पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे, असा वाक्प्रचार बऱ्याचदा वापरला जातो. असे म्हटले, की मधल्या काळातील घडामोडींचे सोयीचे विश्लेषण करणे सोपे होते. जम्मू-काश्मीरमधील स्थिती सध्या अशीच आहे. बरोबर आठवडय़ापूर्वी, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्याची विधानसभाच विसर्जित करून टाकली. लगेचच, मलिक यांच्या या कृतीचे बोलविते धनी कोण याचा शोध सुरू झाला. केंद्रातील भाजप सरकारचे विरोधक एकवटल्यास जम्मू-काश्मिरात भाजपविरोधी आघाडीचे सरकार येईल व तसे होऊ  नये म्हणून केंद्राच्याच गुप्त इशाऱ्यानुसार मलिक यांनी ही कारवाई केली, हा विश्लेषणाचा सूर अधिक जोरदार असणे त्या दिवशी साहजिकही होते. साहजिकच, यामागे भाजपची कूटनीती असल्याचा वास देशभर पसरणार हे दिसताच मलिक यांनी जी कोलांटउडी घेतली, त्याला राजकीय इतिहासात तोड नाही. असे म्हणतात, की बऱ्याचदा, उपरेच अधिक स्वामिनिष्ठ असतात. या कारवाईचा ठपका भाजपवर येऊ  नये यासाठी स्वत:ची ढाल करून, त्यांनी केलेली स्वामिनिष्ठादर्शनाची कसरत इतिहासात नोंदली जाईल. जर आपण केंद्राचे मत मान्य करून विधानसभा विसर्जित केली नसती, तर सज्जाद लोन मुख्यमंत्री झाला असता व आपण बेइमान ठरलो असतो, असे सांगून मलिक यांनी आपल्या कृतीचा सरकारवर येऊ  पाहणारा सारा दोष अलगद स्वत:वर घेतला. स्वामिनिष्ठा म्हणतात, ते याहून वेगळे काय असते? मलिक यांच्या या कारवाईमुळे भाजपभोवती पिंगा घालणारे संशयाचे व दोषारोपाचे ढग अलगद बाजूला झाले आणि मलिक यांनी स्वत:स या ढगांच्या सावटात लपेटून घेतले. बरखास्तीच्या कारवाईनंतर एक आठवडय़ाच्या आतच, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे म्हणजे काय याचा उलगडा आता होऊ  लागला आहे. या कारवाईचा कोणताही ठपका भाजप सरकारवर येऊ  नये यासाठी सर्वोच्च स्वामिनिष्ठेचा आगळा आदर्शही मलिक यांनी घालून दिला आहे. विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून नव्हे, तर केंद्राच्या संभाव्य सूचनांच्या भविष्यातील परिणामांचा विचार करून आपण घेतला, असा कांगावा करून भाजपला त्यापासून अलिप्त करण्याचा हेतू पूर्णत: सफल तर झाल्याने, बरखास्तीच्या कारवाईमुळे पुलाखाली दाटलेले गढूळ पाणी निवळण्यास सुरुवात झाली. आता हे पाणी इतके निवळून गेले, की आठवडय़ापूर्वी याच पुलाखाली गढूळ पाण्याचा प्रवाह होता, हे आज खोटेदेखील वाटू शकते. पण एकदा ढग दाटले, की केव्हाही पावसाचा मारा सुरू होऊन केव्हाही पुराचे गढूळ पाणी पुलाखाली येऊ  शकते, हे राजकारणात मुरलेल्या मलिक यांना माहीत असावे. पुलाखालच्या पाण्यातील गढूळपणा कधीच वर येऊ  नये यासाठी आता ते नवीन उपाय करणार असावेत. या कारवाईबद्दल आपली बदली होऊ  शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. खुंटा हलवून बळकट करणे असाही एक वाक्प्रचार रूढ आहे. पुलाखालून वाहून गेलेल्या पाण्याच्या गढूळपणाने पक्षाच्या पावित्र्यास धक्का लागू नये यासाठी स्वामिनिष्ठ मलिक यांनी खुंटा हलवून बळकट केला असावा, अशीच शक्यता जास्त आहे. त्यासाठी कितीही विनोदी कसरती कराव्या लागल्या, तरी बेहत्तर!

Keep the onion in in hot water before chopping it
Video : कोमट पाण्यात कांदा ठेवा अन् पाहा कमाल! भन्नाट किचन टिप्स वापरून बघा
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण