आपल्याकडील प्रसारमाध्यमांना आणि समाजमाध्यमांना ताळतंत्रच कसा तो नाही. उचलली लेखणी लावली कागदाला.. उचलली बोटे टंकली संगणकावर अक्षरे.. उचलली बोटे केले भाष्य समाजमाध्यमांवर काही असा यांचा खाक्या. आपण सामान्यही त्यांच्याच पंक्तीतले. ताळतंत्र सोडलेले. विषय अगदी परवाचा. नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या भारतीय जनता पक्षाचे एक थोर, ज्ञानी, प्रज्ञावंत खासदार साक्षी महाराज देशापुढील काही ज्वलंत प्रश्नावर बोलते झाले, तर त्यावर कोण गहजब उठला सगळीकडे. काय म्हणाले साक्षी महाराज? तर बुवा, ‘चार बायका आणि ४० मुले असलेलेच आपल्या देशाच्या लोकसंख्यावाढीस जबाबदार आहेत.’ त्यांचा रोख होता तो मुसलमान समाजाकडे. आता वादाचे रामायण घडावे, इतके काय मोठे आहे परमपूज्य साक्षी महाराजांच्या या विधानात? पपू साक्षी महाराज हे कायम जे सत्य तेच बोलतात. ‘सत्य हाची धर्म, सत्य हेची कर्म, सत्यबोल अमृत आम्हांसाठी..’ अशी त्यांची सत्यावरील अविचल निष्ठा. ‘प्रत्येक हिंदू दाम्पत्याने चार अपत्ये जन्मास घालावीत’, असा सल्ला पपू साक्षी महाराज यांनी मध्यंतरी दिला होता. किती ही देशाची काळजी.. किती ही हिंदूराष्ट्राविषयीची आस्था.. ती पाहून खरे तर एखाद्याच्या डोळ्यांत टचकन पाणीच यावे गहिवरून. पण साक्षी महाराजांबाबत उलटाच न्याय. ते सतत टीकेचेच धनी. ‘बाबा नहीं बवाल हूं.. बीजेपी का काल हूं..’ ही घोषणा त्यांनी काही वर्षांपूर्वी भाजपपासून फारकत घेतल्यानंतर दिली होती, अशी आठवण सांगतात. भाजपमधील काही मंडळी त्यांच्या या घोषणेवर आजही कुजबुज करताना दिसतात. कुणी अध्यक्ष अमित शहांच्या कानीही लागण्याचा प्रयत्न करतात. आता यात शहासाहेबांच्या कानी लागण्यासारखे काय आहे? त्यांच्यासारख्या कोमलहृदयी माणसास पपू महाराजांवरील आरोपांमुळे किती वेदना होत असतील याची कल्पनाच केलेली बरी. तर, महाराजांच्या त्या घोषणेत काय एवढे आक्षेप घेण्यासारखे? महाराज पडले थोर आध्यात्मिक गुरू. आध्यात्मिक गुरू जे बोलतात त्याचा आपण सरळसोट अर्थ लावतो हा आपल्यासारख्या पामरांचा बुद्धिदोष. ‘बीजेपी का काल हूं..’ याचा अर्थही तसाच लावला गेला. म्हणजे जणू काही पपू साक्षी महाराज भाजपच्या जिवावर उठले आहेत असा. तर तसे नाही. भारतीय जनता पक्षाचा पुढील काळ आपला व आपल्यासारख्या थोर आध्यात्मिक व्यक्तींचा असेल, असेच पपू महाराजांना तेव्हा म्हणायचे होते, पण ते कळण्याइतकी बुद्धी नाही ना आपली. अशा थोर विभूती जे सांगतात त्याचा अर्थ काही काळानंतर उलगडला जातो आणि मग आपल्याला साक्षात्कार होतो. पपू साक्षी महाराजांच्या विधानांबाबतही तसेच झाले आणि यापुढेही तसेच होणार. लोकसंख्येच्या निमित्ताने ते परवा जे काही बोलले त्यामागील गूढार्थ काही काळाने उलगडेल आपल्यासाठी. तोवर आपण टीकाच करीत राहू त्यांच्यावर. काय करणार.. प्राक्तन आपले आणि पपू साक्षी महाराजांचेही.