस ओळखता येईनासा होतो. रस्तेही अंदाजानेच कापावे लागतात आणि अपघात होण्याची शक्यताही बळावते. एकूणच, सभोवतालची दृश्यमानता कमी झाल्याने आणि हवामानातील चढउतार असह्य़ होऊ  लागल्याने, हवाच बदलली, की आपल्या दृष्टीतच दोष निर्माण झाला हे उमगेनासे होऊन स्वभावातील खेळकरपणा हरवतो व स्वभावातील चिडचिडेपणा अधिकच वाढतो. मग भांडय़ाला भांडी लागतात, संघर्ष तीव्र होतात. हवेतील अशा विकारी बदलांपासून बचावण्यासाठी किंवा त्याला सरावण्यासाठी राजधानी गेल्या तीन वर्षांपासून स्वयंप्रेरणेने प्रयत्न करीत असली, तरी प्रत्येक वर्षी प्रदूषणाची पातळी वाढतच असून यंदा तर प्रदूषणाने कमाल पातळी गाठल्याने दिल्लीची हवा हा एक चिंताजनक चर्चेचा विषय होऊन गेला आहे. खरे तर, दिवाळीचा मोसम म्हणजे गुलाबी थंडीचा, दवभरल्या धुक्याची चादर लपेटून उगवणाऱ्या पहाटेचा आणि त्यातून वाट काढत धरतीवर अवतरणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांनी प्रफुल्लित होण्याचा हंगाम.. पण राजधानीतील लहरी हवामानाने ही स्वप्ने केव्हाच पुसून टाकली आहेत आणि आता तर त्यामध्ये प्रदूषणाची भर पडली आहे. दिल्लीच्या हवेला आता दवभरल्या धुक्याच्या ऐवजी प्रदूषित धुराचा विळखा असतो. अहोरात्र कानावर आदळणाऱ्या आवाजी गोष्टींमुळे मनामनांवर ध्वनिप्रदूषणाचे आघात सुरू असतात. अशा संकटकाळी दिवाळीच्या सणाची भर पडण्याची भीती अगोदरच ओळखून न्यायालयाने फटाके विक्रीला बंदी घातल्याने, वायू आणि ध्वनिप्रदूषणात भर पडणार नाही या समाधानाने दिल्लीकरांना हायसे वाटले असले तरी बिघडलेल्या हवेपासून सुटका नाही, हे स्पष्ट झाले आहे. राजधानीतील प्रदूषणाची कारणे काहीही असोत, ते आटोक्यात आणण्याचे उपाय सध्या तरी आवाक्याबाहेरचेच असल्याचे दिसत आहे. राजधानीवर दाटलेला धुराचा असा प्रदूषणकारी पडदा दूर व्हायचा असेल, तर सुज्ञपणाने वागायला हवे, एवढे भान जनतेला आले तर?..

First Published on October 23, 2017 2:03 am

Web Title: pollution in delhi soars after diwali despite ban on firecrackers