ते पाहा.. ते पाहा.. स्वर्गस्थ देवदेवता, गंधर्व, यक्ष, किन्नर, अप्सरा अत्यंत सुस्मित वदनाने पुष्पवृष्टी करीत आहेत. गांधी, नेहरू, टिळक, गोखले, सावरकर, भगतसिंग असे थोर नेते बहुआनंदे आशीर्वचने देत आहेत. इकडे आसिंधुसिंधुपर्यंता भारतभूमी हर्षोल्हसित झाली आहे. आकाश-पाताळातून, दशदिशांतून, दऱ्याखोऱ्यांतून, पर्वतशिखरांवरून मोद विहरतो आहे.. सुजनहो, प्रसंगच तसा आहे. एका नव्या राष्ट्राचा जन्म झाला आहे. नियतीशी एक नवा करार झाला आहे. समाजमाध्यमातील गटागटातून, भिंतीभिंतीवरून, खात्याखात्यातून त्याचे ढोलताशेनगारे वाजत आहेत. प्रतिक्रियांचे बत्तासे उधळले जात आहेत. हे देशप्रेमी देशभक्तांनो, येथे एक नवे पुलकिस्तान अवतरले आहे. ज्यासाठी गेले कित्येक दिवस आपण अट्टहास केला, ज्याकरिता ‘वंदे मातरम्’चे उच्चारयुद्ध लढलो आपण, तो हेतू अखेर साध्य झाला आहे. होय, एक भक्तिरससंपृक्त असे पुलकिस्तान येथे उभे राहिले आहे. अचानकच झाले ते सारे. म्हणजे एका चॅनेलीचर्चेतील देव विरुद्ध विरोधक नामक दानव या विचारमंथनातून अभावितपणे या पुलकिस्तानचा पहिला टॅहॅ झाला. चर्चा ‘वंदे मातरम्’ची होती. तेव्हा चॅनेली नियमानुसार एक मुस्लीम हवाच त्यात. तो होता. समोर सच्चेमुच्चे देशभक्त म्हणून भाजपचे प्रवक्ते नवीनकुमार सिंह होते. मुद्दा राष्ट्रभक्तीचा होता. वंदे मातरम्ची सक्ती व्हावी असा नवीनकुमारांचा आग्रह होता. त्यातून त्यांनी वंदे मातरम् गायला सुरुवात केली आणि काय सांगावे, चमत्कारच जाहला. एक नवे राष्ट्रगान त्यांनी जन्मास घातले. भाजप प्रवक्त्यांच्या मुखातून आलेल्या त्या पवित्र गीताचे बोल आहेत – ‘बंदे मातरम.. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम.’ येथपर्यंत ते बंकिमचंद्रांना स्मरून गात होते आणि नंतर नियतीने जो काही खेळ केला. अहाहा! त्यांच्या देशप्रेमी जिव्हेवर साक्षात देशभक्ती पदन्यास करून गेली आणि सुमधुर शब्द उमटले – ‘सन्स स्याम मल्याम! शुभ्रत जोतिसम पुलकित्याम! बंदे मातरम!! पुलकिस्तान सुमिता दुमल सुनामी! सुहासीन सुमंद्र भुसमानी! बंदे मातरम!!’ एरवी राष्ट्र जन्मास येते. मग राष्ट्रगीत येते. येथे देवदुर्लभ चमत्कारच जाहला. राष्ट्रगीत आधी जन्मले अन् त्यातून पुलकिस्तान या नव्या पुण्यभू-पितृभूचा अवतार झाला. तो ऐतिहासिक ध्वनिचित्रफीतबद्ध क्षण पाहून आजही अनेकांच्या नेत्रांतून आनंदाश्रू येत आहेत. दुर्दैवाचा भाग असा की, आज पुलकिस्तानलाही विरोध होत आहे. कोणी म्हणते या प्रवक्त्यांनाच नव्हे, तर अशा अनेकांना वंदे मातरम् येत नसूनही ते सक्ती करतात त्याची व त्यातून हे असे अभद्र निपजते. परंतु ते मुळीच तसे नाही. वंदे मातरम् स्वत:स येण्याचा व आपण त्याची सक्ती करण्याचा संबंध येतोच कुठे? मुद्दा सांस्कृतिक राष्ट्रनिर्मितीचा आहे. ती झालीच पाहिजे. पुलकिस्तान हे त्याच सांस्कृतिक राष्ट्रनिर्मितीचे पहिले फळ आहे. ते गोडच मानून घेतले पाहिजे.. नाही तर तुम्ही पुलकिस्तानद्रोही!