तब्बल २७ साल बेहाल झालेल्या उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या वाहणाऱ्या काँग्रेसच्या गंगा आणि समाजवादी पार्टीच्या यमुनेला अखेर संगमाची संधी मिळाली. आता एकत्र वाहू लागल्यावर गंगा कोणती आणि यमुना कोणती हे वाहत्या प्रवाहावरून ओळखता येणार नाही, त्यामुळे कोणत्या जुन्या प्रवाहातून काय काय वाहून गेले, ते केवळ भूतकाळच जाणे!.. काँग्रेसचे सर्वेसर्वा लोकमान्य नेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे निवडणूक आयोगमान्य नेते अखिलेश यादव यांनी या दोन नद्यांचा उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या प्रवाहात संगम घडवून आणल्याने, सपा आणि काँग्रेसलाही पवित्र झाल्याच्या भावनेने दिलासा मिळाला आहे. यंत्रसामग्रीचे भारतीय जुगाड हा जगाच्या औत्सुक्याचा विषय असतो. वडाची साल िपपळाला लावायची कला या जुगाडविद्येतूनच भारताला साधली. राहुल आणि अखिलेशच्या या गंगा-यमुनांचा संगम होताच, अखिलेशने वडिलांकडून हट्टाने मिळविलेल्या सायकलला काँग्रेसचे चाक लाभले. आता राहुल आणि अखिलेशची डबलसीट सायकल सवारी उत्तर प्रदेशात गावोगाव जाणार आहे. ही सायकल साधीसुधी नाही. तिच्या हँडलवर काँग्रेसी हाताची पकड आहे. ‘२७ साल यूपी बेहाल’ असा नारा देत काँग्रेसने समाजवादी पार्टीच्या कारभारावर मारलेले ताशेरे राहुलरूपी यमुनेत विसर्जित करून व अखिलेशरूपी गंगेच्या पाण्याने सायकल स्वच्छ धुऊन हे दोघे, भाजप आणि संघाच्या ‘क्रोध और गुस्से की राजनीती’ला शह देण्या  सायकलवर सवार झाले आहेत. समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर ताटकळत उभी असलेली ही जुगाडी सायकल आता प्रचारासाठी तयार असली तरी तिच्या चाकातील हवा काढण्यासाठी काही जण टपलेलेच आहेत. काँग्रेसचे चाक लावून सायकल पुढे रेटण्याचे अखिलेशचे जुगाड मुलायमसिंहांना मान्य नसल्याने, घरातूनच कुणी सायकल ‘पंक्चर’ करणार नाही ना याकडे लक्ष ठेवण्यासाठी ‘गंगा-यमुने’चा एक एक प्रवाह आता सायकलभोवती फिरतो आहे. मुलायमसिंहांनी हवा काढलीच, अमरसिंहांनी मध्येच हूल दिली, तरी बसपाची हवा भरून, रामगोपालांचे ब्रेक लावून, प्रियंकाच्या हातात सायकलचे हँडल देऊन काँग्रेस-सपाची सायकल पुढे रेटता येईल, एखाद्या अवघड चढावावर शिवपाल धक्का मारतील, असे राहुल गांधींना वाटते आहे. आता या सायकलवरून सपा-काँग्रेसचे करण-अर्जुन ‘डबलसीट’ निघालेत. ही सायकल कोण चालवणार ते काँग्रेसने ठरवून टाकले आहे. सायकलचे हँडल सध्या राहुलच्या हातात असल्याने ती राहुलच चालवणार आणि अखिलेशला डबलसीट घेऊन सत्तेच्या खुर्चीपर्यंत नेऊन सोडणार, असे स्वप्न उत्तर प्रदेशातील काँग्रेसींच्या डोळ्यात तरळते आहे. कारण, अखिलेश काँग्रेससाठी कमालीचे मुलायम झाले आहेत. म्हणूनच, सायकलसोबत हात असेल, हातात सायकल असेल, तर ती किती वेगाने धावेल याची कल्पना तुम्हीच करा, असे अखिलेश म्हणतात, तेव्हा त्यांच्या नजरेसमोर उत्तर प्रदेशाच्या विकासाची स्वप्ने तरळत असतात आणि राहुल गांधींची नजर, एखाद्या पोस्टर चित्रातील सत्तेच्या खुर्चीकडे, ‘विजय की ओर’ लागलेली असते.