12 August 2020

News Flash

पुन्हा सचिवालय..

मंत्रालयाशी जडलेल्या नात्याच्या धाग्याचे कोणतेच टोक राजभवनपर्यंत याआधी कधीच पोहोचलेले नसल्याने, ती अवघी टेकडी त्रयस्थच वाटत असते.

(संग्रहित छायाचित्र)

 

राज्याच्या कानाकोपऱ्यांतील मातीत मळलेली असंख्य पावले ज्या वास्तूच्या आवारात आजवर वावरली; इथे विलंब असला तरी अंधार नाही, अशा भाबडय़ा समजुतीत आजवर ज्यांनी असंख्य वेळा हेलपाटे घातले; आपला आवाज, आक्रोश, गाऱ्हाणे कधी तरी मंत्रालयाच्या दगडी भिंती ओलांडून मंत्र्यांच्या दालनात घुमेल आणि न्याय मिळेल या अपेक्षेने मुंबईतल्या मुक्कामापुरती शिदोरी सोबत घेऊन आणि गरजेपुरती रक्कम कनवटीस बांधून मंत्रालयाच्या ओढीने मुंबई गाठणारा गावकरी आज गोंधळून गेला आहे. आपल्या गाऱ्हाण्यांची फाइल खांद्यावरच्या पिशवीत वागवत कुणा मंत्र्याच्या दालनाबाहेर तासन्तास ताटकळल्यानंतर निवेदनावर झालेली मंत्र्याची सही पाहून समाधानाने गावाकडे परतण्याची सवय झालेला गावकरी, आता आपले गाऱ्हाणे कुणाकडे मांडायचे, या विचाराने ग्रासला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर महिनामहिना धरणे धरून सरकारच्या आश्वासनाकडे डोळे लावून बसलेल्या अन्यायग्रस्त कुटुंबांच्या आशेवर आता नजर कुणाकडे वळवावी या चिंतेचे पाणी पडले आहे. संध्याकाळी पाय मोकळे करण्यासाठी फिरत फिरत नरिमन पॉइंटच्या समुद्रकिनारी बसल्यावर लांबवर दिसणाऱ्या समुद्रात घुसलेल्या एका टेकडीवर फडकणारा भव्य तिरंगा मावळतीच्या उन्हात अधिकच उजळतो आणि नजर तिकडे स्थिरावते. तेथे राजभवन आहे, एवढेच त्या गावकऱ्यास माहीत असते. मंत्रालयाशी जडलेल्या नात्याच्या धाग्याचे कोणतेच टोक राजभवनपर्यंत याआधी कधीच पोहोचलेले नसल्याने, ती अवघी टेकडी त्रयस्थच वाटत असते. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि ‘मंत्रालय’ या नावाने ओळखीच्या असलेल्या वास्तूतून मंत्री गायब झाले. दालने कुलूपबंद झाली.. त्यांना दिलेल्या निवेदनांचे काय होणार, आपल्या गाऱ्हाण्यांच्या फायलींचे भविष्य काय असणार, या चिंतेने लांबवर टेकडीवरच्या राजभवनाकडे विषण्णपणे पाहणारा कुणी तरी समुद्राच्या किनाऱ्यावरूनच खांद्यावरल्या पिशवीतील गाऱ्हाण्यांची भेंडोळी नकळत उघडतो आणि त्यावर नजर फिरवून पुन्हा त्याची गुंडाळी करून पिशवीत ठेवतो. राजभवनाच्या दिशेने पाहात त्याची जड पावले मागे वळतात आणि त्याला आठवते.. मुंबईत आल्यावर पथारी पसरण्याच्या हक्काच्या निवासस्थानासही आता टाळे लागले असणार! मंत्रालयाच्याच सावलीत असलेल्या आमदार निवासात आपल्या आमदाराची खोली म्हणजे गावाकडच्या प्रत्येकाचा मुंबईतील हक्काचा निवारा आज बंद झाला आहे. मंत्रालयात मंत्री नाही आणि आमदार निवासात आमदार नाही.. त्या मंत्रालयाचे आता पुन्हा एकदा सचिवालय झाले आहे. मंत्री, आमदाराशी ज्या जिव्हाळ्याचे नाते होते, ती माणसे आता दिसेनाशी झाली आहेत. त्यांची दालने अनोळखी झाली आहेत आणि तेथील फायलींच्या गठ्ठय़ातील आपल्या कामाच्या कागदाचे काय झाले याची कोणतीच माहिती कुणीच देऊ शकणार नाही.. मंत्रालयाची ती वास्तू एवढी अलिप्तपणे याआधी कधी वागली होती, तेही आता या गावकऱ्यास आठवत नाही. या वास्तूला जेव्हा ‘सचिवालय’ म्हटले जायचे, तेव्हाही इथे गावकऱ्यांचे लोंढे हक्काने येतच असत. सचिवालयाचे मंत्रालय झाले आणि ते नाते आणखी घट्ट झाले.. आज मात्र, मंत्र्यांच्या दालनांस कुलपे लागली आणि या वास्तूसोबतची जुनी ओळखच पुसली गेली. समोरचा वाहता रस्ता त्रयस्थपणे न्याहाळणाऱ्या या वास्तूच्या नजरादेखील, सरकारी कामासाठी मुंबई गाठणाऱ्या गावकऱ्याप्रमाणेच, समुद्राशेजारच्या टेकडीवरील झाडीत लपलेल्या राजभवनाच्या वास्तूकडे लागल्या आहेत.. फक्त, गाऱ्हाण्याचा आवाज तिथवर पोहोचेल की नाही, याचा अंदाज गावकऱ्यास नाही..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 12:06 am

Web Title: presidents rule comes force locks ministers office abn 97
Next Stories
1 ‘पंच’तंत्र!
2 ‘ब्रेकिंग’ न्यूज..
3 ‘गडकरी मार्ग’..
Just Now!
X