काही पिढय़ा आपल्या घराण्याचा वारसा घेऊनच जन्माला येतात. पं. नेहरूंच्या पिढय़ांना ते भाग्य लाभले आहे. ‘त्या’ घराणेशाहीविषयीची ही ‘राजकीय चर्चा’ नाही. पण जवाहरलाल नेहरू म्हटले, की त्यांच्या खांद्यावर बसलेली किंवा पंडितजींच्या हातून आकाशात भरारी घेणारी कबुतरे आठवतात. पंडितजींची ती प्रतिमा पाहिली, की त्यांच्या प्राणिप्रेमाचीही साक्ष पटते. तोच प्राणिप्रेमाचा वारसा त्यांच्या पुढील पिढय़ांनी जसाच्या तसा उचलला. इंदिराजींच्या श्वानप्रेमाची महती ठाऊक नाही असा काँग्रेसी आढळणार नाही. त्यांचा वारसा पुढे गांधी घराण्याच्या धाकटय़ा पातीनेही सांभाळला. संजय गांधींच्या पत्नी, मेनका गांधी यांच्या प्राणिप्रेमाला तर सीमा नाही. आता नेहरू घराण्याच्या चौथ्या पिढीतही तोच वारसा सांभाळला जात आहे. राहुल गांधींचा लाडका कुत्रा पीडी हा त्याच्या हुशारीमुळे आज समाजमाध्यमांवरील राहुलजींच्या खऱ्याखोटय़ा हजारो फॉलोअर्सचा लाडका होऊन गेला, तेव्हा राहुलजी हेच नेहरू-गांधी घराण्याच्या प्राणिप्रेमाच्या वारशाचे एकमेव हक्कदार आहेत हे स्पष्ट झाले. राहुलजींच्या या ‘पीडी’ने त्यांना एका क्षणात ट्विटरवर हजारो खरेखुरे लाइक्स मिळवून दिले, आणि राहुलजींच्या विनोदबुद्धीलाही हजारो खऱ्याखुऱ्या ‘वाहवा’देखील मिळून गेल्या.. पण राजकारणाला अधूनमधून विनोदाचे वावडे असावे. राहुलजींच्या ट्विटर खात्याभोवती उसळलेले वादाचे वादळच या पीडीने ट्विटरच्या माध्यमातून परतवून लावले. तरीही काहींच्या जुन्या राजकीय द्वेषाला उकळ्या फुटल्याच. आसाममधील काँग्रेसचे माजी आणि भाजपचे विद्यमान नेते हिमंत बिश्वसर्मा यांनी तर राहुलजींच्या ‘पीडीप्रेमा’चीच खिल्ली उडविली. आसामातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आपल्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राहुलजींची भेट घेतली, तेव्हा म्हणे चर्चेऐवजी याच ‘पीडी’ला बिस्किटे खाऊ घालण्यात राहुलजी मग्न होते, असे बिश्वसर्माचे म्हणणे. या खोचक प्रतिक्रियेमुळे गांधी घराण्याच्या प्राणिप्रेमाच्या वारशाचा मुद्दा पुन्हा मागे पडला, त्याला फाटे फुटले आणि राजकारणाला भलताच ऊत आला. आसामसारख्या ईशान्येकडील राज्याच्या समस्यांवर चर्चा करताना कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालण्याच्या राहुलजींच्या कृतीमागील संदेश विश्वसर्माना बहुधा समजलाच नसावा. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधींनी भगवद्गीतेचा अभ्यास व पठण सुरू केले होते. गीतेमधील कर्मयोगी, स्थितप्रज्ञादींची लक्षणे ज्यांनी अभ्यासली नाहीत, त्यांना एखाद्याच्या अशा कृतीमागील अर्थ उमजणे शक्य नाही. जवाहरलाल नेहरू यांनी कबुतरे उडविली, तेव्हा प्राण्यांवर माणसासारखे प्रेम करा असा त्यांचा संदेश जगाला मिळाला. मेनका गांधींनी तर त्याचे आचरण करण्यासाठी जणू उभे आयुष्य पणाला लावले. राहुलजीदेखील प्राण्यावर प्रेम करण्याचा संदेश जगाला देऊ पाहात असतील, प्राणी प्रेमळ व निष्ठावंत असतात हे दाखवू पाहात असतील, तर त्याचे राजकारण का बरे करावे? राहुलजींचा हा पीडी म्हणजे निष्ठेचे जातिवंत प्रतीक! त्याच्याकडून योग्य तो बोध काँग्रेसजनांनी घेतला, तर पीडीच्या संदेशाचे चीज होईल. बाकी राजकारणातील ‘पीडितां’ंना तो पचविणे सोपे नाहीच!