देशात सध्या तशी कोणतीही साथ नाही. ना डेंग्यू, ना चिकुनगुनिया, ना सार्सची. साधी लाळ्या-खुरकुत्याचीसुद्धा नाही. मग हे अवघे काँग्रेसजन का बरे आजारल्यासारखे दिसत आहेत? त्या सर्वाच्याच चेहऱ्यावर, तंबूतल्या लँपाने उघडमिट करावी तशा प्रकारे कळा-अवकळेचा खेळ का बरे सुरू आहे? अचानक अर्धशिशी व्हावी, पित्त उठावे, कंबरेत टिचे भरावीत तसे अनेकांचे का बरे झाले आहे? कोठून आली असेल ही जनवेदना? तर त्याचे उत्तर आपणांस सापडेल ते त्यांच्या मनोवेदनेमध्ये. हे मन मोठे विचित्र. कधी कधी ते देहालाही नको नको करून टाकते. मग होतात कसलेसे मनोकायिक विकार आणि आजार. तर तसेच काहीसे झाले आहे तमाम काँग्रेसजनांचे. आधीच एक तर पडून पडून ढोपरे फुटलेली. त्यात त्यांचे तरुण तडफदार नेते आदरणीय राहुलजी गांधीजी यांची वक्तव्ये. माणसे गारद नाही होणार तर काय? काही दिवसांपूर्वी त्यांनी भूकंपाचा इशारा दिला होता. काँग्रेसवाल्यांच्या वेधशाळा तशा पक्क्या असतात. त्यांचा हवामानाचा अंदाजही चांगला असतो. पण राहुलजींचा तो ‘अंदाजे बयाँ’ काही त्यांना आकळलाच नाही. बरे पुन्हा तो भूकंप मोदी सरकारच्या पायाखाली व्हावा ना, तर तसेही नाही. भूकंप झालाच नाही. लोक हसले आणि काँग्रेसजनांच्या स्वप्नांचे सातमजली इमले त्या हसण्यानेच कधी कोसळले हे कोणालाच समजले नाही. मधल्या काळात ते परदेशी अज्ञातस्थळी गेले होते, तेव्हा काँग्रेसजनांच्या चेहऱ्यावर जरा तजेला दिसत होता. आता ते येतील ताजेतवाने होऊन आणि तुटून पडतील जोशाने सरकारवर असे वाटले अनेकांना. झाले भलतेच. ते आले ते जनवेदना घेऊन. आणि दाखविली काय, तर अच्छे दिनाची स्वप्ने. मोदींनी दाखविलेल्या या स्वप्नांनी आधीच सारे काँग्रेसवासी तळमळत आहेत. रात्र रात्र त्यांना झोप येत नाही. असे असताना पुन्हा एकदा राहुलजींनी तशीच अच्छय़ा दिनांची धमकी द्यावी ना! होशोहवास उडाले साऱ्यांचे. बरे वर पुन्हा म्हणाले काय, तर डरो मत! हे म्हणजे स्वत:च दाराआडून जोराने भो करायचे आणि म्हणायचे घाबरू नका. हल्ली तर म्हणे अनेक काँग्रेसजन मोदींना नव्हे, तर राहुलजींच्या भाषणांनीच चळाचळा कापू लागले आहेत. टिळक भवनाजवळ काल एक काँग्रेसजन तर – आपला पगार किती, आपण बोलतो किती – अशी मन की बात करीत असल्याचे अनेकांनी ऐकले म्हणतात. आता हे सारे राहुलजींना सांगणार कोण? बरे सांगण्यास गेले तरी ऐकण्यासाठी ते देशात असतीलच याची हमी देणार कोण? काँग्रेसजनांना अगदी हसावे की रडावे असे झाले आहे. साथच पसरली आहे म्हणा ना याची!