हे एक बरे झाले.. किंवा अच्छे झाले. या भारतवर्षांचे प्रधानसेवक राजधानी नवी दिल्लीतील ज्या मार्गावर निवास करून सकल देशास मार्ग दाखवितात, त्याचे नव्याने बारसे झाले. ‘रेसकोर्स रोड’ हे काय स्वतंत्र भारतातील, स्वतंत्र भारताच्या संस्कृतीस शोभणारे नाव झाले? मार्गाचे नाव कसे पूर्ण भारतीय हवे, अगदी ‘मेक इन इंडिया’च्या साच्यातून काढल्यासारखे अगदी पूर्ण भारतीय बनावटीचे. मुळात या मार्गास ‘रेसकोर्स रोड’ हे नाव पडलेले सन १९४० मध्ये. ‘दिल्ली रेसकोर्स’च्या परिसरात असल्याने हे नाव. रेसकोर्स म्हटले म्हणजे शर्यत आलीच. रेसकोर्सवर रंगणारी ही शर्यत अश्वांची. आता राजकारण आणि अश्वकारण यांच्यात काही जणांना साम्य दिसेल. घोडेबाजार हा शब्दही आठवेल या निमित्ताने काहींना. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील खासदार मीनाक्षी लेखी यांनाही हे साम्य दिसले असावे कदाचित आणि घोडेबाजार शब्दाची आठवणही आली असावी त्यांना. त्यांनी नवी दिल्ली महापालिकेत प्रस्ताव दिला मार्गाचे नाव बदलण्याचा. (खरे तर रेसकोर्स हे आंग्ल नावही बदलायलाच हवे.. अश्वशर्यतअड्डा असे वगैरे.) आधी ठरले की नवे बारसे करू या ‘एकात्म मार्ग’ असे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने त्यांचे स्मरण होईल, त्यांच्या ‘एकात्म मानवतावादा’च्या तत्त्वांची उजळणी होईल. या मार्गावर जे जे पंतप्रधान वास्तव्य करतील, त्यांना देशातील अगदी अखेरच्या माणसाचे हित दृष्टीसमोर राहील. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत आणि मोरारजी देसाईंपासून ते अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत इतके प्रधानसेवक झाले देशाचे. त्यांच्या दृष्टीची झेप आणि आत्ताच्या प्रधानसेवकांच्या दृष्टीची झेप यांच्यात तुलनाच नाही व्हायची. सध्याच्या प्रधानसेवकांच्या महाविशाल, महाव्यापक दृष्टीची आठवण पुढील प्रधानसेवकांना राहील, याची तजवीज होईल, या बारशाने. पण नंतर नाव ठरले ते ‘लोककल्याण मार्ग’ असे. त्या आम आदमी पक्षाचे म्हणणे होते की, शहीद जवानाचे नाव या रस्त्याला द्या असे. आता काही नतद्रष्ट विरोधक म्हणतीलच की नाव बदलून काय होणार रस्त्याचे? ज्या मार्गावरून जाताय तो मार्ग योग्य आहे की नाही, हे बघा जरा. तर त्यांना आठवण करून द्यायला हवी.. ‘राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स’ योजनेचे नाव ‘डिजिटल इंडिया’ असे केल्यावर अख्खा भारत एका रात्रीत डिजिटल झाला, ‘राजीव गांधी शिल्पी स्वास्थ्य विमा योजने’चे बारसे ‘प्रधानमंत्री विमा योजना’ असे केल्यानंतर या योजनेने उंचच उंच भरारी घेतली. आता ‘रेसकोर्स रोड’चे नाव ‘लोककल्याण मार्ग’, आणि प्रधानसेवकांचा पत्ता ‘७ लोककल्याण मार्ग’ असा झाल्यानंतर या नव्या नावाच्या मार्गावरून सात अश्वांचा लोककल्याणाचा रथ कसा चौखूर उधळतो ते बघावेच देशाने. लोक बोलतच राहतात काहीबाही. त्यामुळे रथस्वाराने त्यांच्याकडे मुळीच लक्ष देऊ नये. त्याने आपले आपल्या ‘लोककल्याण’ मार्गावरून जात रहावे, हे श्रेयस्कर.