राजकारणात आजकाल एक चांगली संस्कृती रुजू पाहत आहे. या क्षेत्रातील अनेक जण त्याबद्दल नाराज असले तरी तो त्यांचा अंतर्गत मामला आहे, पण सर्वसामान्य जनतेच्या, म्हणजे मतदाराच्या दृष्टीने पाहता मात्र यास परिवर्तनाचे पहिले पाऊल असेच म्हटले पाहिजे. गुंड, भ्रष्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते अशा राजकीय कार्यकर्त्यांवर मायेची सावली धरून त्यांच्या मनपरिवर्तनाची संधी देण्याचा एक उदार आणि अशा लोकांचे भविष्य आश्वस्त करण्याचा एक आगळावेगळा प्रयोग राजकीय पक्षांकडून सुरू आहे. राजकीय पक्षांच्या केवळ सत्तेच्या राजकारणाकडेच पाहण्याची सवय जडलेली असल्यामुळे अशा परिवर्तन प्रयोगांकडे मतदाराने समाज म्हणून गांभीयाने पाहावयास हवे.  या प्रयोगाच्या प्रारंभाचे सारे श्रेय सध्या केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपचे आहे हे कोणीही निर्विवादपणे मान्य करेल. या प्रयोगाचे भाजपची वाल्मीकीकरण योजना असे नामकरण होताच या योजनेचे लाभार्थी होऊ  इच्छिणाऱ्यांची रीघ भाजपकडे लागली आणि भाजपनेही खुल्या दिलाने वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील बदनामांना या योजनेतून पक्षात सामावून घेतले. या योजनेचे यश पाहता, अन्य पक्षांतही आता याच योजनेचे अनुकरण सुरू झाल्याचे संकेतही मिळू लागले असून तसे होऊ  लागल्याने भाजपच्या मूळ वाल्मीकीकरण योजनेस घरघर लागण्याची शंकाही व्यक्त होऊ  लागली आहे. भाजपच्या मूळ योजनेतील लाभार्थीमध्ये काँग्रेसमधील  बदनाम झालेल्यांचा मोठा भरणा असल्याने, आपणच अशी योजना पक्षांतर्गत पातळीवर राबविल्यास भाजपला शह तर बसेलच, पण स्वपक्षातीलच वाल्यांचे परिवर्तन घडवून नवे वाल्मीकी तयार करून सुसंस्कृत कार्यकर्त्यांची नवी फळी पक्षाची ताकद वाढवेल असा विचार काँग्रेसने केला असावा. काँग्रेसमध्ये या योजनेचा भव्य शुभारंभदेखील झाला असून, काँग्रेस महासमितीच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्याशी असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या उत्तर प्रदेशातील पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक पक्षात परत सामावून घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्वानी आपल्या त्या कृत्याबद्दल पश्चात्तापाची घोर भावना व्यक्त केली असल्याने पक्षाचे सरचिटणीस व उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या शिफारशीचा आदर करून, एकेकाळी बदनाम ठरलेल्या या पदाधिकाऱ्यांना सुधारण्याची संधी देणारा हा क्रांतिकारी निर्णय काँग्रेसने घेतला ते योग्यच झाले. अन्यथा, अशा बदनाम राजकीय नेते कार्यकर्त्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा ठेका फक्त भाजपनेच घेतला आहे असा सर्वसामान्य जनतेचा समज झाला असता.

उत्तर प्रदेशातील या आठ पदाधिकाऱ्यांना पक्षात परत घेतल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी नाराज झाल्या आहेत. पक्षासाठी घाम आणि रक्त गाळणाऱ्यांपेक्षाही गुंडांना महत्त्व दिले जाते अशी त्यांची भावना झाली आहे. पण तो त्यांचा व्यक्तिगत मामला झाला. परिवर्तनाचा ठेका घेतलेल्या भाजपला शह देण्यासाठी आणि अशा बदनामांचे हृदयपरिवर्तन करून पक्षात नवी संस्कृती रुजविण्यासाठी असे काही करणे योग्यच असते हे काळाच्या कसोटीनंतरच सिद्ध होणार आहे. तोवर, मतदारांनी- म्हणजे समाजाने- या परिवर्तन संस्कृतीचे निरीक्षण करावयास हरकत नाही.