पूर्वी, शनिवार-रविवारची दीड दिवसाची सुट्टी झाली, की सोमवारी शाळेला जायचा ज्यांना कंटाळा यायचा, अशा सर्वाना आज आपण शाळकरी व्हावेसे वाटू लागले असेल. त्या काळातली शाळा म्हणजे गुरुजींची छडी, शाळा म्हणजे हाताची घडी.. शाळा म्हणजे अभ्यासाचे बोजे, शाळा म्हणजे दप्तराचे ओझे.. शाळा म्हणजे मास्तरांची भीती, शाळा म्हणजे दडपण किती.. अशा अवस्थेतून जात ज्यांनी शिक्षण घेतले असेल, त्यांना आपल्या मुलाबाळांच्या, नातवंडांच्या शाळकरी जीवनाचा कमालीचा हेवा वाटू लागला असेल. सकाळी शाळेत प्रार्थनेची वेळ गाठली नाही, तर वर्गात पोहोचताच तळहातावर उठणारा उभ्या पट्टीचा लालेलाल वळ चोळत खाली मानेने मुसमुसत घालवलेल्या दिवसाच्या आठवणी पुसून टाकून पुन्हा लहान व्हावे, असेही अनेकांना वाटू लागले असेल. कारण शिक्षणपद्धतीत आमूलाग्र की काय म्हणावे अशी काही तरी क्रांती होऊ घातली आहे. कोणत्याही क्रांतीची सुरुवात स्वत:पासूनच करावी, असे काही मोठय़ा माणसांनी मागे कधी तरी सांगून ठेवले आहे. त्यामुळे, शालेय शिक्षणाच्या क्रांतीची सुरुवात सेल्फीपासून करण्याचे शिक्षण खात्याने योजिले, हे एक उत्तमच झाले. तुम्ही म्हणाल, हा काही तरी नवीन विनोद दिसतोय. पण यात विनोद वाटावा असे काही नाही. तर ते एक वास्तव आहे. आपणा सर्वाना माहीतच आहे, की सेल्फी हा स्वयंप्रतिमानिर्मितीचा सांप्रतकाळीचा एक स्वयंसिद्ध स्रोत आहे. प्रतिमानिर्मितीची सेल्फी कुठेही काढावी, कुणीही काढावी, कशीही काढावी. कुणाच्या हाती कमळ असते, कुणाच्या पाठीशी घडय़ाळ असते.. कुणाची सेल्फी कालव्याच्या काठी, कुणाची जलयुक्त शिवारातटी.. कुणाची सेल्फी लाल दिव्याच्या गाडीत, कुणाची सेल्फी बंगल्याच्या माडीत.. कुणी सेल्फीत खुदखुदून हसावे, कुणी सेल्फीत लटके रुसावे.. हसरी सेल्फी फेबुवर टाकावी, कुणी रडकी सरलवर ढकलावी.. कशीही असली तरी, सेल्फी म्हणजे सेल्फी असते, तरीही सगळ्यांचीच सारखी नसते. सेल्फी म्हणजे आनंदाचा झरा, सेल्फी म्हणजे पुरावाच बरा.. कुणाला सेल्फीत हसू फुटते, कुणाला सेल्फीत रडू दाटते. तुमचीआमची सेल्फी, आगळी असते, पण, मास्तरांची सेल्फी वेगळी असते. सोमवारची सेल्फी मुलांसोबत, मंगळवारची हेडमास्तरांसोबत.. बुधवारच्या सेल्फीत खिचडीचा टोप, गुरुवारच्या सेल्फीने उडणार झोप.. शुक्रवारच्या सेल्फीत कवितांच्या ओळी, शनिवारी वर्गाची सारवलेली खोली.. सारे झाले की ‘सरल’वर चढवा, नाही तर मास्तरचा पगारच अडवा.. शिक्षण खात्याच्या अकलेचा दिवा, शाळेत पडतोय उजेड नवा.. मास्तरची छडी गायब झाली, हाती नवी ‘सेल्फी स्टिक’ आली.. गावाकडच्या शाळेत सेल्फीचे खूळ, आता म्हणे मुलांना पडेल भूल.. शिक्षण खात्याची शक्कल नवी, हजेरीसाठी सेल्फीच हवी.. बिचारा मास्तर हैराण झाला, सेल्फीच्या ओझ्याने वाकून गेला.. आधीच ‘सरल’चा वाकडा ताप, कसे तरी भरायचे कामाचे माप.. पोरांना शाळेत शिक्षण कमी, हवी फक्त हजेरीची हमी.. म्हणून, संसदेत सुरू झालेली सेल्फीची साथ शाळेपर्यंत पोहोचविण्याचे क्रांतिकारी श्रेय सरकारला द्यायलाच पाहिजे..