कवी हा मुत्सद्दी असतो, असे प्रतिपादले तर तुम्ही पुसाल की कशावरून बॉ? तर भो वाचका, यावर आमचा अदमासा एकच सवाल आहे की, मग आजही कवींचे कवितासंग्रह कसे काय बॉ प्रकाशित होतात? त्यांचे प्रकाशन सोहळे कसे काय होतात? काही सोहळ्यांत तर श्रोतृवृंदाला श्रमपरिहारार्थ (किंवा पापक्षालनाच्या भावनेतूनही असेल) बटाटय़ाचे तळलेले काप व पेढा यांच्या डिशा दिलेल्या आम्ही पाहिल्या आहेत. आता या काव्यसंग्रहाच्या गठ्ठय़ांचे आपल्याच शयनगृहास ओझे होणार असल्याचे माहीत असतानाही ते येथेच छापून येथेच प्रकाशित केले जात असतील, तर त्या कवीस मुत्सद्दी म्हणावयाचे नाही तर काय संबोधायचे? तर असा हा मूळचाच मुत्सद्दी असलेला कवी, जर पेशानेही मुत्सद्दी असेल तर..? तर त्याच्या काव्यसंग्रहाचे काय होत असेल? तुम्हांस सांगतो, त्याच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन थेट सरसंघचालकांच्या पावन हस्ते होते. होय, आपल्यासारख्या मर्त्य मानवांची बोटे या दैवी घटनेने आपल्याच मुखात गेल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु परवाचे दिशी पुणे मुक्कामी तसे झाले वाचकहो. आपले सर्वाचे लाडके राजनैतिक अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन चक्क प.पू. सरसंघचालकजी मोहनजी भागवतजी यांच्या हस्ते झाले. केवळ काव्यसंग्रहच नव्हे, तर त्यांच्या एकंदर दहा पुस्तकांचे प्रकाशन यासमयी झाले. हा विक्रम तर आमचे परमकुलगुरू व थोरच कवी-साहित्यिक डॉ. नरेंद्र जाधव यांसही अद्याप जमलेला नाही. म्हणजे मोदीजी, सरसंघचालकजी हे सारे जमले. आकडा तेवढा जमविता आला नाही. परंतु अद्याप एक वर्ष आहे. गणित जुळवता येईल. असो. प्रतिपादनाचा मुद्दा हा, की ज्ञानेश्वरजी मुळे यांच्यासारख्या सनदी सेवकाची चक्क दहा पुस्तके याप्रसंगी प्रकाशित झाली. त्यांचे विषय पाहून आम्ही तर चक्क थक्कच झालो. त्यातील एका पुस्तकाच्या मथळ्याने तर आम्ही जास्तच थक्क झालो. ‘होतच नाही सकाळ’. पू. सरसंघचालकजींना अपेक्षित असलेल्या ‘होकारशाही’च्या एका प्रवासी प्रशासकाने चक्क राजकीय भाष्य करावे? होतच नाही सकाळ या शीर्षकातून, म्हणजे मग अच्छे दिवस उजाडायचा प्रश्नच नाही, असे सुचवावे? आमच्या मते अशीच एक गफलत झालीय ती विषयांमध्ये. या दहाही पुस्तकांत एकही पुस्तक हवामानशास्त्राचे नाही हे जरा विचित्रच वाटते. वस्तुत: आज या भारतात हवामानशास्त्र, खारे वारे, मतलई वारे, मोसमी पाऊस यांचा दांडगा अभ्यास कोणाचा असेल, तर प्रशासकीय बाबूंचा. त्यातही निवृत्त वा निवृत्तीच्या सोपानासमीप आलेले सनदी सेवक हे तर त्यातील तज्ज्ञच. इतके, की एक डॉप्लर रडार वा वातकुक्कुटाबरोबर एक सनदीबाबू असे समीकरणच आहे. हल्ली वारे कोठे वाहते याचे त्यांचे आडाखे चुकत नसतात. ते कोठे उभे आहेत यावरून त्या मतलई वाऱ्यांचे गणित सहज मांडता येते. असे असताना मुळेजींनी ‘माती, पंख आणि आकाश’ याबरोबरच ‘हवा, वारे आणि निवृत्ती’ असे एखादे पुस्तक का बरे लिहिले नाही, असाच प्रश्न आमच्या मनात वाहत आहे. तर तेही असो. या निमित्ताने आम्हास एकच सुचवावेसे वाटते की, आपल्याकडे ज्याप्रमाणे मोसमी पावसाचा अंदाज लावणारे गोवारीकर मॉडेल आहे, त्याप्रमाणे वाऱ्यांची दिशा सांगणारे एखादे सनदी मॉडेल का बरे असू नये? यासंदर्भात विचार करण्याकरिता एखादी समितीच नेमली पाहिजे. ती मुत्सद्दीबाबूंची समिती नेमायची की अर्थबाबूंची याबाबत सांघिक निर्णय घ्यावा एवढेच आमचे म्हणणे आहे.