27 October 2020

News Flash

दुष्काळाशी दोन हात!

‘सायेब, आमच्याकडं दुष्काळाशी दोन हात करायची लई जोरदार तयारी सुरू झालीया.

(संग्रहित छायाचित्र)

उन्हं अंगणात उतरली अन् अंगाला आळोखेपिळोखे देत रावसाहेब उठले. तांब्याभर पाणी तोंडावर मारून, तोंड खंगाळून ते दिवाणखान्यातल्या सोफ्यावर बसले. एका हातात चहाचा कप उचलून रावसाहेबांनी समोरचं वर्तमानपत्र उघडलं, आणि त्यांचे डोळे चमकले. ‘शीयेम साहेब पन बोलायले.. म्हंजे आता दुष्काळ दूर न्हाई!’ चहाचा दमदार घुटका मारून रावसाहेब स्वत:शीच बोलले आणि त्यांनी गण्याला हाळी दिली. रावसाहेबांनी बोटानंच बातमी गण्याला दाखवली.. ‘चला, तयारी सुरू करा. समद्यास्नी बोलवा.. आजच्या आज धोरण तयार करायला पायजे!’ दुपारच्याला रावसाहेबाच्या दिवाणखान्यात गावातली विश्वासू माणसं- म्हणजे, कार्यकत्रे-  गोळा झाले व्हते. रावसाहेबांनी समद्यांस्नी वर्तमानपत्राची ती बातमी दावली. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.. ‘बघा, आता म्हैनाखेरीनंतर कवा बी दुष्काळ झाईर व्हईल.. शीयेम सायबांनी स्वत्ता लक्ष घातलंय. आता आपन बी दुष्काळाशी दोन हात करायची तयारी ठिवायला हवी!’ एवढं बोलून रावसाहेबांनी कार्यकर्त्यांवरून नजर फिरवली. समद्यांचे डोळे चमकू लागल्याचे बघून साहेब खूश झाले. ‘आपण लई दुष्काळ बघितल्याली मानसं हायेत.. तवा, यंदाच्या दुष्काळात आपन कुटं बी कमी पडनार न्हाई याची दक्षता घ्यायला हवी!’ नजरा आणखीनच चमकू लागल्या. ‘पसं तयार ठिवा. पायजे तर जिल्हा बँकेत प्रकरणं करून उचल घ्यून ठिवा. जनावरं बाजारात इक्रीला येतील. पडत्या किमतीत मिळत्यात. त्यासाठी पका हाताशी हवा.. कुनी गरीब मान्सं आपली शेतीवाडी इकायला काडंल.. ती पन वाया जाऊं द्याची न्हाई .. गरिबास्नी मदत करायला पायजे.. चारापानी अगूदरच खरेदी करून ठिवा.. आनि म्हत्त्वाचं म्हंजी, टँकरवाल्यास्नी उद्याच बोलवा. व्यवहार अगुदरच ठरल्याला असला म्हंजी आयत्या येळंला गडबड व्हनार न्हाई!’ रावसाहेब बोलत होते, आणि कार्यकत्रे समजूतदारपणे माना हलवत होते. काही वेळ रावसाहेब गप्प बसले, आणि कार्यकत्रे आपसात कुजबुजू लागले. मागच्या दुष्काळात काय कमावलं, काय चुकलं याचे हिशेब त्यांच्या गप्पांतून चुकते होताना पाहून, यंदाच्या दुष्काळात कुटंच आपन कमी पडनार न्हाई याची रावसाहेबास्नी खात्रीच झाली. रावसाहेबांनी पुन्हा एकवार घसा खाकरला.. ‘आता कलेक्टरसाहेब गावात पाहनी का काय करायला यील .. हिरी बगून कुटल्या हिरी ताब्यात घ्याच्या ते ठरवंल. त्याची खबर अगुदर आपल्याला लागली पायजे. काय?’ ..पुन्हा सगळ्यांनी माना हलवल्या. ‘त्याच्या आधीच आपल्या हिरीतलं समदं पानी उपसून श्येताला लावून घ्या. समद्या हिरी कोरडय़ाठाक दिसल्या पायजेत. तरीबी त्यानी ताब्यात घेतल्या, तर टँकर यायच्या आदुगर आपलं पानी आपल्या श्येतात जायला पायजेल..’ रावसाहेब बोलत होते, आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा माना हलविल्या. चहापान झाले आणि मीटिंग संपली.. गण्या भायेर आला. तो लईच बेचन दिसत व्हता. समदे कार्यकत्रे घरी गेल्याचं बघून त्यो शेतात लांबवर गेला, आणि त्यानं मोबाइलवर शीयेम सायबास्नी फोन लावला. ‘सायेब, आमच्याकडं दुष्काळाशी दोन हात करायची लई जोरदार तयारी सुरू झालीया. त्यावर जरा ध्यान द्या.. न्हाईतर पब्लिक खवळंल!’.. गण्यानं झटक्यात बोलून फोन बंद केला..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 1:54 am

Web Title: raosaheb danve remarks on drought in maharashtra
Next Stories
1 सर्वात पुढे आहे..
2 सही ‘उत्तर’..
3 कुटुंबसहलींचे (विराट) प्रपोजल..
Just Now!
X