एकाच कुटुंबात एकत्र राहणाऱ्यांचे एकमेकांमधील अंतर वाढले आणि विभक्तीची वेळ आली तरी परस्परांविषयीचे प्रेम कमी होत नाही, असे अलीकडच्या एका सर्वेक्षणासून स्पष्ट झाले आहे. अशी सर्वेक्षणे आणि असे दिलासादायक निष्कर्ष समोर येऊ लागले, की परस्परांपासून दूर झालेल्यांच्या मनाचा थांग पडताळणे सोपे होते. म्हणूनच, दोन भावांमध्ये मोठा कोण या मुद्दय़ावरून जन्मास आलेला वाद उफाळला व तो विकोपास जाऊन दोघांनी एकमेकांकडे पाठ फिरविली, तरी ते परस्परांपासून कायमचे दुरावले असे म्हणता येणार नाही असा या सर्वेक्षणाच्या निकालाचा अर्थ लावता येईल. अलीकडे कुटुंबे विभक्त होण्याचे प्रमाण वाढले असले, तरी नवी नाती जोडून परिवार वाढविण्याचे प्रयत्नही आसपास सुरू असलेले दिसतात. कुटुंबे विभक्त झाल्याने त्यांची क्षीण होणारी ताकद भरून काढण्यासाठी नवी मैत्रीची नाती जोडली जात असली, तरी मूळ कुटुंबासोबत असलेल्या जिव्हाळ्याचे उमाळे अधूनमधून उफाळून येतच असतात. मोठा भाऊ आणि लहान भाऊ यांच्यात नात्यावरून वाद सुरू झाला आणि कटुता वाढली तर ते परस्परांपासून विभक्त होतात, पण लगेचच त्यांना विभक्तीतून येणाऱ्या एकाकीपणाचा प्रत्यय येऊ लागतो. कदाचित त्यातूनच नव्या मित्रांशी नाती जोडण्याचे प्रयत्न सुरू होतात. विभक्तीचे प्रमाण वाढूनही नवी नाती जोडण्यासाठी धडपडणे हा कुटुंबव्यवस्थेच्या संस्काराचाच एक अप्रत्यक्ष परिणाम! विभक्त झालेल्या भावांना नवे मित्र मिळाले तरी एकमेकांची काळजी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्याच कुटुंबातल्या वडीलधाऱ्यांच्या मनात पुन्हा ऐक्याची ‘मनोहर स्वप्ने’ रुंजी घालू लागतात. ही स्वप्ने नेहमीच साकार होत नसली तरी त्यामुळे ऐक्याची उमेद मात्र जिवंत राहात असते. कुटुंबे आणि मैत्र यांतील दुवा असलेल्या या वडीलधाऱ्यांची स्वप्नेच पुढेमागे परस्परांना एकत्र आणू शकतात हे भावांनाही माहीत असल्याने त्या स्वप्नांना धक्का लावण्याचे धाडस कुणी करत नसते. हादेखील कुटुंबव्यवस्थेच्या संस्कारांचाच परिणाम!.. म्हणूनच दुरावलेल्या नात्यांमधील आपुलकीचा हाच दुवा अधूनमधून अप्रत्यक्षपणे वा कधीकधी प्रत्यक्षपणे प्रकटलेला जाणवतो आणि दोन्ही भावांविषयी प्रेम असलेल्यांच्या मनातील ऐक्याच्या आकांक्षा जिवंत होतात. वर्षांनुवर्षे एकमेकांसोबत राहिलेली नाती अल्पकाळाच्या आणि बेभरवशाच्या हितसंबंधांच्या विचाराने तटातट तुटलेली अलीकडे पाहावयास मिळतात, तरीही ती नाती संपली असे कुणासच वाटत नाही. पुन्हा कधी तरी एखादी अपरिहार्य परिस्थिती निर्माण होईल आणि दुरावलेले दोघे भाऊ पुन्हा त्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी एकत्र येतील, अशी उमेद पाहणारी स्वप्ने हा विभक्तपणाच्या वाढत्या प्रकारांमुळे होणाऱ्या नाजूक मनोवस्थेवर अलवार फुंकर मारण्याचा प्रकार असतो. विभक्त झालेल्या भावांचे भावविश्व जोडण्याची शक्ती या स्वप्नांमध्ये असते. विभक्त होण्याचे प्रमाण कुटुंबव्यवस्थेत वाढत असले तरी एकमेकांविषयी आस्था असते हाच त्या सर्वेक्षणातून निघालेल्या निष्कर्षांचा सूर आहे. ऐक्याची मनोहर स्वप्ने आपले काम करीतच असतात. विभक्तीनंतरच्या ऐक्याच्या प्रत्ययाची प्रामाणिक प्रतीक्षा हीच त्या स्वप्नांची ताकद असते..