मित्रहो, आधी आपल्या नेत्यांनी रथयात्रा काढून देश ढवळून काढला. आता आपण गावाशी नाते जोडणार आहोत. पक्षाचे खासदार आपापल्या मतदारसंघात गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षांनिमित्त दीडशे किलोमीटरच्या पदयात्रा काढणार आहेत, आता गांधी विचारासोबत पुढची वाटचाल करावयाची आहे’.. कार्यकर्त्यांच्या बैठकीत रावसाहेबांनी सांगितले, आणि सर्वाच्याच चेहऱ्यावर काळजीची काजळी दाटली. ‘प्रज्ञादेखील पदयात्रा काढणार?’.. कुणीतरी कार्यकर्ता हळूच दुसऱ्याच्या कानात कुजबुजला. पण रावसाहेबांनी ते ऐकलेच. ते अस्वस्थ झाले. लगोलग दालनात येऊन कपाळावरचा घाम पुसत ते खुर्चीत बसले. रावसाहेबांनी अलीकडेच आपल्या दालनात गांधीजींच्या प्रतिमा अनावरणाचा मोठा सोहळा साजरा केला होता. त्यांची नजर त्या प्रतिमेकडे गेली. भिंतीवरच्या प्रतिमेतले गांधीजी आपल्याकडे पाहून हसत आहेत, असा त्यांना भासही झाला.  ‘आता पूर्वतयारी करायला हवी’.. ते स्वतशीच पुटपुटले. मतदारसंघात आलिशान मोटार न वापरता घोडय़ावर मांड टाकून आणि दोन साथीदार सोबतीला घेऊन गावागावात जायचे, हा रावसाहेबांचा शिरस्ता होता. खाचखळग्यातून, डोंगरदऱ्यांतून चालताना घोडं अडखळत नाही, आणि मतदारांच्या दारापर्यंत पोहोचता येते. त्यामुळे रावसाहेब मतदारसंघाच्या दौऱ्यासाठी घोडय़ावरूनच रपेट करायचे. मतदारसंघात  २ ऑक्टोबर ते ३१ जानेवारीपर्यंतच्या  कोणत्याही ३० दिवसांत १५० कि.मी. पदयात्रा काढायचा आदेश आता थेट ‘वरून’च आलेला असल्याने, येत्या दोनअडीच महिन्यांत चालण्याची सवय केली पाहिजे, असे रावसाहेबांनी ठरविले, आणि बेल वाजवून फक्कड चहाची ऑर्डर दिली. बैठकीस आलेले कार्यकर्ते अजूनही सभागृहातच रेंगाळले होते. गांधी जयंतीच्या दिवशी पदयात्रेस सुरुवात करून, दररोज पंधरा किलोमीटरचा परिसर पायी पालथा घालावयाचा असल्याने, कार्यकर्त्यांचे गट तयार करण्याच्या सूचना रावसाहेबांनी बैठकीत दिल्या होत्या. पहिल्या दिवशी पदयात्रेत कोणता गट सहभागी होणार, यावर कार्यकर्त्यांमध्ये खल सुरू झाला. पहिल्या टप्प्यात पक्षात नव्यानेच पक्षात दाखल झालेल्या नेत्यांचे गट करावेत आणि साहेबांनीच पहिल्या दिवशीची पदयात्रा काढावी, असा तोडगा एका  कार्यकर्त्यांने निरागस चेहऱ्याने सुचविला. संध्याकाळी शाखेत या कार्यक्रमाची सविस्तर आखणी करावी, असेही कुणीतरी सुचविले. पण शाखेत या विषयावर चर्चा करावी किंवा नाही, यावर एकमत होत नव्हते. अखेर, पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांच्या उपस्थितीतच पदयात्रांचा पहिला आठवडा साजरा करावा, असा धूर्त तोडगा पुढे आला. त्यावर एकमत झाले, आणि एका कार्यकर्त्यांने हा कार्यक्रम रावसाहेबांच्या कानावर घातला. रावसाहेबांनी गालात हसून त्याला मंजुरी दिली, आणि पदयात्रेची आखणी सुरू झाली. गांधी जयंतीनिमित्त आखलेल्या या मोहिमेदरम्यान नेत्यांनी रस्ते सफाईचे काम करून गांधीजींची शिकवण आचरणात आणावी,  असा एक विचार पुढे आला. एका दिवशी मनरेगाच्या कामात नेते व खासदारांनी स्वत किमान दोन तास तरी काम केल्यास ती गांधीजींना खरी आदरांजली ठरेल, असे एका कार्यकर्त्यांने सुचविले. साहेबांचा ‘पीए’ डायरीत सारे लिहून घेत होता. दालनाच्या भिंतीवरील ती प्रतिमा आपल्याकडेही पाहून हसत आहे, असा भास त्याला झाला, आणि त्याने डायरी बंद केली.. या कार्यक्रमाच्या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना वा छायाचित्रकारांना मतदारसंघात मनाई करावी, असे एकाने सुचवले, आणि अचानक पीएच्या रागाचा पारा चढला. तो काहीशा रागानेच ओरडला,‘तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहात, की स्वयंसेवक?’