मतदार हा एक दिवसाचा राजा असतो, असे काहींचे मत होते, तर तो कधीच राजा नसतो, असेच अनेकांना वाटत होते. पण मतदानाच्या दिवशी, आभासी असला तरी त्याच्या माथ्यावर राजमुकुट चढतोच. अलीकडे त्याचा राजयोग बळावत चालला आहे. कारण सध्या राजकारणात जे काही सुरू आहे, ते सारे या मतदारासाठीच आहे. अन्यथा मंदिरे, मशिदी आणि यच्चयावत धर्माची प्रार्थनास्थळे पालथी घालत कुणी भक्तिरस दाखविला नसता. काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधींनी तमाम मंदिरांतील मूर्तीच्या पायावर माथा टेकविला नसता आणि भाजपला सर्व धर्माची मानवतेची शिकवण आठवलीच नसती. गुजरातेतील निवडणुकीआधी कधी तरी, राहुलजींनी गीतापठणाचा संकल्प सोडला होता. ते निस्सीम शिवभक्तदेखील झाले आणि पुढे जानवेधारी होऊन देवदर्शनाचे व्रताचरणही सुरू केले. आता कर्नाटकात निवडणुका येऊ घातल्या आहेत. पक्षाध्यक्षपद स्वीकारल्यानंतरच्या पहिल्या कसोटीसाठी राहुलजी सज्ज झाले आहेत. कसोटीचा काळ आला, की देव आठवतो असे म्हणतात; पण राजकीय नेत्यांना अगोदर आपल्या सोयीचा ईश्वर ठरवावा लागतो. त्यासाठी मतदारांचा कौल घ्यावा लागतो. कर्नाटकसारख्या राज्यात शिवभक्ती कामी येणार हे न ओळखण्याएवढे स्थानिक काँग्रेस नेते आणि खुद्द राहुलजीदेखील दुधखुळे नाहीत. कर्नाटकात लिंगायत मतदारांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या देवासमोर नतमस्तक व्हावे लागणार असल्याने, आपल्या ताज्या दौऱ्यात राहुलजींनी हलिगम्मा देवीचे दर्शन घेतले आणि सिद्धेश्वर मठासही साकडे घातले. जेथे जेथे मंदिरे, प्रार्थनास्थळे आहेत, तेथील ईश्वरासमोर नतमस्तक झाल्यावर मनाला कमालीची आध्यात्मिक शांती लाभते असा साक्षात्कार कर्नाटकातील या दौऱ्यात राहुलजींना झाला. त्यांच्या ‘टेम्पल रन’मुळे मतदारांच्या मानसिकतेत काय बदल झाला ते मतदानातूनच समजेल, पण भाजपची ‘मतमाऊली’ मात्र, काहीशी नाराज झाली. येड्डय़ुरप्पांनी राहुलजींवर ट्विटर हल्ले चढविले. मतदारांचे लांगूलचालन करण्यासाठीच राहुल गांधी ‘मंदिरवाऱ्या’ करू लागल्याचा आरोपही त्यांनी केला. तिकडे उत्तरेतील ‘भगवेधारी’ मुख्यमंत्रीही आपली मक्तेदारी हिरावली जाणार या भयाने धास्तावले. त्यांनीही ‘ट्विटर चढाई’ सुरू केली; पण आता काँग्रेस मागे हटणार नाही. राहुलजींनी ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चा स्वीकार केल्याचे मतदारांना कळून चुकले आहे. अशा वेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीवर उतारा म्हणून, दर्गे आणि मशिदींचे उंबरठे झिजवण्याची पूर्वतयारी भाजपाईंनी सुरू केली असावी. कासगंजमधील हिंसाचारामुळे राज्यपाल राम नाईक यांचे मन कळवळले आणि राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांना सर्व धर्मातील समभावाची शिकवणही आठवली. राजकारणातील वाऱ्यांची दिशा बदलण्याची चिन्हे अशी ठळक होणे हेच मतदाराचा ‘राजयोग’ बळकट होण्याचे पहिले लक्षण आहे. निवडणुकांना अद्याप बराच अवधी आहे, पण आतापासूनच मतदाराच्या माथ्यावर राजमुकुट चढविण्याची तयारी सुरू झाली, पण मतदाराने त्या योगानंदात हुरळून जाऊ नये. एक दिवसाचे ‘राजेपण’ संपल्यानंतर आपला ‘मामा’ बनविला जातो, या अनुभवाचा विसर पडून चालणार नाही..