श्री क्रमांक २०१६, प्र. क्रमांक २९७

सरकारचा यज्ञयाग, पूजापाठ, गंगापूजन विभाग

ई-निविदा मागवणारी सूचना

शत्रुराष्ट्रातील सैनिकांवर अहिंसक मार्गाने विजय मिळवण्यासाठी जे उपाय योजण्याचे योजिले आहे, त्यासाठी सरकारतर्फे इच्छुकांकडून टक्केवारीची ई-निविदा मागवण्यात येत आहे. ई-निविदा पोहोचण्यात काही अडचणी येत असल्यास साधीसुधी, कागदावरील निविदाही चालेल.

कामाचे स्वरूप – सीमेवरील वातावरण सध्या फारच प्रदूषित झाले आहे. हे दूषित वातावरण दूर करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी सदरहू परिसरात यज्ञयागांची आवर्तने करावयाची आहेत. यज्ञयागांसाठी सीमाप्रदेशातील मंदिरे शोधणे, त्यासाठीची पूर्ण तयारी करणे. उदा. विटा, गोवऱ्या, समीधा, साजूक तूप, उदबत्त्या, ज्या काडेपेटीवर घर्षण झाले असता काडी पेटते अशी काडेपेटी व काडय़ा, मोठय़ा आकाराचे पंखे, दर्भासने, देशभक्त, साबुदाण्याची खिचडी, उपवासाचे नाना पदार्थ यांची व्यवस्था करावी लागेल. आपल्या शेजारी राष्ट्राकडून आपल्याला वारंवार त्रास दिला जात आहे. शमीच्या झाडावरील शस्त्रे आपण दसऱ्याच्या आधीच काढलेली आहेत. काही मूढ जनांना ती दिसत नसली तर तो त्यांचा दृष्टिदोष. तरी या शत्रूला जिंकून घेण्यासाठी यज्ञाचे आयोजन करावयाचे आहे. पवित्र व धगधगत्या अशा यज्ञकुंडांतून निघणारा धूर मोठय़ा आकाराच्या पंख्यांनी शत्रूच्या प्रदेशात धाडायचा आहे. अव्वल मंडळींच्या मंत्रोच्चाराने भारित झालेला हा धूर शत्रूच्या प्रदेशात गेला व तेथील सैनिकांच्या श्वासात तो मिसळला की त्यांच्या मनातील आपल्या मुलखाविषयीचा वैरभाव नष्ट होईल. त्यांच्या हातातील शस्त्रे आपसूक गळून पडतील व त्याच हातांमध्ये आपल्याला भेट देण्यासाठीची कमळे खुलून दिसू लागतील. त्यामुळे सीमेवर शांतता नांदू लागेल. या यज्ञासोबतच काही मंत्रांचे उच्चारणही सीमेवर करावयाचे आहे. त्या मंत्राने वातावरणात शांततेचे तरंग निर्माण होऊन ते शत्रूच्या मुलखात पोहोचतील. त्या तरंगांमुळे सारेच शत्रू मित्र होतील आणि सीमाप्रदेश तंटामुक्त होईल.

शर्ती व अटी – हा यज्ञ साधासुधा नाही. आपल्या सीमेवरील प्रदूषण हटवण्याचा हा प्रश्न आहे. अशी कामे करायची म्हणजे मन शुद्ध हवे आणि माणसे देशभक्त हवीत. यज्ञात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांची मने शुद्ध आहेत किंवा नाहीत, याची तपासणी करण्यासाठी सरकारतर्फे विविध ठिकाणी केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. तेथील प्रशस्तिपत्रक अनिवार्य राहील. त्याखेरीज देशभक्तीच्या प्रमाणपत्रासाठी खास परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. खास उभारलेल्या परीक्षा केंद्रात या परीक्षा होतील. या परीक्षेत गोमाता, गोमूत्राचे लाभ, भारतमाता की जय, सूर्यनमस्कारांचे महत्त्व, पुरावे – एक देणे, ५६ इंची छाती, भारतवर्षांच्या उन्नतीमधील नागपूरचे योगदान आदी विषयांवर निबंध लिहावे लागतील. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पैकीच्या पैकी गुण मिळवणे अनिवार्य राहील. अधिक तपशील सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेच. त्याचा शतप्रतिशत लाभ घ्यावा.