जे जिथे नाही, ते तिथे आणणारे नेते फार कमी असतात. तिथले आता इथलेच झाले असले, तरी तिथली संस्कृती इथे टिकवण्यासाठी झटणारे नेते त्याहून कमी असतात; पण इथल्याबद्दल तिथे, तिथल्याबद्दल इथे बोलणारे नेते मात्र बरेच असतात आणि इथून तिथे जाण्याचं राजकारण करणारे नेते त्याहूनही अधिक असतात.

वरील विधानं सहज समजणार नाहीत, हे मान्य. कुणाला हे कोडं वाटेल, हेही मान्य; पण या कोडय़ाचं उत्तर दिलं, की सारं समजेल! उत्तर आहे- संजय निरुपम! संजय निरुपम हे कोणत्या प्रकारचे नेते आहेत, ते उत्तर भारतीयांना  लाभलेलं एक दुर्मीळ नेतृत्व आहे की साधारणत: नेतेमंडळी जशी असतात तसेच निरुपमही  आहेत, याची संभाव्य उत्तरं वरील विधानांमध्ये दडलेली आहेत. बिहारमधल्या कोसी, गंडक, गोमती आदी नदय़ांच्या काठावर होणारी छठपूजा निरुपम यांनी अरबी समुद्रालगत आणली. इथून तिथे जाणं हा राजकारण्यांचा साधारण गुण  पाळून बऱ्याच वर्षांपूर्वी ते शिवसेनेतून काँग्रेसवासी झाले. कृपाशंकर सिंहांसारखा एक नेता मुंबईत असावा लागतोच, ती उणीव निरुपम यांनी कधीही भासू दिली नाही. शिवाय, मुंबईत गुजरातबद्दल बोलून झाल्यावर निरुपम नागपूरला गेले आणि नागपुरात मुंबईबद्दल बोलले.

निरुपम यांचं वर्गीकरण कसं करायचं, हा प्रश्न रामानंदजींकडे आम्ही उपस्थित केला.

रामानंदजींच्या मते निरुपम कोणत्या प्रकारचे नेते आहेत, ते काय बोलत आहेत, ते कुठे बोलले, यापेक्षाही ते बोलले ते ‘सही’ होतं की नाही, एवढंच महत्त्वाचं आहे.

हाच न्याय खुद्द रामानंदजींना लागू केल्यास, रामानंदजी हे कोणत्या प्रकारची व्यक्ती आहेत,ते कुठे बसून बोलत आहेत, कुणाशी बोलत आहेत, यापेक्षाही त्यांनी जे सांगितलं ते खरं की नाही, एवढंच महत्त्वाचं ठरेल.

तेव्हा रामानंदजींच्या मते, ‘‘उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात. उत्तर भारतीयांनी व्यवहार बंद केले तर मुंबई बंद पडेल’’ हे निरुपम यांचे उद्गार ‘सही’ आहेत. हे उद्गार नागपुरात जाऊन निरुपम यांनी काढले होते, हे रामानंदजींना माहीत आहे. ‘निरुपम का विवादित बयान’ ही व्हिडीओ क्लिपच रामानंदजींच्या एका चाहत्यानं स्वत:च्या स्मार्टफोनवरून त्यांना दाखवलेली आहे. ती संपूर्ण पाहता क्षणी त्यांची जी मतं झाली होती, ती त्यांनी इतरांप्रमाणेच आम्हालाही ऐकवली आहेत. सहसा रामानंदजी आधी आपलं मत ऐकवतात, त्यानंतर मतप्रवाह सुरू करतात. ओठांवर ताम्बूलरस घोळवत, आपल्या मतप्रवाहाचे तुषार बिनचूक सांभाळत रामानंदजींचा मतप्रवाह सुरू होतो. समोरच्या श्रोत्याला त्या प्रवाहात डुंबून ठेवत रामानंदजी हातातलं काम पूर्ण करतात. त्यांनी निष्कर्ष काढला, की मग आपण आपलं काम त्यांना सांगायचं!

रामानंदजींचा निष्कर्ष होता : ऊपीके लोग जहाँ जाएं ऊधर कामही काम करते है। जहाँ घर की मुर्गी दाल बराबर नही होती, ऊहाँ जाकर के काम करते रहते है। अपने देसमे उतना काम  करें तो उनको इहाँ आने की जरूरत ना पडें।

आत्मचिंतन करत होते रामानंदजी. कठोर आत्मपरीक्षण! गुजरात सोडावं लागलेले आठ हजार यूपी-बिहारचे कामगार आता गावीसुद्धा काम करतील, असं सांगावं का आपण रामानंदजींना? पण निष्कर्ष तर निघाला होता. आता पुन्हा ‘मुंबई चालवण्या’साठी रामानंदजी सज्ज झालेले होते. आम्ही म्हणालो,

‘दोन मसाला पान लगाना रामानंदजी.’