25 March 2019

News Flash

आधी विसरले, आता आठवले..

चारोळी ऐकविणार या अपेक्षेने श्रोते सरसावून बसतात आणि कधी कधी त्यांचा भ्रमनिरास होतो.

संग्रहित छायाचित्र

गंभीर चेहऱ्याने आणि गंभीर मुद्दय़ावर रामदास आठवले बोलावयास उभे राहिले, की आता ते काही तरी विनोद करणार किंवा एखादी स्वरचित चारोळी ऐकविणार या अपेक्षेने श्रोते सरसावून बसतात आणि कधी कधी त्यांचा भ्रमनिरास होतो.  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बोलायला सुरुवात केली, की श्रोतेच त्यांना कवितेची गळ घालतात आणि आढेवेढे न घेता आठवले कविता पेश करतात.  परवा मात्र पुण्यात तेअंतर्मुख झाले. ते स्वत: मंत्री झाले, पण त्यांच्या पक्षाचा कोणताही कार्यकर्ता आमदार-खासदार झालाच नाही. सत्तेची गणिते बांधत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या साऱ्या पक्षांसोबत युतीची मोट बांधणाऱ्या आठवलेंना आता महाराष्ट्रात युतीसाठी एकच पक्ष शिल्लक राहिला आहे. मनसे!.. मागे एकदा राज ठाकरे यांच्याशी झालेल्या गप्पांमध्ये आठवलेंना आपल्या पक्षाने युतीसाठी केलेली पायपीट आठवली आणि भविष्यात राज ठाकरेंच्या त्या पक्षासोबत युती करण्याचे सावधसे सूतोवाचही त्यांनी करून ठेवले. कसेही करून आपल्या पक्षाचा एखादा तरी कार्यकर्ता आमदार-खासदार व्हायला हवा, या तळमळीचेच हे साक्षात उदाहरण.. स्वत: आठवलेंना आजवरच्या अनेक युती-आघाडय़ांमुळे सतत सत्तेची ऊब लाभली असली तरी आपले कार्यकर्ते मात्र वंचितच असल्याची व्यथा त्यांना आता छळू लागली आहे. ‘मंत्रिपद मिळाले आहे मला, कसे मिळवायचे याची येते मला कला, म्हणूनच हा समाज इथे आला, कारण मी आहे सच्चा जय भीमवाला’ या आठवलेंच्या चारोळींना कधीकाळी अनुयायांनी टाळ्यांच्या गजरात डोक्यावर घेतले होते. ‘नितीन गडकरींचे वय झाले साठ, आता सोडणार नाही कधीच तुमची पाठ, देशात आहे मोदीजींची लाट, महाराष्ट्रात धरू विकासाची वाट’ अशा शब्दांत भाजपसोबत राहण्याची हमी देणारे आठवले आणि युती करूनही काहीच मिळाले नसल्याच्या जाणिवेने खंतावलेले आठवले यांतले खरे आठवले कोणते, हा प्रश्न आता अनुयायांना पडला असेल. सरकारसोबत राहायचे, एवढेच नाही तर त्यांची पाठ सोडायची नाही असे ठरवणारे आठवले म्हणजे, आजच्या सत्तेतील विरोधकांसाठी एक वेगळा आदर्श आहेत. सरकार असेल किंवा नाही, आपण मंत्री असू किंवा नाही, आपला पक्ष सत्तेत राहील किंवा नाही असे बोलणाऱ्या आणि खिशातल्या राजीनाम्याच्या घडय़ा वारंवार चाचपणाऱ्या नेत्यांना आठवले कानपिचक्या देतात, अन्य पक्षांतील नाराजांना ते आपल्या पक्षात आमंत्रणही देतात आणि खुलेपणाने आपल्या पक्षाच्या अपयशाचे आत्मपरीक्षण करण्याचीही तयारी करतात. अलीकडे राजकारणात असा पारदर्शकपणा कमी होत असताना, आठवले आत्मपरीक्षणास निघाले आहेत. त्यांच्या पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात असे आत्मपरीक्षण होईल. आठवलेंना मंत्रिपद मिळाले आणि शपथविधीच्या वेळी ते स्वत:चे नाव घेण्यासच विसरले. तेव्हा त्यांच्या नावाने एक कविता समाजमाध्यमांवर जोरदार फैलावली होती. ‘मंत्रिपद के आनंद में मैं इतना फुल्या, इतना फुल्या, की मैं खुदका नाम लेने को भी भुल्या’.. अशा दमदार विनोदाचे धनी होणारे आठवले नेहमीच विनोदी नसतात. ते कधी कधी गंभीरही होतात. सध्या त्यांची गंभीरावस्था सुरू आहे. पक्षाची गरज त्यांनी ओळखली हा त्या अवस्थेचाच परिणाम!

First Published on May 28, 2018 12:27 am

Web Title: ramdas athawale 11