19 October 2019

News Flash

फक्त पाच मिनिटं..

केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड हे मोठे उत्साही गृहस्थ.

केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड

केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड हे मोठे उत्साही गृहस्थ. ऑलिम्पिक पदकविजेते असल्यामुळे खेळ आणि खेळाडूंविषयी अधिकारवाणीनं बोलतात. हक्कच त्यांचा. तरीही त्यांच्या कारकीर्दीत २०१६ मध्ये भारताला मागील दोन ऑलिम्पिकप्रमाणे समाधानकारक कामगिरी करून दाखवता आली नाही हे वास्तव आहे. राष्ट्रकुल आणि एशियाडमध्ये मोठय़ा संख्येनं पदकं मिळाली, यात क्रीडा संघटना किंवा क्रीडा मंत्रालयापेक्षा वैयक्तिक क्रीडापटूंच्या कर्तृत्वाचा वाटा किती तरी अधिक. आता ‘खेलो इंडिया’ उपक्रम पुण्यात बालेवाडीत सुरू झालाय नि त्यातून भारताला भावी क्रीडारत्ने मिळतील, असं राठोडसाहेबांचं मत. त्याहीपुढे जाऊन त्यांनी ट्विटरवरून ‘पाँच मिनट और’ म्हणजे आणखी पाचच मिनिटं खेळा, असं आवाहन केलंय. विद्यमान सरकारमधील अनेक जण ट्विटरवर सक्रिय असतात, तसेच राठोडही असतात. मागे त्यांनी फिटनेस चॅलेंज हे आव्हान ट्विटरवरूनच दिलं, त्याला पंतप्रधानांसकट यच्चयावत सेलेब्रिटींनी प्रतिसाद देऊन राठोडांना कृतार्थ केलं. राठोडांकडून स्फूर्ती घेऊन ‘पाँच साल और’ चॅलेंज स्वीकारा, असं जाहीर करण्याबाबत सरकारचा गंभीर विचार सुरू असल्याचं समजतं. असो.

पाच मिनिटं खेळायलाच नव्हे, तर परीक्षा केंद्रात पेपर लिहिताना किंवा फोनवर बोलतानाही आपण मागितलेली असतील. आता उदयोन्मुख खेळाडूंनाही ती दिली गेली पाहिजेत, असा उदात्त विचार या मोहिमेमागे आहे. खेळाडू पाच मिनिटंच मागताहेत, की आणखी काही याबाबत अधिक खोलात जाऊन विचार व्हायला हवा. पाच मिनिटं त्यांना द्यावीत, असं आवाहन क्रीडामंत्री करतात; परंतु त्याऐवजी नीरज चोप्रासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या युवा भालाफेकपटूला भाले आणि इतर साहित्य हवं आहे. दीपा कर्मकारसारख्या उदयोन्मुख जिमनॅस्टला अधिक चांगल्या सुविधा आणि मार्गदर्शन हवंय. हार्दिक पंडय़ासारख्या ‘होतकरू’ क्रिकेटपटूला प्रसिद्धीवलयात राहूनही लिंगभाव भान कसं राखावं, याविषयी सल्ला हवाय! ईस्ट बंगालसारख्या तगडय़ा फुटबॉल संघाला हरवणाऱ्या रिअल काश्मीरसारख्या दुर्लक्षित परंतु गुणवान संघाला अधिक चांगल्या संधी आणि निधी हवाय. वारंवार अपेशी ठरणाऱ्या राष्ट्रीय हॉकी संघाला कायमस्वरूपी प्रशिक्षक हवाय. महिला क्रिकेट संघाला त्यांना मानवलेला देशी प्रशिक्षक हवाय. केवळ स्वबळावर नव्हे, तर सरकारी आणि कॉर्पोरेट बळाच्या पाठिंब्यावर देशातून भविष्यातल्या मेरी कोम, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू कशा निर्माण होतील, याविषयी हमी आणि आराखडा क्रीडाप्रेमींना हवाय. बॅडमिंटन, नेमबाजी, बॉक्सिंग, कुस्ती या चार क्रीडा प्रकारांपलीकडे इतर खेळांतूनही ऑलिम्पिक पदकविजेते कसे निर्माण होतील, याविषयीचा रोकडा कार्यक्रम क्रीडा जाणकारांना हवा आहे. ‘खेलो इंडिया’सारख्या महोत्सवातून भविष्यातले क्रीडापटू घडतील का, त्यांना संधी, सुविधा, रोजगार, पदके मिळतील का याविषयी राठोड यांचं मतही जाणून घ्यायला कित्येकांना आवडेल.

ही सगळी उत्तरं पाच मिनिटांत कशी काय मिळणार?

First Published on January 11, 2019 12:07 am

Web Title: rajyavardhan singh rathore 5 minute aur challenge