20 September 2018

News Flash

दिवस सुगीचे सुरू जाहले..

सध्या आमचे हृदय आनंदातिशयाने उचंबळू लागले आहे.

देवदर्शनानंतर भोपाळमध्ये रोड शो करण्यासाठी आलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी निशाणा साधला आहे.

सध्या आमचे हृदय आनंदातिशयाने उचंबळू लागले आहे. पोटात हर्षवायूचा गुब्बारा धरला आहे. त्याला कारणही तसेच आहे. काल राहुलजी म्हणाले, मोदींच्या राज्यात रोजगार बुडाले. तरुणांना नोकऱ्या नाहीत, ते बेकार बसले आहेत. आम्ही त्या मताशी असहमत आहोत. ते पाहा, उत्तरेकडे एक वादळ घोंघावते आहे. लवकरच तेथून महाभरतीच्या लाटा येऊ घातल्या आहेत. आणखी काही महिन्यांतच देशात निवडणुकांचा माहोल माजेल. म्हणजेच, काही जणांचे ‘सुगीचे दिवस’ सुरू होतील. पण असे सुगीचे दिवस एकेकटे येतच नसतात. महाभरतीच्या लाटा ही त्या सुगीच्या दिवसांचीच नांदी आहे. उत्तर प्रदेशातील भाजपच्या ‘आयटी सेल’ने या लाटांचे भाकीत जाहीर केल्यापासून त्या राज्यातील तमाम आयटी एक्स्पर्टाचे डोळे त्या लाटांकडे लागले आहेत. महाभरतीच्या लाटांवर झुलत बेरोजगारीला टाटा करण्याची स्वप्ने आयटी एक्स्पर्टाना भरदिवसा पडू लागली आहेत. समाजमाध्यमांवरील प्रचारासाठी तब्बल दोन लाख तरुणांची भरती एकटय़ा उत्तर प्रदेशातील भाजपच्या ‘सायबर सेने’त केली जाणार आहे. या लाटांचे लोण उद्या देशातही पसरेल, आणि सव्वाशे करोडच्या देशात एकटय़ा या एका क्षेत्रामुळे कित्येक लाखांच्या बेरोजगारीचा प्रश्न कायमचा मिटून जाईल, तेव्हा सरकारला धारेवर धरणाऱ्यांची पळापळ होईलच, पण त्यांनाही या लाटांवर स्वार व्हावेच लागेल. या सेनेतील प्रत्येकाच्या हाती पक्षाच्या विचारभट्टीत तयार झालेली ‘पारंपरिक’ सायबर हत्यारे दिली जाणार आहेत. हे सायबर योद्धे उत्तर प्रदेशात ‘शत्रूवर चाल करण्यासाठी’ सज्ज होतील, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी शत्रूलादेखील अशीच तोडीस तोड सैन्याची उभारणी करावी लागेल. या सायबरयुद्धाने अवघे देशाचे सायबरावकाश व्यापले, तर आपणही मागे असावयास नको हे जाणून अन्य राज्यांतही पक्षोपक्षी अशा सायबरसेना तयार होतील, आणि एकटय़ा सायबर क्षेत्रातच देशातील करोडो बेरोजगारांना सामावून घेण्याची क्षमता आपोआप तयार होईल. या सायबरयुद्धाचे वारे वाहू लागताच मोबाइल उत्पादन क्षेत्रात चैतन्य सळसळू लागेल, मनुष्यबळाची मागणी वाढेल, आणि तेथेही रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतील. एवढे सगळे झाल्यावर, इंटरनेट सेवा पुरवठादारांना गप्प राहून चालणारच नाही. जागोजागी सरकारकृपेने सुरू झालेल्या मोफत वायफाय सेवा अधिक सक्षमतेने पुरविण्यासाठी अधिक जोमाने त्यांनाही काम करावे लागेल, साहजिकच तेथेही रोजगाराचे वारे! अशा तऱ्हेने, उत्तर प्रदेश ही रोजगारनिर्मिती क्षेत्राची जननी ठरेल, आणि तेथून निघालेले रोजगारनिर्मितीचे वारे अवघा देश व्यापून टाकतील.. अशा रीतीने सरकारच्या रोजगारनिर्मितीच्या कार्यक्रमास, त्यांच्या पक्षाचा हातभार लागेल, आणि देशातील रोजगाराची समस्या कायमची संपुष्टात येऊन जाईल. एरवीही सध्याच, सायबरयुद्धाच्या रंगीत तालमी जागोजागी सुरू झाल्या असल्याने, जल्पकांच्या बिनपगारी थव्यांनी आपल्यापुरत्या आवेशात आपली बोटे सपासप चालविण्यास सुरुवात केलीच आहे. त्यांना आता त्याचे मानधनही मिळेल, आणि रिकामपणालाही मोल असते, हेही सिद्ध होईल. हे ‘सुगीचे दिवस’ म्हणजेच ‘अच्छे दिन’ हे आता वेगळे सांगावयास हवे काय?

HOT DEALS
  • Gionee X1 16GB Gold
    ₹ 8990 MRP ₹ 10349 -13%
    ₹1349 Cashback
  • Apple iPhone SE 32 GB Gold
    ₹ 25000 MRP ₹ 26000 -4%

First Published on June 14, 2018 2:26 am

Web Title: rahul gandhi 9