लोकशाहीमध्ये काहीही घडू शकते. एखाद्या पक्षाचा एकच सदस्य संसदेत असेल तरी तो केंद्रीय मंत्रीही होऊ शकतो, हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे आवडते वाक्य होते. भारताची लोकशाही ही अशा वैशिष्टय़ांनी नटलेली असल्याने, आजही असे चमत्कार पाहावयास मिळतातच. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला भलेही निवडणूक आयोगाची मान्यता नसेल, त्यांच्या पक्षाचा एकही सदस्य निवडणुकीत विजयी होऊन लोकसभेत गेला नसेल किंवा राजकीय पक्षाचे अधिकृत चिन्हही त्यांच्या पक्षाकडे नसेल; पण स्वत: आठवले केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांच्या पक्षाला मान्यता नसली म्हणून काय झाले?.. तो पक्ष तर सातासमुद्रापार पोहोचलेला आहे. आता अमेरिकेत पक्षाची शाखा सुरू करण्याचा विचार आठवलेंच्या मनात असल्याची कुणकुण काही जणांना लागली आहे, असे म्हणतात, कारण अमेरिकेतही रिपब्लिकन पार्टीचाच झेंडा फडकला आहे. त्यामुळे आठवलेंची छाती छप्पन्न इंचांनी फुगली असेल, तर त्यात काही गर नाही. अमेरिकेचे नवे धनवान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचेच आहेत आणि अमेरिकेतील कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांच्या पािठब्यावरच ते निवडून आलेले आहेत, त्यामुळे आता आठवले स्वत: अमेरिकेत जाऊन ट्रम्प यांचे व्हाइट हाऊसमध्ये अभिनंदन करणार आहेत. हा अभिनंदन सोहळा जेव्हा प्रत्यक्षात अस्तित्वात येईल, तो क्षण भारतासाठी अभिमानास्पद ठरेल. भारतात ज्या पक्षाला मान्यतादेखील नाही, स्वत:चे निवडणूक चिन्ह नाही, एकही उमेदवार लोकसभेत नाही आणि पक्ष म्हणून अस्तित्व दाखविण्याएवढी जनाधाराची टक्केवारीही नाही, त्या पक्षाचा माणूस थेट अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो आणि त्या पक्षाचा नेता भारतात एक केंद्रीय मंत्री आहे, हा योगायोग प्रत्येक भारतीयास कमालीचा सुखावणाराच आहे. रिपब्लिकन पक्षाच्या या नवनिर्वाचित अध्यक्षाचे अभिनंदन करण्यासाठी स्वत: पक्षाध्यक्ष रामदास आठवले अमेरिकेत जाणार आहेत. तसे त्यांनीच कोल्हापुरात जाहीर केले आहे. ट्रम्प-आठवले भेट हा भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांना नवी दिशा देणारा अध्याय ठरावा आणि आठवले यांच्या पक्षालाही आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त व्हावे यापरता सुवर्णयोग भारतासाठी कोणता असू शकतो? आठवले यांच्या त्या भेटीच्या ऐतिहासिक क्षणानंतर अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाची शाखा सुरू होणार अशीही कुजबुज सुरू झाली आहे. तसे असेल, तर गावोगावीच्या शाखांमध्ये शाखाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, महिला आघाडीप्रमुख, प्रदेशाध्यक्ष आदी नियुक्त्यांसाठी भूमिपुत्रांना नेतृत्वाच्या नव्या संधी उपलब्ध होतील व अमेरिकेच्या राजकीय क्षितिजावर रिपब्लिकन पक्षाचा झेंडा अधिक डौलाने फडकू लागेल. आठवलेंच्या ट्रम्पभेटीत या नियुक्त्यांवरही महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे, असे काही अनधिकृत परंतु खात्रीलायक सूत्रांकडून समजते. तूर्तास या संभाव्य भेटीची तारीख, तपशील आणि चच्रेचे संभाव्य मुद्दे रामदासजींनी गुप्त ठेवले असले, तरी त्याचा गाजावाजा होणारच आहे. अमेरिकेतील व्हाइट हाऊसमध्ये या सोहळ्याची शानदार तयारी सुरू झाल्याचीही चर्चा आहे.