आता आमची चिंता दूर होणार यांत खचितच काही शंका नाही. कोणताही काळ घ्या, त्यातील तरुण पिढी ही वायाच गेलेली असते. किंतु हल्लीची तरुण पिढी नि:संशय वायाच चाललेली आहे, असे आमचे मत बनत चालले होते. कारणच तसे होते त्यास. आजची ही तरुण मुले म्हणजे निव्वळ भद्रायुच हो.. काय म्हणालात? हा भद्रायु कोण? इतक्यात विसरलात वाटते आमच्या आचार्याच्या ‘साष्टांग नमस्कार’ला! कवी होता त्यात तो. तशी ही आजची मुले. त्या दूरध्वनी यंत्रावर निव्वळ अवसरविनोदन – म्हणजे टाइमपास हो – करीत असतात. अरे, दूरध्वनीच्या पडद्यावर कसले डोंबलाचे खेळ खेळता? अशाने कसे होणार तुमच्या दंडाचे स्नायू बळकट? कशी होणार छाती ५६ इंचांची? तुम्हांस सांगतो, आज आमचे रावबहाद्दर शेषाद्री असते ना, तर या सगळ्यांना सक्तीने साष्टांग नमस्कार घालावयास लावले असते सकाळ-संध्याकाळी. काय म्हणालात? रावबहाद्दर कोण? खरेच विसरलात तुम्ही आचार्याच्या ‘साष्टांग नमस्कार’ला! आता आचार्य म्हणजे कोण हे बरीक विचारू नका म्हणजे झाले! तर सांगत काय होतो, की रावबहाद्दर नसले, तरी आजही या देशात काही बहाद्दर नरपुंगव आहेत. त्यातील पहिले नरपुंगव म्हणजे आपले केंद्रीय क्रीडामंत्री नामदार राज्यवर्धन राठोडसाहेब. रावबहाद्दरच हो ते. देशातील आबालवृद्ध तंदुरुस्त नसतील, तर देश कसा बरे तंदुरुस्त राहील? तो तंदुरुस्त नसेल, तर विकास कसा होईल? तेव्हा या नवरावबहाद्दरांनी प्रण केला, की भगीरथ प्रयत्न करायचे, परंतु देशास तंदुरुस्त करायचेच. मस्तकात तिडीक गेल्यासारखे उठले ते आणि काय नवल सांगावे.. भर कार्यालयातच त्यांनी व्यायामास सुरुवात की हो केली. त्याची चित्रफीत दिली दोघा-तिघांस पाठवून. म्हणाले, हा पाहा मी कसा तंदुरुस्त आहे. तुम्ही आहात का तसे? असाल, तर पाठवा तुमच्या व्यायामाची चित्रफीत पाहू. झाले, आव्हानच दिले की त्यांनी! मग काय, सगळेच त्या आव्हानात न्हात न्हात ‘तंदुरुस्ती की रक्षा करता हे मोदीबॉय’ असे म्हणू लागले. मंत्री, अभिनेते, तारका, क्रीडापटू.. घे कॅमेरा, कर व्यायाम आणि दे आव्हान असे एक मधुरसे वातावरण तयार झाले देशभरात. आमचा विराट कोहली.. बिचाऱ्यास स्लिप डिस्क की कायसे झाले.. परंतु त्यानेही आव्हान दिले. कोणास? अहो, साक्षात प्रधानसेवकांस. आता त्यांच्यापुढे का कमी कामे आहेत? इंधन भडकलेय, तमिळनाडू पेटलेय, ते सैतान तिकडे सीमेवर गोळीबार करीत आहेत.. एक का कामे आहेत? पण नाही, त्यांना कोणी आवाहन केले नि त्यांनी ते धुडकावले असे कधी झाले आहे का? त्यांनीही विराटचे विराट आव्हान स्वीकारले. याला म्हणतात खरे रावबहाद्दर. त्यांना हे माहीतच आहे, की व्यायाम केल्याशिवाय देश पुढे जाणार नाही. स्वच्छतेशिवाय देश पुढे जाणार नाही. हार्ड वर्क महत्त्वाचे हो. आता हेच पाहा ना, मुले तंदुरुस्त झाली, धावू लागली, तर त्यांना कशाला लागतील ती वाहने? कुठेही ती पळतच जातील की नाही? सुटला की नाही इंधनाचा प्रश्न? म्हणून तर तातडीने मोदीजींनी कोहलीचे आव्हान स्वीकारले.. बाकी सगळी आव्हाने बाजूला ठेवून. आम्ही चिंता मिटली म्हणतो ना ते त्यामुळेच. या चित्रफिती पाहून देश नक्कीच तंदुरुस्त होणार पाहा!