‘राजा’ म्हणून वावरत असले, तरी मुळातच आजकाल वाघांचे दिवस काही फारसे बरे नाहीत. ज्यांनी एके काळी आपल्या डरकाळ्यांनी आसमंत दणाणून सोडला, ज्यांच्या केवळ अस्तित्वाच्या चाहुलीने अवघे रान थरारून उठत असे, आणि ज्यांच्या केवळ लांबून होणाऱ्या दर्शनासाठी असंख्य लोक रात्रीचे दिवस करून ताटकळत राहिले, ते वाघ केविलवाणे होतात, ही काही व्याघ्रप्रेमी महाराष्ट्रासाठी आणि जबडय़ात हात घालून वाघाचे दात मोजेन म्हणणाऱ्या राज्यकर्त्यांसाठी फारशी फुशारकीची बाब नाही. राज्यातील वाघांच्या शेळ्या झाल्या की काय असे वाटावे अशीच ही स्थिती! विदर्भाच्या जंगलात तर अलीकडे वाघांवर संक्रांतच आली आहे. असंख्य प्रेक्षकांचे (पक्षी- पर्यटकांचे) आकर्षण ठरलेला जय नावाचा एक उमदा वाघ अकाली गायब झाला, त्याला आता पावणेदोन वर्षे लोटली. तेव्हापासून या वाघाचे दर्शन दुर्मीळच झाले, आणि वाघांचे राज्य असलेला हा प्रदेश सुनासुनाच झाला. पण या बेपत्ता जयचा बछडा मात्र, याच जंगलात दिसामासाने वाढतो आहे, हे येथील वनप्रेमींना आणि जंगल निरीक्षकांना ठाऊक होते. त्यामुळे, आज ना उद्या पुन्हा या जंगलात वाघाचे दिमाखदार दर्शन होणार  अशी शक्यता गृहीत धरून राज्यकर्त्यांनीही व्याघ्रसंवर्धनाची मोहीम उघडली, थेट मंत्रालयाच्या ‘सेल्फी पॉइंट’वर फायबरची उग्र व्याघ्रमूर्ती स्थानापन्न केली आणि हरेक मंत्रिकक्षातही व्याघ्रदर्शनाची सोय केली. खुद्द वनमंत्र्यांनी जातीने जाऊन मातोश्रीवरही व्याघ्रमूर्तीची स्थापना केली. तिकडे विदर्भाच्या जंगलातील जय बेपत्ता झाला, त्याच दरम्यान इकडे प्रकाश मेहता नामक एका मंत्र्याने वाघ नामशेष झाल्याचा चिमटा काढला आणि पाठोपाठ मुनगंटीवारांनी तर मंत्रालयात व मातोश्रीवर वाघाचे पुतळेच बसविले. आता वाघ पुतळारूपातच पाहायला मिळणार, अशा शंकेने वनप्रेमींची मने कासावीस झाली. पण जयच्या बछडय़ाने आपले अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली. जंगलात पुन्हा वाघाच्या पाऊलखुणा उमटू लागल्या, आणि वनप्रेमींचा जीव भांडय़ात पडला. पण हा बछडा मात्र अजूनही तसा ‘बच्चा’च आहे. वाघाच्या केवळ डरकाळीने जंगलातील प्राणी थरथरू लागतात, आणि सावज हेरून वाघ शिकार साधतो. हा बछडा मात्र, गोसेखुर्दच्या कालव्यात बेसावधपणे पडलेल्या रानडुकरांच्या मोहापायी कालव्याच्या काठाशी घुटमळू लागला आणि शेवटी अतिलोभापायी जे होते तेच त्याचे झाले. तो पाण्यात पडला. गटांगळ्या खाऊ लागला, आणि संकटातून वाचण्यासाठी केविलवाणे प्रयत्न करू लागला. अनुभवी वाघांना पाण्याचे भय नसते. हा बछडा मात्र, पाण्याच्या भयाने गलितगात्र झाला, आणि अखेर माणसांच्या मदतीने त्याला बाहेर काढावे लागले. एका वाघाच्या सुटकेचा हा प्रसंग याचि डोळा अनुभवणाऱ्या बघ्यांच्या गर्दीने त्या वेळी आनंद व्यक्त केला, की धूम ठोकणाऱ्या वाघाची हुर्यो केली हे समजायला मार्ग नाही. पण एक वाघ धूम ठोकून पळतो हे पाहून जंगल मात्र कसेनुसे झाले असेल, यात शंका नाही..