News Flash

घ्या हे आमरसदान..

सरकारला आमची विनंती आहे की हे सर्व लक्षात घेऊन, आपण ज्याप्रमाणे भिडेगुरुजींना जपतो आहोत, त्याचप्रमाणे त्यांच्या शेतातील त्या आम्रवृक्षासही जपावे. खरे विज्ञान तेथेच आहे.

संभाजी भिडे (संग्रहित छायाचित्र)

कुठे गेले ते लॅन्सेटवाले? कुठे दडले ते वैद्यकीय संशोधनपत्रिकावाले? कुठे आहेत ते वैज्ञानिक, ते आधुनिक वैद्यकशास्त्राचे पुरस्कत्रे? या समोर या आणि उघडय़ा चर्मचक्षूंनी पाहा.. पाहा – या भारतवर्षांत आजही किती दैवी गुणसंपदा भरून राहिलेली आहे. येथील प्राचीन ज्ञानविज्ञानाची खिल्ली उडविणाऱ्या नतद्रष्टांनो पाहा, या भूमीतील कणाकणामध्ये आजही किती ओजस्वी विज्ञानतत्त्वे भरून राहिलेली आहेत. येथील बुद्धिवादी शंकासुर सतत म्हणतात, ‘पुराव्यांनी सिद्ध करा’. बार्हस्पत्यच की नाही ते? प्रत्यक्षप्रमाण हवे म्हणतात! परंतु अरे तामसी लोकायितांनो, चार्वाकांनो, हा घ्या येथील दैवी चमत्कारांचा पुरावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व आज या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये, पहाडापठारांमध्ये, गावखेडय़ांमध्ये केवळ ज्यांच्यामुळे शिल्लक आहे, आपल्या शिवरायांना ज्यांनी आपल्या विचारांनी नवी करकरीत ओळख दिली आहे, ते निश्चयाचे महामेरू, धारकऱ्यांस आणि येथील अनेक राजकारण्यांस आधारू असे आमचे महाप्रतापी महागुरुजी संभाजीराव भिडे यांच्या शेतात जा आणि पाहा चमत्कारांचा पुरावा. पाहा पाहा तो स्वर्गीय आम्रवृक्ष. पाहा त्याच्या शाखाशाखांवर लगडलेली ती सुवर्णगोलासारखी आम्रफले. साधीसुधी नाहीत ती. प्राचीन भारतात तुमच्या त्या टेस्ट टय़ूब, आयव्हीएफ आदी आधुनिक गर्भधारणा तंत्रांवर मात करणारे तंत्र होते याचा रसाळ पुरावा आहेत ती आम्रफले. आजवर त्याविषयी आमच्या महागुरुजींनी मौन बाळगले होते. केवळ त्यांच्या मातोश्रींनाच ठावके होते ते गुपित. परंतु येथील अंधश्रद्ध, असनातनी अडाण्यांना दृष्टी यावी आणि िहदू धर्माचे भले व्हावे या सद्हेतूनेच त्यांनी त्याचा गौप्यस्फोट केला आहे. या आंब्याची फळे सेवन केल्याने आजवर १५० दाम्पत्यांना पुत्रप्राप्ती झाली असल्याचे त्यांनी जनहितार्थ जाहीर केले आहे. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र नासिक्य तथा जनस्थानातील सभेत त्यांनी ही माहिती दिली हा किती पावन योगायोग! हे वृत्त कानी पडताच आमच्या मनी विचार चमकला की, आपले हे महागुरुजी म्हणजे यज्ञपुरुष तर नव्हेत? रामायणकाळी अशाच एका यज्ञातून प्रकटलेल्या दैवी पुरुषाने महाराज दशरथांच्या हाती क्षीरपात्र ठेवून माडगूळकर अण्णांच्या शब्दांत म्हटले होते – दशरथा, घे हें पायसदान.. तुझ्या यिज्ञ मी प्रकट जाहलों हा माझा सन्मान! महागुरुजी हे म्हणाले नसतील, परंतु त्यांच्या मुखातून आम्हांसही हीच वाणी ऐकू येत आहे – की महाराष्ट्रातील हे नपुंसका, हे निपुत्रिका, घे हें आमरसदान! स्वत महागुरुजीच सांगतात की, नपुंसकत्वावर, वंधत्वावर मात करणारा हा आंबा आहे. आमचे आयुष मंत्रालयालाच नव्हे, तर नासापासून युनो, ईयू, सार्क आदीपर्यंतच्या सर्वाना आवाहन आहे, की या यज्ञपुरुषावर आणि त्या आम्रवृक्षावर त्यांनी संशोधन करावे आणि तातडीने कृत्रिम गर्भधारणेचे सर्व उपाय कायद्याने बंद करावेत. ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगा देणारा हा उपाय असताना अन्य संशोधनाची आवश्यकताच काय? आमचे असेही आवाहन आहे, की महाउद्योगी रामदेवबाबांसारख्यांनी तातडीने सांगलीत पुत्रजीवी आम्रफल प्रक्रिया केंद्र उभारून तो स्वदेशी आयुर्वेदिक आमरस इस्पितळाइस्पितळांतून उपलब्ध करून द्यावा. आमचे परमपूज्य साधुसंत िहदूंनी दहादहा मुले प्रसवावीत म्हणून प्रचार करीत आहेत. त्या संतमाहात्म्यांनी या आमरसाच्या वितरणाचे हक्क आपापल्या मठपतींकडे द्यावेत. असे झाल्यास या देशात नक्कीच दैवी गुणांनी संपन्न अशा बालकांचे उत्पादन वाढेल, अनेकांच्या परवडणाऱ्या घरांत वंशाचे सीएफएल लॅम्प प्रकाशतील. सरकारला आमची विनंती आहे की हे सर्व लक्षात घेऊन, आपण ज्याप्रमाणे भिडेगुरुजींना जपतो आहोत, त्याचप्रमाणे त्यांच्या शेतातील त्या आम्रवृक्षासही जपावे. खरे विज्ञान तेथेच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 1:49 am

Web Title: sambhaji bhide statement mango
Next Stories
1 विकासगंगा आणि ‘मार्क्‍स’वाद!
2 प्रतिमा आणि प्रक्रिया
3 बाबाजींची वेदना
Just Now!
X