स्थळ- परळीचे रणांगण. वेळ- दुपारची. राजीनामाधारक सैन्याच्या गर्दीत दोन्ही ताई बसलेल्या. तेवढय़ात गदाधारी भीमाच्या थाटात एकजण बोलायला सुरुवात करतो. ‘संख्येने आपण कमी असलो तरी घाबरायचे काही कारण नाही. एकेकाला पुरून करेल एवढी ताकद या पांडवसेनेत आहे. या ताकदीच्या मागे साहेबांचे आशीर्वाद आहेत. तेव्हा ताई तुम्ही आता धर्मयुद्ध थांबवण्याची भाषा अजिबात करू नका. आधुनिक युद्धे ही पदासाठीच लढली जातात. पदामुळेच धर्माची प्रतिष्ठा वाढत असते हे गेल्या सहा वर्षांपासून आपण अनुभवतोच. त्यामुळे आता फक्त आदेश द्या, सुरुवात केव्हा करायची तेवढे सांगा.’ या जोशपूर्ण भाषणावर टाळ्या वाजताच युद्धाची पुस्तके चाळण्यात मग्न असलेल्या मोठय़ा ताई मान वर करत साऱ्यांवर नजर फिरवतात. त्यासरशी एकजण म्हणतो, ‘नुसते बोलून होणार नाही. आधी रणनीती ठरवा.’ लगेच छोटय़ा ताई त्याला दुजोरा देतात. मग सुरू होते मंथन. यात आपल्याला कोणकोण मदत करू शकतील यावर विचार सुरू होतो. राज्यशकट हाकणारे तिघेही सारी रसद पुरवायला तयार आहेत. तसेही धर्माच्या पातळीवर जवळच्या असलेल्या सेनेची मदत घेणे केव्हाही योग्य. त्यांच्याकडून दारूगोळा व शस्त्रे मोठय़ा प्रमाणात मिळाली तर कमी मनुष्यबळावरही आपण हे युद्ध जिंकू शकतो. शेवटी वाघच वाघिणीच्या मदतीला धावून येणार ना! तशीही समाजाची सहानुभूती नेहमी पांडवांच्या बाजूनेच राहिली आहे. एकदा का युद्ध झाले की त्यांच्यावर आपसूकच दबाव वाढेल व तेच तहाच्या गोष्टी करू लागतील. हे ऐकताच दोन्ही ताईंचे डोळे चमकतात. वडिलांनी अनेकदा केलेले बंडरूपी युद्ध व त्यानंतर झालेला तह त्यांना आठवू लागतो. आता त्याच धर्तीवर युद्ध घडवून आणायचे. त्यासाठी हीच योग्य वेळ असे ठरवत त्या ‘लागा तयारीला’ म्हणताच एक कार्यकर्ता धावत येऊन सांगू लागतो, ‘ताई घराच्या छताला तडे जायला लागले. ते कोसळण्याआधी येथून बाहेर पडणे केव्हाही उत्तम’ हे ऐकताच पांडवसेनेची पांगापांग होते.

स्थळ- रेशीमबागचे रणांगण. वेळ- रात्रीची. मोठय़ा संख्येत जमलेल्या कौरवसेनेच्या गराडय़ात भाऊ, दादा बसलेले. त्या दोघांची हळू आवाजात चाललेली कुजबूज बघून कंटाळलेला एक सेवक त्वेषात बोलू लागतो, ‘धर्मयुद्ध तर आम्ही लढत आलोय. आता त्यालाही शंभर वर्षे होतील. या युद्धात स्वत:साठी काही मागायचे नसते. समाजाच्या कल्याणासाठी लढायचे असते ही पांडवांची भूमिका आपण खऱ्या अर्थाने निभावली. तरीही ते आपल्याला कौरव ठरवतात. भाऊ, आता बस झाले. होऊन जाऊ द्या एकदाचे. आधी वडिलांनी छळले, आता मुली छळू लागल्या. हा वारसायुक्त  छळ किती दिवस सहन करायचा आपण. धर्माचे पेटंट आपल्याकडे. तेही हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न हाणून पाडायलाच हवा. तेव्हा दादा, भाऊ, तुम्ही फक्त हो म्हणा. आम्ही चाल करून जायला तयार आहोत.’ हे ऐकताच भाऊ हसत दादांकडे बघतात. ‘आधुनिक युद्धे ही रणांगणावर लढायची नसतात व घोषणा करून तर नाहीच नाही हेही त्या दोघींना ठाऊक नाही. त्यामुळे याकडे फुटकळ बंड म्हणूनच बघायला हवे.’ हा युक्तिवाद ऐकताच भाऊ हसतात. ‘जाहीर युद्ध नकोच. गनिमी काव्याने व चाणक्यनीतीचा वापर करून त्या मोजक्यांना संपवता येते का ते बघा व आपल्यातले कुणी फितूर तर नाही ना, याचीही खातरजमा एकदा करून घ्या’-  एका ज्येष्ठ सेवकाचा हा सल्ला ऐकताच भाऊ व दादा एकत्रितपणे  पसंतीदर्शक अंगठा दाखवतात. त्यांना कुणी कितीही रसद पुरवली तरी दिल्लीचा तख्त सोबत आहे तोवर काळजी नाही, असे म्हणत ते दोघे परत जायला निघतात तेवढय़ात परळीचे छत कोसळले व काही राम राहिला नाही असे अद्याप वाटत नसल्याचे त्या दोघी म्हणाल्याची वार्ता एकजण सांगतो. ती ऐकताच कौरवसेनेची बैठक तहकूब होते.