हे कोणी मान्य करणार नाही. येथील विज्ञाननिष्ठांना तर हे पटणारच नाही. अभक्तांचा तर यावर विश्वासच बसणार नाही, हे आम्ही चांगलेच जाणून आहोत. तरीही आम्हाला आमचे खर्डेघाशीचे कर्तव्य करून पुन्हा एकदा हे स्पष्ट सांगावेच लागेल, की वास्तुशास्त्र हेच या विश्वातील अंतिम शास्त्र आहे, किंबहुना या विश्वाची वास्तूच वास्तुशास्त्रावर अवलंबून असल्यामुळे येथील प्रत्येक गोष्ट, मग त्यात तुमचे ते विज्ञान आले, ते मातं (पक्षी माहिती-तंत्रज्ञान) आले, हे सारे वास्तुशास्त्राच्या नियमानुसारच चालत असते. आता आम्ही असे म्हटले, की लोक त्यावर टीका करणार, ख्यातकीर्त विज्ञानभाष्यकार सत्यपालसिंह डार्विनवाले यांच्या पंक्तीला आम्हांस नेऊन बसविणार. ठीक आहे. या देशात सरकारी सत्य सर्वानाच नकोसे झाले आहे. परंतु फेसबुकचे संस्थापक रा. रा. मार्कजी झकरबर्ग यांना आलेला अनुभव तरी तुम्ही उघडय़ा डोळ्यांनी पाहणार की नाही? माफी मागावी लागली मार्कजींना, की ते फेसबुकचा डेटा सुरक्षित नाही ठेवू शकले. केवढा अवमान सहन करावा लागला त्यांना? अर्थात त्यांच्यासमोर पर्यायही नव्हता. आपले केंद्रीय मातं मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मार्कजींना कडक दमच भरला होता. याद राखा, आमच्या देशातील निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न कराल, तर अमेरिकेतून खेचून आणू तुम्हाला असे रविशंकरजींनी बजावले त्यांना. बिचारे मार्कजी. उगा दाऊद, मल्या, नीरव मोदी, ललित मोदी यांच्यावर येणारी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आधीच माफी मागून मोकळे झाले. येथे सुविद्य वाचकांस प्रश्न पडेल, की मार्कजींचा आणि वास्तुशास्त्राचा संबंध काय? तर तो आहे. साधी गोष्ट आहे, मार्कजींनी भारतीय विज्ञान-तंत्रज्ञानातील महान आविष्कार अशी एक जाडजूड प्रमाणबद्ध भिंत त्यांच्या फेसबुकभोवती घातली असती, तर त्यांच्या डेटाला कशी बरे गळती लागली असती? वास्तुशास्त्र माहीत नसले की बाकीची सर्व शास्त्रे कशी फोल ठरतात हेच यातून दिसते. खरे तर परवापर्यंत आम्हीही या वास्तूबद्दल घोर अज्ञान-अंधकारात होतो. आमचा अज्ञानतमस दूर केला तो भारताचे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी. खरेच, ज्ञानाचा प्रकाश कसा कोठून येईल आणि आपले जीवन उजळून जाईल हे सांगता येत नाही. वेणुगोपाल यांनी ही ज्ञानवेणु वाजविली सर्वोच्च न्यायालयात. तेथे आधारच्या याचिकेवरील सुनावणीत असा मुद्दा आला, की या आधार योजनेला गोसीखुर्दच्या पाटबंधाऱ्यांहून अधिक गळती लागलेली आहे. यवतमाळमधील एका विहिरीत काही दिवसांपूर्वी हजारो आधार कार्डे सापडली, म्हणजे ती गळती केवढी मोठी असेल पाहा. आता त्या याचकांना कळायला हवे ना, की तेथे सापडली ती आधार कार्डे. ती कोणीही तयार करू शकेल. मुख्य प्रश्न आहे तो कार्डाच्या माहितीचा. ती तर सुरक्षितच आहे. वेणुगोपालजींनी स्पष्टच सांगितले, की दिल्लीतील ज्या ठिकाणी आधारचा डेटा ठेवलेला आहे, त्या भोवती १० मीटर उंच आणि चार मीटर रुंदीची भक्कम भिंतच बांधलेली आहे. असा वास्तुसंरक्षित डेटा कोणताही हॅकर चोरूच कसा शकेल? जगातील कोणत्याही मातं तज्ज्ञाने याचे उत्तर दिले तर आम्ही हिंजवडीत जाहीर सभा घेऊन त्याचा सत्कार करू. असो. आता आम्हाला एकच काळजी लागली आहे, की उद्या जगातील सगळ्या डेटाबँका आपापल्या ‘फायर वॉल’ पाडून अशा दहा बाय चारच्या भिंती बांधून मागू लागले, तर त्याकरिता आवश्यक तेवढे वास्तुतज्ज्ञ आहेत का आपल्या स्किल इंडियात?