भल्या पहाटे नऊच्या सुमारास उठावे. प्रातकालीन मुखमार्जनादी क्रियाकर्मे करावीत व नजर कितीही मुदपाकखान्याकडे वळत असली, तरी मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असे म्हणत चटई अंथरावी व मोजून पावणेदहा मिनिटे वज्रासन, ताडासन ते शवासन आदी योगासने करावीत, हा आमचा दिनक्रमाचा भाग बनलेला आहे. त्यायोगे आमचे आरोग्य एवढे उत्तम बनले आहे की दिवसास साताठ वडापाव विथ तली हुई मिर्ची याचे आम्हांस काहीच वाटत नाही. तर हा आरोग्यकृपाप्रसाद आम्हांस ज्यांच्यामुळे मिळाला ते आमचे महागुरू बाबा रामदेवजी पतंजलीवाले यांस झालेले दुख पाहून आमचे काळीज आज तीळतीळ तुटत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील ती वेदना कोणास दिसणार नाही, जाणवणार नाही. नाही नाही, चेहऱ्यावरील वेदना लपविण्यासाठी ते पतंजलीची कोणतीही क्रीम वापरत नाहीत. खूप दाढीमिशा वाढलेल्या असल्या की अशी कोणतीही पावडर वा लोशन लावण्याची आवश्यकताच भासत नाही. काय आहे ती वेदना? ते समजले ना, तर वाचकहो, तुमचेही अश्रुपिंड भरून येतील. पापण्या ओल्या होतील. ‘दोस्त दोस्त ना रहा’ अशी साक्षात् राजकपुरी वेदना आहे ती. रामदेवजींनी आपल्या मित्रवर्यासाठी काय केले नाही? प्रचार केला, सभा घेतल्या, उपोषण केले. एके प्रसंगी तर ब्रृहन्नडा रूप धारण केले. परंतु अखेर त्या मित्रांनी त्याबदल्यात त्यांस काय दिले? काय मागणी होती त्यांची? या भारतवर्षांतील, राम आणि कृष्णाच्या भूमीतील कष्टकरी, कास्तकारांचे जीवनमान उंच उंच करायचे होते त्यांना. या कष्टकरी, कास्तकारांनी स्वदेशी च्यानेल पाहून धष्टपुष्ट निरोगी व्हावे, त्यांनी आयुर्वेदिक तूप बिस्किटे खावीत, आयुर्वेदिक फोनवरून बोलावे, आयुर्वेदिक न्हावे, आयुर्वेदिक चेहऱ्याचा रंग उजळणारी मलमे लावावीत, झालेच तर आयुर्वेदिक जीन्स घालाव्यात.. देशात एक स्वदेशी राष्ट्रवादी आयुर्वेदिक उद्योग उभा राहावा आणि त्यातून स्वदेशी राष्ट्रवादी आयुर्वेदिक शेतकरी उभा राहावा.  हिमाचलापासून विदर्भापर्यंत त्यांची पायपीट त्यासाठीच चालली होती. त्याकरिता काय हवे होते त्यांना? वामनाप्रमाणे तीन पावले जमीन तर मागत नव्हते ते. त्यांना काही हेक्टर जमीनच हवी होती. मित्रवर्यानी ती त्यांच्या झोळीत टाकू नये? काहींनी टाकली. नाही असे नाही. परंतु ते सारे संसारी मित्र. भगवद्भक्तीकरिता ज्यांनी संसाराचा, मोहमायेचा, अहंकाराचा त्याग केला अशा योगी पुरुषाने मात्र त्यांस असाह्य़ केले. उत्तर प्रदेशातील यमुना द्रुतगती मार्गासमीप एक अन्नोद्यान (पक्षी : फूडपार्क) उभारण्यासाठी योगी आदित्यनाथांकडून मदत हवी होती त्यांना. परंतु त्या योग्याने या योग्यास मदतीस अयोग्य समजले बहुधा. विकासाच्या झारीतील शुक्राचार्यच निघाले ते योगी. का, तर म्हणे बाबाजींच्या कंपनीने योग्य ती कागदपत्रे वगैरे सादर केली नाहीत. हे का कारण झाले? इतरांनी नाही बरे अशी खुसपटे काढली? लाल गालिचे अंथरले बाबाजींसाठी त्यांनी. तेही कवडीमोलाने. कषायवेशधारी आदित्यनाथांनी मात्र बाबाजींच्या स्वदेशी धंद्यात अडथळेच उभे केले. आता यावर खरे तर बाबाजींनी आपला तिसरा योगनेत्रच उघडला असता. जिव्हेचे धनुरासन करून टीकेचे बाण सोडले असते. परंतु नाही. बाबाजींनी संयमासन केले आणि ते अन्नोद्यान तेथून हलविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अन्नोद्यान हलविल्याने रामकृष्णाच्या भूमीतील शेतकऱ्यांना आता अन्नास मोताद तर व्हावे लागणार नाही ना, या विचाराने किती वेदना झाली असेल बाबाजींना तो निर्णय घेताना! आमची त्यांना एवढीच विनंती आहे, की हे योगी पुरुषहो.. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी बघा ना, एखादे मांडवल्यासन आहे का?