‘रमझानचे दिवस सुरू आहेत आणि धर्मनिरपेक्ष म्हणून शाबीत करू पाहणाऱ्यांच्या तमाम फौजा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कामाला लागल्या आहेत. अर्थात, संघटना किंवा व्यक्तींना अशा धार्मिक सणांचे यजमानपद पार पाडण्यात काहीच गैर नाही, पण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्याचे समर्थन करणे मात्र किळसवाणेच आहे. जे हिंदू राजकीय नेते धर्मनिरपेक्षतेचा हा प्रतीकवाद वापरतात, ते मतपेढीच्या राजकारणावरच डोळा ठेवून असतात’ असे ताशेरे बरोबर एक वर्षांपूर्वी, जुलै २०१५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायझर’ या मुखपत्रातील ‘द सेक्युलर टोकनिझम’ या मथळ्याखालील अग्रलेखातून मारले गेले. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीस हजेरी लावली नाही म्हणून ‘ऑर्गनायझर’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनही केले, आणि तो अंक जुना होऊन पुढचा अंक येण्याआधीच संघाचीच शाखा असलेल्या ‘मुस्लीम राष्ट्रीय मंच’ने संसद भवनाच्या विस्तार इमारतीतच इफ्तार पार्टीचे जंगी आयोजन केले. ‘आंतरधर्मीयांचा सुसंवाद’ असे गोंडस नावही या सोहळ्याला बहाल केले.  त्यापाठोपाठ याच पद्धतीने उत्तर प्रदेश व अन्य राज्यांमध्येही मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या इफ्तार पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले, तेव्हा हिंदुत्ववादी संघाच्या सुसंवादी भूमिकेबद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुस्लीमविरोधक म्हणून कपाळावर बसलेला शिक्का पुसण्याच्या प्रयोगाचा पुढचा अंक येत्या २ जुलैला पुन्हा पार पडणार आहे. जगभरातील जवळपास ४० मुस्लीम राष्ट्रांच्या दूतांना या पार्टीचे निमंत्रण धाडण्यात आले आहे. त्यांना भारतीयत्वाची ओळख करून देण्यासाठी इफ्तार पार्टी हे चांगले निमित्त असल्याचे संघाचा हा मंच मानतो. शांतता व सौहार्दाचा मार्ग अशा पार्टीतूनच सापडेल, असाही या प्रयोगाचा हेतू असल्याचे मंचाचे म्हणणे आहे. ‘मतपेढय़ा बांधणीसाठी मुस्लिमांना आपली स्वतंत्र ओळख टिकविण्याकरिता जवळपास सर्वच राजकीय पक्ष नेहमीच मदत करत असतात. पण त्यांना खरेखुरे हिंदुस्तानी बनविण्याचा हा योग्य मार्ग नाही. हिंदुस्तानी म्हणून मुस्लिमांना घडवायचे असेल, तर मुळात हिंदूंनी आपल्या मानसिकतेत बदल केला पाहिजे’, असा एक संदेश माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी १९७० मध्ये संघ कार्यकर्त्यांना दिला होता. इफ्तार पाटर्य़ा घडवून मानसिकतेतील प्रतीकात्मक बदलाचे संकेत देण्याची ही संघाची तयारी आता सुरू झाली असावी. धर्मनिरपेक्षतेची घटनात्मक संकल्पनाच विदेशी असल्याचा संघाचा दावा आहे. सर्व समूहांच्या धार्मिक आचरणाचा आदर हीच धर्मनिरपेक्षतेची संघाची स्वदेशी संकल्पना आहे. राष्ट्रपती भवनातील इफ्तार पार्टीला हजेरी न लावल्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले तेव्हाची संघाची मानसिकता कदाचित वेगळी असावी. राजकीय नेत्यांचा तो प्रतीकवाद आणि संघाचा तो सुसंवाद असेल, तर भाजप नेत्यांच्या इफ्तार पार्टीला ‘सुसंवादाचा प्रतीकवाद’ असे म्हटले तर?