गेले काही दिवस आम्ही गुप्तपणे मंत्रालयाच्या कानाकोपऱ्यात फेरफटके मारू लागलो असून कोपऱ्यातल्या फायलींच्या ढिगाऱ्यात, जिन्याखालच्या अडगळीत, भिरभिरत्या नजरेने शोधमोहीम सुरू केली आहे. गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक गाजलेल्या एका महामोहिमेचा गाजावाजा झाल्यापासून मंत्रालयात ज्या ज्या जागी आम्ही नजर एकवटतो, तिथे तिथे सन्नाटा पसरलेला असून साऱ्या संबंधितांनी एकजात दडी मारली असावी की काय या शंकेने आमचे मन हैराण झाले आहे. नाथाभाऊ  खडसेंनी मंत्रालयातील मूषकसंहार सप्ताहाची सुरस गोष्ट राज्याच्या विधिमंडळात सांगितल्यापासून मंत्रालयातील फायलींच्या चवीला चटावलेल्या असंख्य मूषकांनी जणू दडी मारली आहे.  मंत्रालयात दोन वर्षांपूर्वी मूषकसंहाराची व्यापक मोहीम हाती घेण्याचे ठरले होते, त्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या, एका मजूर संस्थेने ते कंत्राट हाती घेतले होते, हे नाथाभाऊंनी दिलेले सारे तपशील खरे निघाले. पण तीन लाख १९ हजार ४०० उंदीर मारले असा याचा अर्थ होत नाही, असा खुलासा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने केल्याने, मंत्रालयातील मूषकसंहार सप्ताहाची अखेर कशी झाली हे ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. मी मंत्री होतो तेव्हा मंत्रालयात एकही उंदीर नव्हता, असे रामदास आठवले यांनी छातीठोकपणे सांगितल्याने, मुळात लाखो उंदीर अचानक आले कुठून हा नवाच प्रश्न तयार होतो आणि संहाराची महामोहीम आखून, लाखो गोळ्यांचा पुरवठा करून, कंत्राटे बहाल करूनही, उंदीर मारले किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही हे काहीसे अजबच झाले. नाथाभाऊंचा आकडा हा मारलेल्या उंदरांचा की पुरविलेल्या विषारी गोळ्यांचा असा नवा प्रश्न  मंत्रालयातल्या साऱ्या भिंती एकमेकींच्या कानात कुजबुज करत विचारू लागल्या आहेत, आणि आपापल्या बिळात घुसून चिडीचूप बसलेल्या उंदरांची मात्र उपासमार सुरू आहे. या भिंतींना कान लावल्यावर आम्हासही वेगळेच काही ऐकावयास येऊ  लागले आहे. मंत्रालयातील त्या संहारमोहिमेसाठी विषाच्या गोळ्या पुरविल्याचे खात्याचे- पक्षी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे- म्हणणे असेल, तर गोळ्या ही काही पिण्याची चीज आहे काय, असा प्रश्नही आम्हास भेडसावत आहे. खरे म्हणजे, मंत्रालयात उंदीर पोसणे हे सार्वजनिक हिताचे काम असून, नको असलेल्या फायली त्यांना खावयास घालणे हे एक राजकीय पुण्यकर्म ठरू शकते. असे केल्याने, माहितीच्या अधिकारातील अनेक अर्ज एकच उत्तर देऊन निकाली काढणेही सोपे होणार असून हा अधिकारच निकामी करण्याचे मोठे साधन मूषकावतारामुळे हाती सापडलेले असताना, एवढे अमोघ अस्त्र स्वहस्ते निष्प्रभ करण्याची दुर्बुद्धी का सुचावी, असा प्रश्न मनात आल्याखेरीज राहत नाही. एवढे महत्त्वाचे काम करणाऱ्या संकटमोचक मूषकांच्या नायनाटाचे सप्ताह आखून ‘न खाने दूंगा’ या घोषणेचीच नाहक अंमलबजावणी करण्याऐवजी नाथाभाऊंनी सुचविल्यानुसार दहा मांजरी पाळाव्यात, हे ठीक झालेच. पण आम्हाला वेगळाच उपाय सुचतो. रामदास आठवलेंचाही कानमंत्र घेतला तर?.. तरीही त्यांचा नायनाट करू नये असेच आम्हाला वाटते. ‘जगा आणि जगू द्या’ असा परोपकारी विचार आपल्याला कधी सुचणार?