News Flash

पुण्याची गणना, कोण करी..

देशात वास्तव्यासाठी पुणे सर्वोत्तम असल्याची माहिती देणारी ही बातमी वाऱ्यासारखी वेगाने फिरत होती..

(संग्रहित छायाचित्र)

दुपारचे चार वाजले, आणि तीन तासांची मस्त झोप संपताच त्याला सवयीने जाग आली.. त्याने बाहेर पाहिले. पुन्हा ऑफिसला जायची तयारी सुरू केली. आपल्या नव्या कोऱ्या मोटारीवरील आच्छादन निगुतीने काढून त्याने घडी करून डिक्कीत ठेवले आणि मोटार बाहेर काढून ऐटीत रस्त्यावर आणली. ऑफिस होते जवळच, पण त्या मैलभराच्या प्रवासात तो कोंडीत अडकलाच. असे झाल्यावर सगळे जण करतात तसा तोही मोटारीत बसून मोबाइलवर बोटे चालवू लागला, तर अचानक त्याला ती बातमी गवसली. देशात वास्तव्यासाठी पुणे सर्वोत्तम असल्याची माहिती देणारी ही बातमी वाऱ्यासारखी वेगाने फिरत होती.. वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवरून याच बातमीचा मारा सुरू होता. धक्काच तेवढा मोठा होता. त्याने आपलीही एक इमोजी जोडून तो संदेश आणखी एका ग्रूपवर फॉरवर्ड केला आणि गाडी फूटभर पुढे नेली.. ऑफिसला पोहोचला तेव्हा बाकीचे सहकारी घरी परतायची तयारी करू लागले होते. आता पुन्हा कोंडीत अडकावे लागणार या कल्पनेने त्याच्या अंगावर नवा शहारा आला, आणि जागेवर ऐसपैस बसत त्याने भिंतीवरचा टीव्ही चालू केला.. सगळ्या वाहिन्यादेखील हाच विषय चघळत होत्या. समस्त पुण्याला धक्का बसलाय, हे जाणवत होते.. तेवढय़ात मोबाइलवर मेसेज आला. ‘नातेवाइकाला सोडायला विमानतळावर गेलो होतो, तो दुबईत पोहोचलाय, आणि मी अजूनही रस्त्यावर इंच इंच लढवत बसलोय..’ त्याने नवी इमोजी जोडून रिप्लाय दिला.. ‘आपलं पुणं, राहण्यासाठी देशातलं सर्वात चांगलं शहर ठरलंय!’ .. मग त्याला कोंडीचा त्रासही कमी वाटू लागला. एके काळी हे शहर म्हणे देशाची राजधानी होते. असेलही. पण अचानक हे शहर राहण्यायोग्य व्हावे, असे काय घडले?.. तो विचार करू लागला. सायकलींच्या या शहरात देशातील सर्वाधिक स्वयंचलित दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. प्रत्येकासाठी किमान दीड ते पावणेदोन वाहने आहेत. मिसरूड आणि बाईक एकदमच येतात.. उपनगरात अजूनही पिण्यासाठी टँकरचेच पाणी वापरतात. मुठेच्या पुलांवरून गाडी चालवताना नाक दाबून ठेवता येत नाही, त्यामुळे नाकातले केसही जळतात. सार्वजनिक बसने प्रवास करायचा असेल, तर दोन तासांचा वेळ हाती ठेवूनच घराबाहेर पडायचे. रस्तोरस्ती या पीएमपी नावाच्या वाहतूक व्यवस्थेतल्या जुन्यापुराण्या, मोडकळीस आलेल्या बसेस बंद पडलेल्या पाहात, हताश होणाऱ्या लाखो पुणेकरांना या शहरात आपण कशासाठी आलो आहोत, याचाच घोर पडावा.. भामटा हा शब्द रूढ होतानाच त्याच्या मागे पुणेरी हे विशेषण का लागले असेल, याचे उत्तर कोणत्याही रिक्षावाल्याकडे गेल्यावर लगेचच मिळते. आपल्याला जिकडे जायचे असते. त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला तो यायला तयार असतो. गयावया, कणव, सहानुभूती हे शब्द या शहरापुरते फक्त कोशातच शोभतात. तरीही अस्सल पुणेकराचा अभिमान विचारू नका. त्याच्या डोक्यात पुण्याचे एक एक रूप उमटू लागले, आणि तो बेचैन झाला.. आता इथे आणखी गर्दी वाढणार.. रिकाम्या फ्लॅट्सना नवी गिऱ्हाइके मिळणार, नवी माणसे राहायला येणार, त्यांच्या गाडय़ा रस्त्यावर येणार, नव्या लोकांसाठी पुन्हा नव्या इमारती होणार, मग पुन्हा नवी माणसे येणार.. आणि पुण्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार.. भविष्याचे भयंकर स्वप्न मनात रुंजी घालत असतानाच त्याने घडय़ाळाकडे पाहिले. सात वाजले होते. तो ताडकन उठला, आणि बाहेर पडला. मैलभरावरच्या घरात त्याला नऊच्या आत पोहोचायचे होते..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 3:30 am

Web Title: pune gets first spot in ease of living index
Next Stories
1 चाकू आणि चरखा..
2 पहिले ते आत्मकल्याण..
3 राष्ट्रभक्तीची शाळा
Just Now!
X