म्हणजे आता आम्हांला आमच्या थोर विचारवंत,  सुविद्य ताईसाहेब आणि भारतातील युवा पिढीच्या भाग्यविधात्या सुश्री पूनमजी महाजन यांचे अभिनंदन करणे भागच आहे. ते यास्तव नाही, की इतक्या लहान वयात त्यांनी आभाळाला हात टेकण्याएवढे यश प्राप्त केले आहे. ते त्यांनी मिळवलेच आहे. ते याहीस्तव नाही, की एवढय़ा लहान वयात त्यांनी असामान्य व प्रगाढ विद्वत्ता प्राप्त केली आहे. त्या निवडून आल्या यातूनच त्यांच्या पांडित्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे ताईसो कुठेही गेल्या तरी त्यांच्या प्रज्ञेचा, बुद्धिमत्तेचा प्रकाश दिसतोच आपणांस. परवाच तो दिसला भाजपच्या युवा संवाद यात्रेत. त्यांचे अभिनंदन करणे भाग आहे ते त्यामुळेच, की त्यांनी तेथे स्वाभाविक विनम्रपणे ‘साहित्य आणि साहित्यिकांचे प्रयोजन’ या गहन विषयाबद्दल मूलभूत विचार मांडले. महाराष्ट्रात यापूर्वी ‘कलेसाठी कला’ की ‘जीवनासाठी कला’ असे वाङ्मयीन वाद घडले. अत्रे, फडके, खांडेकर, कुरुंदकर अशा अनेकांनी त्यावर काहीबाही लिहूनही ठेवले. परंतु एकतर यातील कोणीही खासदार वगैरे नसल्यामुळे त्यांचे आकलनच कमी पडले.  त्या वेळी ताईसो असत्या, तर त्या वादावर केव्हाच पडदा पडला असता, की साहित्यिकांचे प्रयोजन असते ते केवळ सकारात्मक गोग्गोड साहित्य लिहिणे हे. त्यांनी राजा काय करतो, प्रजा काय करते यावर फालतू भाष्य करायचे नसते. अहाहा! हाच अभूतपूर्व विचारप्रकाश काही काळापूर्वी या भूमीत फाकला असता, तर नक्कीच येथे काही वेगळा इतिहास घडला असता. म्हणजे स्वा. सावरकरांनी राजा काय करतो हे पाहण्याऐवजी सकारात्मक काव्यलेखनास अधिक वेळ दिला असता. त्यायोगे साहित्यशारदेची मोठीच सेवा झाली असती त्यांच्या हातून. हा विचारप्रकाश आधीच पडला असता, तर दुर्गाबाईंसारख्या विदुषीला उगाच यशवंतरावांशी टक्कर द्यावी लागली नसती की पुलंना त्या वेळी आणीबाणीविरोधात भाषणे देत बसावे लागले नसते. पुढेही ते राजा काय करतो हे पाहायला गेले आणि उगाच शिवसेनेला चार शब्द सुनावत बसले. तेव्हा ताईसो असत्या तर त्यांनी सावरकरांपासून पुलंपर्यंत सर्वाना हेच सांगितले असते, की- भो साहित्यिकांनो, फालतू भाष्ये का बरे करता? ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी शिकावे, आंदोलने करू नयेत, पत्रकारांनी भाट बनावे, टीकाकार होऊ  नये,  त्याचप्रमाणे साहित्यिकांनी गुपचूप लिहावे, लोकांना सकारात्मक हसवावे, आम्हांला मतदान करावे, पुरस्कार वगैरे घ्यावेत आणि गप्प बसावे. साहित्य आणि जीवन यांत संबंध कशाला ठेवावा? त्यांनी फक्त सत्ताधाऱ्यांच्या कलाने वागावे. हा ‘कलेसाठी कले’च्याही पुढे जाणारा ‘कलाकलाने कला’ असा नवसाहित्यविचार आहे. तो थेट साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणाच्या संदर्भात मांडून ताईंनी अ. भा. मराठी वाङ्मयटीकेत जी नवी भर घातली, त्याबद्दल त्यांचे खरे तर ध्वजयात्रा काढूनच अभिनंदन करावयास हवे. या संदर्भात यापुढे कोणतेही फालतू भाष्य न करता आम्ही ताईसोंना एकच सकारात्मक सूचना करू इच्छितो, की त्यांनी कृपया लोकप्रतिनिधींना हा विचार सांगू नये. कारण तसे झाल्यास मग त्यांची फालतू भाष्ये अगदीच बंद होतील. जनतेच्या मनोरंजनाच्या हक्कावर ताईसोंनी कृपया अशी हायहील टांच आणू नये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poonam mahajan express view on literature
First published on: 26-02-2018 at 04:47 IST