न्यायनिवाडाकार स्थानापन्न होताच दालनातली कुजबूज थांबून शांतता पसरली. त्यांनी तपासाधिकाऱ्याकडे कटाक्ष टाकताच तो उभा झाला. ‘‘आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या या युगुलाने सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना मिठी मारत या साथरोगकाळात शासनाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन के ले आहे. हे मिठीप्रकरण चाळ्याकडे वळण्याच्या आत मी या दोघांना अटक के ली. सध्या देशातले वातावरण बघता या दोघांचे कृ त्य सामाजिक व आरोग्य सुरक्षितता धोक्यात आणणारे आहेच, शिवाय संस्कृतीला धक्का देणारे आहे. हे दोघेही सज्ञान असून सार्वजनिक स्थळी अंतर ठेवून वागण्याचा नियम यांना ठाऊक होता. तरीही त्यांनी जाणीवपूर्वक मिठी मारल्याने या दोघांना कलम १८८ अन्वये कठोर शिक्षा देण्यात यावी’ हे वाक्य संपताच नोंदी घेत असलेल्या निवाडाकारांनी त्या दोघांकडे नजर वळवली. युगुलातील ‘तो ’ बोलू लागला- ‘मिलॉर्ड, २०१४ पासूनच आपल्याकडे एकमेकांना मिठीत घेऊन स्वागत करण्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. (हशा पिकताच चोपदार दटावतो) प्रेम व आदरभाव व्यक्त करण्याच्या या राजमान्य पद्धतीत करोनाने खोडा घातला. त्यामुळे मी अस्वस्थ होतो. तरीही सरकारी नियम पाळत होतो. याच काळाने सारे जग एक असल्याचा साक्षात्कार घडला. काही देशांनी मुखपट्टी मुक्तीची घोषणा के ल्यावर माझे मन हरखून गेले. त्यातच बातमी आली ती ब्रिटनने मिठी मारण्यास मोकळीक दिल्याची. त्यापाठोपाठ तशी दृश्येही झळकली व मला राहावले नाही. दीड वर्षांपूर्वीपर्यंत ज्या मिठीची दृश्ये मी बातम्यांत बघत होतो, त्याला सुरुवात झाल्याचे बघून मी आनंदाने प्रेयसीला घराबाहेर बोलावले व मिठी मारली. त्याआधी आम्ही शरीराचे तापमान व प्राणवायूची पातळी तपासली होती. मिठीनंतर त्यात किं चित वाढ झाली. तिला कवेत घेताना रसभंग होऊ नये म्हणून मुखपट्टी वापरली नाही, तेवढी चूक झाली’. ‘हा भारत आहे, ब्रिटन नाही हे ठाऊक नाही तुम्हाला?’ डोळे मोठे करत न्यायनिवाडाकार वदले. त्यावर तो म्हणाला, मी  २०१४ मध्ये ‘सज्ञान’ झालो, तेव्हापासून सारे विश्वचि माझे कु टुंब या संकल्पनेवर भर दिला जात असल्याने तेवढे माझ्या लक्षात राहिले नाही. हिला मिठीत घेतांना भटांची ‘गार गार या हवेत घेऊनी मला कवेत’ ही  ओळ  मात्र आठवली’. त्यावर त्याला मध्येच थांबवत निवाडाकार गरजले ‘कविता ऐकवून आमचा वेळ फु कट घालवू नका. पाहिजे तर संस्कृ त सुभाषित म्हणा. ती निवाडापत्रात कामी येतात(हशा) ‘मिलॉर्ड, माफ करा. मला संस्कृ त येत नाही. या करोनाकाळाने मन एवढे कावले आहे की जगात कु ठे नवे औषध बाजारात आले की आपल्याकडे ते कधी येईल याची उत्सुकता असते. तसेच या मिठीच्या बाबतीत झाले. कधी ना कधी हे स्वातंत्र्य आपल्याही उपभोगाला मिळेल या आशवादी दृष्टिकोनातून मी हे कृ त्य के ले. यातून निर्माण झालेल्या सकारात्मक जाणिवेच्या बळावर आपण लवकरच मिठीस्वातंत्र्य उपभोगू असे मला वाटते’. मग निवाडाकार तिच्याकडे वळले ‘मिलॉर्ड, गेल्या दीड वर्षांपासून आम्ही एकमेकांवर प्रेम करतो, पण प्रेमापेक्षा करोनावर जास्त बोलतो. रोज संवाद सुरू झाला की सर्दी, ताप, खोकला हेच विषय. भेटण्याची इच्छा मारून किती काळ तग धरायचे. शेवटी ब्रिटन मदतीला धावला. तसेही त्यांच्याशी आपले नाते जुनेच, साथ रोगाचा कायदा तर त्यांचाच. त्यामुळे आम्ही चुकलो असे वाटत नाही’. दोघांचेही ऐकू न घेतल्यावर निवाडाकार म्हणाले, ‘उमलते वय आहे. आरटीपीसीआर करून सोडून द्या’. हा निर्णय ऐकू न दोघे बाहेर आले तेव्हा वृत्तवाहिन्यावाले त्यांची वाटच बघत होते. त्यांना दिवसभराचा मसाला मिळाला होता!