संक्रांतीच्या निमित्ताने गोड बोलण्याचे पथ्य पाळणे ही एक कसरतच असते. पण गोड बोलायलाच हवे म्हणून साखरपेरणी केलेले शब्द वापरून आतला कडवटपणा जाणवू न देण्याचा शहाणपणा दाखविणे ही त्यातूनही मोठी कसरत असते. साऱ्यांना ती साधते असे नाही. कडू शब्दांना साखरेचा मुलामा देऊन ते शब्द दुसऱ्याला पचवायला लावण्याचे कौशल्य ज्याला साधते, अशी व्यक्ती राजकारणात पक्की मुरलेली असते. तसेही राजकारणाला गोडाचे वावडेच असते. एकत्र नांदणारेही एकमेकांविषयी कडवट बोलतात. अशा स्थितीत साखरपेरणी केलेल्या कडवट शब्दांचे फुलोरेदेखील समाधान देऊन जातात. म्हणून, रामदास आठवलेंच्या राजकारणास मानायला हवे. संक्रांतीच्या तोंडावर आठवलेंनी जी काही शाब्दिक साखरपेरणी करून  सत्ताधारी पक्षाला कडूकहर मात्रा चाटायला लावली, ते पाहता आठवले आता राजकारणात पक्के मुरले यात शंका नाही. अर्थात, तसे करण्यावाचून त्यांना पर्याय नाही. युती करण्यासाठी शिल्लक असलेला एकमेव पक्ष म्हणून नाइलाजाने त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि सरकारात शिरकाव करून घेतला. तसा अजून एक अंधूक पर्याय त्यांच्यासमोर आहे, पण त्या पर्यायाला सत्तेची संधी सध्या तरी दृष्टिपथात नसल्याने आठवलेंनी तो राखून ठेवला आहे. त्यामुळे ज्यांच्यासोबत राहायचे, ज्यांनी सत्तेची संधी दिली, त्यांच्याशी कसेही करून जुळवून तर घ्यायचे आणि ज्यांच्यामुळे ही संधी मिळाली, त्या जनतेला झिडकारायचे नाही अशा कात्रीत सापडल्यावर कडवट शब्दांनाही गोड मुलामा देण्याशिवाय पर्यायच राहत नाही. आठवलेंनी ते केले हे बरेच झाले. तसेही आजकाल सत्ताधारी भाजपमध्येही अनेक जण ‘मन की बात’ उघडपणे बोलू लागले आहेतच. ‘भाजपमध्ये प्रामाणिक कार्यकर्ते दुर्बिणीतून शोधावे लागतात’, अशी कबुली चंद्रकांतदादांनी दिली, त्यापाठोपाठ ‘पुढचे सरकार आमचे असेलच याची शाश्वती नाही’ असे गिरीश बापटांनी जाहीरच करून टाकले. अशा परिस्थितीतही भाजपमुळे मिळालेल्या मंत्रिपदाच्या संधीशी इमान राखतानाही मनातली खदखद गोड शब्दांत बोलून दाखविण्याचे कसबी धाडस रामदास आठवलेंनी दाखविले. पाटील आणि बापट यांच्या शेऱ्यांमुळे तोंडे कडवट झालेल्या भाजपाईंची स्थिती आठवलेंच्या साखरपेरणी केलेल्या मुलामेदार शब्दशेऱ्यांमुळे, ‘सहन होत नसले तरी सांगता येत नाही’ अशी झाली असेल. भीमा-कोरेगावच्या दंगलीनंतर राज्यात सामाजिक ढवळाढवळ झाली, त्याहूनही अधिक मंथन राजकारणात सुरू झाले. त्यातूनच, दलित समाजाच्या राजकीय नेतृत्वाचा अमृतकलश बाहेर निघणार असल्याने निकराच्या या ढवळाढवळीत आठवले आणि आंबेडकरांनी बाह्य सरसावून समोरासमोर यावे हे साहजिकच आहे. आठवलेंना मात्र, यासाठी थोडी अधिकच कसरत करावी लागणार आहे. तसे त्यांनी केले. सरकारविरुद्ध दलित समाजाच्या मनातील रोषाची कारणे पुन्हा एकदा उच्चारून आठवलेंनी गोड शब्दांत अन्यायाचे पाढे वाचले आणि दलित समाजाच्या भावनांचा आपल्याला विसर पडलेला नाही, हे दाखवूनही दिले. आठवलेंची ही गोड मात्रा सरकारला पचते की गोडाचा मुलामा संपताच सरकारचे तोंड कडू होते, हे भविष्यकाळ ठरवेलच!