बंधू-भगिनींनो, गेल्या साठ तासांपूर्वी एक ऐतिहासिक बातमी आली आहे. तुम्ही ती ऐकली का? (कोरस – होय). जरा मोठय़ाने सांगा, तुम्ही ती ऐकली का? (होऽऽऽ) काय आहे ती बातमी? बंधू-भगिनींनो, ती बातमी आहे एका रोबोची. यंत्रमानवाची, बंधू-भगिनींनो. सौदी अरेबियाने त्या रोबोला नागरिकत्व दिले आहे. एका चौदा इंची महिला रोबोला त्यांनी हा सन्मान दिला आहे. हे मीडियावाले म्हणतात, जगात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. काय हे खरे आहे बंधू-भगिनींनो? (नाही!) मी तुम्हाला सांगतो, याच्याहून मोठे खोटे दुसरे नाही. हा ऐतिहासिक विक्रम जगात सगळ्यात पहिल्यांदा कोणी केला असेल बंधू-भगिनींनो, तर तो या भारत देशाने. (टाळ्या) सौदी अरेबियातला तो सोफिया रोबो बनवला हाँगकाँगच्या कंपनीने; पण आपण पूर्णत: स्वदेशी तंत्रज्ञान वापरून रोबो बनविले आहेत. (टाळ्याच टाळ्या.) त्यांचा रोबो सुबक ठेंगणी आहे; पण आपल्या या देशात आपण किमान ६३ इंची रोबो बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आज असे कोटय़वधी रोबो या देशातल्या कारखान्यांत, दुकानांत, कार्यालयांत, सरकारी कचेऱ्यांत काम करीत आहेत. त्यातले काही तर संसदेतही निवडून आले आहेत आणि बंधू-भगिनींनो, त्यांना येथे नागरिकत्व घेण्याची आवश्यकताच भासत नाही. आपण त्यांचे नागरिकत्व त्यांच्या जन्माशीच लिंक केले आहे. ही मोठय़ा गौरवाची बाब आहे. आहे की नाही? (आहे!) ही गौरवाची बाब आहे की नाही? (आहे!) या देशातल्या काही भारतविरोधी शक्ती विचारतात, की कुठे आहेत हे रोबो? ज्यांना आपल्या प्राचीन परंपरेचे, संस्कृतीचे ज्ञान नाही तेच लोक असे विचारू शकतात. बंधू-भगिनींनो, महाभारत काळातसुद्धा आपल्याकडे रोबो होते. प्रत्यक्ष गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘ईश्वर: सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठती’. पुढे ते म्हणतात, ‘भ्रामयन्सर्वभूतानि यंत्ररूढानि मायया’.. म्हणजे बंधू-भगिनींनो, भगवान सांगतात की, सर्व प्राणिमात्राच्या हृदयात बसून मी त्यांना यंत्राप्रमाणे चालवतो. हे रोबोचे, यंत्रमानवाचे तंत्रज्ञान आपल्याकडे प्राचीन काळीही होते. मधल्या काळात आपण ते विसरलो; परंतु आपण आता त्यात खास सुधारणा केल्या आहेत. आता आपल्याकडे नागरिकांचे रोबो केले जातात. त्यांनी विचार काय करायचा, त्यांनी वागायचे कसे, बोलायचे काय, हे सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बंधू-भगिनींनो, आपण तयार केले आहे. आज अनेक क्षेत्रांत या रोबोंना आपण काम दिले आहे. त्यातून मोठय़ा प्रमाणावर रोजगारवाढ झाली आहे. सौदी अरेबियामध्येपण याची चर्चा आहे. ते विचारत आहेत, की जे आम्ही करत होतो, ते आज भारताने कसे साध्य केले? बंधू-भगिनींनो, एकशेवीस कोटी नागरिकांचा आशीर्वाद आहे हा. तो असाच कायम राहिला, तर बंधू-भगिनींनो, २०५५ पर्यंत या देशातील घराघरांत, शाळाशाळांत असे रोबो आपण तयार करू, बंधू-भगिनींनो..