प्रत्येक माणसाच्या सहनशीलतेला शेवटी एक सीमा असते. आपले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याही सहनशीलतेला सीमा आहे. आपल्या देशाला कुणी फारच त्रास देत असेल तर किती काळ गप्प बसायचे? प्रश्न नेहमीचाच आहे पाकिस्तानचा आणि काश्मीरचा. आपल्यापासून वेगळा झालेला शेजारी देश आहे, आज सुधारेल.. उद्या सुधारेल.. निदान परवा तरी सुधारेल अशी वाट बघत होते राजनाथ सिंहजी. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना बोलावण्यात आले होते. ते बोलावणे केवळ छायाचित्रांसाठीच्या हस्तांदोलनासाठी नव्हते, एकमेकांची मने जुळावीत यासाठी होते. पण नाही. शेजारी काही सुधारायला तयार नाही. तीन वर्षे झाली मोदी आणि राजनाथ प्रयत्न करीत होते पाकिस्तानचे मन वळेल, काश्मीरमधील दहशतवादी कारवाया ते थांबवतील, सीमेवरील हल्ले थांबवतील यासाठी. ते न झाल्याने राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला आता चांगलाच दम भरला आहे. हा दम साधासुधा नाही, सज्जड आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह काय म्हणाले ते ठाऊक असेलच सगळ्यांना. ‘काश्मीर समस्येवर आम्ही कायमस्वरूपी तोडगा काढणार आहोत.. पाकिस्तान बदलायला तयार नसेल, तर आम्ही त्यास बदलणार आहोत,’ असे जाहीर करून टाकले त्यांनी परवा सिक्किममध्ये. राजनाथ यांचा इशाराच इतका जबरदस्त आहे की नवाझ शरीफ, आयएसआयप्रमुख, त्यांचे लष्करप्रमुख, हाफीज सईद, मुशर्रफ आणि अशा तमामांची पूर्णपणे बोबडी वळली असणार यात शंका नाही. अन्यथा, ‘कायमस्वरूपी तोडगा काढणार म्हणजे काय करणार?’ हा कुणीही विचारू नये, असा प्रश्न विचारण्याचा उद्धटपणा त्यांनी केला असता. तसा तो त्यांनी केला नाही हा नि:संशय राजनाथ यांच्या दराऱ्याचा परिणाम. हा दरारा तसा पाकिस्तानने आधीही अनुभवला आहेच. पाकिस्तानी सैन्याच्या छत्रछायेखाली तेथील दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये कारवाया केल्यानंतर, ‘हे असले खपवून घेणार नाही,’ असा इशारा राजनाथ नेहमी देतात, त्या इशाऱ्यातील दहशत काय असते, याची जाणीव पाकला आहे. सीमेवर गोळीबार, तोफमारा असले उद्योग पाकिस्तानी सैन्याने केल्यानंतर आणि त्यात भारतीय सैनिकांनी जीव गमावल्यानंतर, ‘हे बलिदान व्यर्थ जाणार नाही,’ असा गर्भित इशारा कितीही वेळा ऐकला तरी पाकिस्तानी सत्ताधारी, सैनिक, दहशतवादी यांचे अवसान दर वेळी नव्याने पुरते गळून जाते. त्यांच्या मनातील आणि हातातील शस्त्रे पुन:पुन्हा गळून पडतात. आपल्यावर आता काय संकट कोसळणार आहे, याची चिंता त्यांना लागून राहते. ‘आम्ही तोंडाची वाफ फुका दवडत नाही, जे काही करायचे ते करूनच दाखवतो,’ असे वाक्य राजनाथ यांच्या तोंडून कितीही वेळा ऐकले तरी दर वेळी भर दिवसा त्यांच्या डोळ्यांसमोर नव्याने काजवे चमकू लागतात. एखाद्याच्या निव्वळ शब्दांचाही दरारा काय असू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण. त्यांच्यामुळेच तर पाकिस्तानसारख्या देशावर आपण वचक ठेवू शकतो. राजनाथ सिंह यांच्या आभाळाएवढय़ा या कर्तृत्वाला खरोखर अगदी मनापासून दंडवत..