News Flash

नोटासंवाद..

क्रमांकयादीतून नेमका क्रमांक शोधून त्यांनी त्यावर एक हलकीशी फुंकर घातली.

Demonetisation : देशभरात जनधन खात्यांमध्ये सर्वाधिक पैसा जमा होण्यात पश्चिम बंगाल आणि कर्नाटक ही दोन राज्ये आघाडीवर आहे.

हातातील कुंचला खाली ठेवीत, कुर्रेबाज रीतीने चष्मा ठाकठीक करीत, दाढी कुरवाळीत त्यांनी दूरध्वनी हातात घेतला. क्रमांकयादीतून नेमका क्रमांक शोधून त्यांनी त्यावर एक हलकीशी फुंकर घातली. तत्क्षणी समोरचा दूरध्वनी वाजू लागला. ‘अच्छे दिन आयो रे.. मन आनंद भयो रे..’ अशी रिंगटोन त्यांना ऐकू आली. ज्याला दूरध्वनी केला ती व्यक्ती आता बारामतीत आहे, असे दूरध्वनीसंचावरील पट्टिका दर्शवीत होती. काही वेळापूर्वी नागपुरात असताना त्या व्यक्तीने दूरध्वनी उचलला नव्हता. ‘चालू असतील जोरबैठका, बौद्धिकं.. नंतर करू’, असा विचार करून त्यांनी पुन्हा दूरध्वनी केला होता. काही सेकंदांत समोरच्या व्यक्तीने दूरध्वनी उचलला. ‘जय महाराष्ट्र..’ चष्मा पुन्हा एकदा ठीकठाक करीत धारदार आवाजाने सलामी दिली. ‘हा हा. जै सी कृष्णा..’ समोरची व्यक्ती प्रतिसाद देती झाली. ‘आज पुन्हा बारामतीत?’ ‘हो.. ना. ऊसपेरणीची शिकवणी लावली आहे मी. त्यासाठी १५ दिवसांतून एकदा येतो इथं. म्हणून आलोय आज’, समोरची व्यक्ती म्हणाली. ‘आमच्या मित्रांकडे शिकताय. सावध राहा जरा..’ धारदार आवाज म्हणाला. ‘हा हा.. चिंता नथी’ समोरची व्यक्ती उद्गारली. धारदार आवाज एकदम उसळलाच.. ‘हो, बरोबरच आहे म्हणा. तुम्हाला कधी, कसली चिंता असते. तुम्ही जाता फॉरेनला निघून. चिंता आमच्या लोकांनाच. निर्णय घेऊन टाकला एकदम. काय तर म्हणे नोटाबंदी. हेऽऽ.. लोक रांगेत उभे. अरे नोटाबंदी कसली करता.. खोटाबंदी करा..’ ‘नाय साब. तुमचा काही तरी मिसअंडरस्टँडिंग होताय. ते खोटाबंदीसाठीच आमी नोटाबंदी केलाय’, समोरच्या व्यक्तीने आवाजात साखर पेरत सांगितलं. ‘कसली खोटाबंदी. आमच्या आई-बहिणी उन्हातान्हात पैसे काढण्यासाठी रांगा लावतायत. आणि काय आमच्या लोकांना सांगता.. म्हणे वर जाऊन सांगेन की मी तर बुवा चांगलं काम केलंय.. तुम्ही काय उत्तर देणार? बिचारे आमचे लोक साधेसुधे. त्यांना सुचलंच नाही काही बोलायचं माझं नाव घेतल्यावर. मी असतो ना तिथं तर चांगली लगावली असती.. म्हणजे शब्दांतून’, धारदार आवाजानं सुनावलं. ‘नाय नाय साब. पचास दिसांत बघा कंट्री कशी साफ होते ते.. एकदम चोकस’, समोरच्या आवाजानं आश्वासन देण्याचा प्रयत्न केला. ‘अरे कसला चोकस. फोकस आहे का काही तुमच्या कामाला. ते काही नाही. ही भानगड केलीत ती केलीत. आमच्या लोकांना फितवू नका उगाच. नाही तर याद राखा’, धारदार आवाजाला आणखी धार आली. ‘जाऊंद्या ना..’ समोरच्या आवाजात अजिजी होती. ‘जर पुन्हा आमच्या लोकांना फितवण्याचा प्रयत्न केलात तर बारामतीलाच दूरध्वनी करेन मी. मग बरोबर करतील ते सगळं. शिकवणीच बंद करतील तुमची..’ धारदार आवाजानं इशारा दिला. काही क्षणांच्या अवकाशानंतर समोरून अत्यंत क्षीण स्वरात ‘हरे राम..’ एवढेच उद्गार धारदार आवाजाला ऐकू आले आणि त्यापाठोपाठ दूरध्वनी बंदच झाला..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 2:41 am

Web Title: rs 500 and rs 1000 notes ban in india
Next Stories
1 एक रास्ता.. आहा आहा!
2 कौतुकफुलांचा देठ खुडावया..
3 देवाची तिजोरी..
Just Now!
X