‘बाबा, आता काही तरी धोरण ठरवायला हवे!’ भोजन घेताना ताटातील तंगडीची हड्डी दाताखाली मोडत चिरंजीव म्हणाले, आणि बाबांनी चमकून चिरंजीवांकडे बघितले. ‘ते धोरणबिरण मला सांगू नको.. थोरले साहेब म्हणायचे, आपण बांधू ते तोरण, आणि आपण ठरवू ते धोरण. तेव्हा तू चिंता करू नको. माझा सैनिक हेच माझे तोरण, आणि सैनिक म्हणेल तेच माझे धोरण!’.. बाबांनी दोन्ही हात उंचावले.  चिरंजीव अविश्वासाने बाबांकडे पाहात होते. त्यांनी हट्ट सोडला नाही. ‘तसं नको आता.. काळ बदललाय. आता लोक शहाणेपण झालेत.. तेव्हा त्यांना पटेल असे काही तरी धोरण ठरवू या..’ बाबांनी घास गिळला. पाण्याचा एक घोट घेतला, आणि मागे पाहिले. लगेच मिलिंदराव पुढे आले. बाबा त्यांच्या कानात काही तरी पुटपुटले. ..‘काळ बदललाय हे खरंच!’.. बाबा चिरंजीवांकडे पाहून म्हणाले. तोवर मिलिंदराव फोन हातात घेऊन मागे उभे होते. बाबांनी फोन कानाला लावला, आणि पलीकडे कुणाशी तरी हलक्या आवाजात बोलले. ‘ठीक आहे, ठरवू या धोरण’.. बाबा म्हणाले आणि चिरंजीवांनी पुन्हा एक हड्डी दाताखाली तोडून आनंद व्यक्त केला. बंगल्याच्या वरच्या मजल्यावर खलबतखान्यात चर्चेची तयारी सुरू झाली होती. दुसरा दिवस उजाडला. कुणी तरी खास पाहुणा येणार, याची कुणकुण एव्हाना सर्वानाच लागली होती. ..आणि तो पाहुणा आला. चिरंजीवांनी आणि बाबांनी त्याचे गुच्छ देऊन स्वागत केले आणि खलबतखान्यात बंद दरवाजाआड चर्चा सुरू झाली. चिरंजीव, बाबा आणि पाहुणा यांच्याव्यतिरिक्त कुणीच तिथे नव्हते. संजयकाकाही नव्हते. चर्चा सुरू झाली. ‘येत्या निवडणुकीत नक्की विजय मिळायला हवाच, पण मुख्यमंत्रीही आपलाच असायला हवा’.. बाबांनी पाहुण्यांना सांगितले. ‘होईल.. तसेच होईल. करू या तसे धोरण तयार!’ पाहुणा म्हणाला. मग पाहुण्याने एक फाईल उघडली. कागदावर काही तरी आकडेमोड केली. लॅपटॉपवर नजर फिरवली आणि नकारार्थी मान फिरविली. बाबा आणि चिरंजीवांना उगीचच टेन्शन आले. पाहुणा हसला. ‘सत्ता हवी तर युती करायला हवी. आघाडीत राहायला हवे. आकडय़ाचा मुद्दा महत्त्वाचा नाही’.. पाहुणा म्हणाला आणि बाबांचा चेहरा पडला. ‘सगळेच तसं म्हणायला लागलेत!’. बाबा पुटपुटले. पुन्हा गुप्त चर्चा सुरू झाली. बऱ्याच वेळानंतर धोरण आकार घेऊ लागले होते. ‘आता हे अमलात आणायचे, तर आधीचे धोरण बदलायला हवे’.. बाबा म्हणाले आणि पाहुण्याने काही तरी कानमंत्र दिला. लगेचच निरोप गेले आणि बंगल्यावर मनसबदारांची बैठक सुरू झाली. त्यांनाही तेच हवे होते.  काम सोपे झाले होते. ‘आमच्याकडे लोकशाही आहे, आम्ही सर्वाचा विचार लक्षात घेऊन धोरण ठरवतो, असे जाहीर करा, म्हणजे पहिले धोरण बदलणे सोपे होईल.’ पाहुणा म्हणाला आणि सारे मनसबदारही खूश झाले. पाहुण्याच्या मध्यस्थीने नवे धोरण आकाराला येणार याची खात्री त्यांना पटली आणि सारे आनंदाने घरी परतले. पाहुण्याने ट्वीट केले, ‘सारे मिळून आघाडीचे हात बळकट करू या आणि विजय मिळवू या!’.. लगेचच ‘बीजेपीन्यूज’ने ते ‘रीट्वीट’ केले. तिकडे अमितभाईंनी ते वाचले, आणि समाधानाने हसून त्यांनी पाहुण्याच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ‘उंचावलेला अंगठा’ पाठवून दिला..